चालू घडामोडी : ९ जुलै

विधानपरिषद सभापतीपदी रामराजे निंबाळकर

  • विधान परिषदेचे सभापती म्हणून रामराजे निंबाळकर, तर विरोधी पक्षनेतेपदी धनंजय मुंडे यांची एकदिवसीय विशेष अधिवेशनात एकमताने निवड करण्यात आली.
  • विधान परिषदेचे हंगामी सभापती शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. 
  • रामराजे निंबाळकर यांच्या सभापती निवडीचा प्रस्ताव कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी मांडला. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुनील तटकरे यांनी अनुमोदन दिले.
  • तसेच विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे यांच्या निवडीचा प्रस्ताव नीलम गोऱ्हे यांनी मांडला. त्याला प्रभाकर घागरे यांनी अनुमोदन दिले.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या विधान परिषद सभागृह नेतेपदी सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

केरळमध्ये जंक फूडवर ‘फॅट टॅक्स’

  • केरळ सरकारने जंक फूडवर १४.५ टक्के ‘फॅट टॅक्स’ लावला असून, अशा प्रकारचा कर लावणारे ते देशातील पहिले राज्य झाले आहे.
  • जपान, डेन्मार्क आणि हंगेरी या देशांमध्ये या प्रकारचा कर लावला जातो. जंक फूडचे महत्त्व कमी व्हावे आणि कराचेही उत्पन्न वाढावे, यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.
  • केरळातील आर्थिक विकासदर घसरल्यामुळेच आर्थिक अडचणीतून मार्ग काढण्यासाठीच ही 'फॅट टॅक्स'ची तरतूद करण्यात आली आहे.
  • हा कर नामांकित रेस्टॉरंट्स तसेच मॅक्डोनाल्ड्स, डॉमिनोज, पिझ्झा हट आदी नामांकित फूड चेन्सनाही लागू होणार आहे.
  • शालेय विद्यार्थ्यांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तेथील विद्यार्थ्यांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याचे केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.
  • केरळ सरकारने तयार पोळी तसेच बासमती तांदूळ यावरही पाच टक्के कर लावला आहे.
  • या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीत वर्षाकाठी कमीत कमी १० कोटी रुपयांची भर पडणार असल्याचे समजते.
  • केरळचे मुख्यमंत्री : पिनरई विजयन
  • केरळचे अर्थमंत्री : अर्थमंत्री टी. एम. थॉमस

सेरेना विलियम्सला विम्बल्डन महिला एकेरीचे जेतेपद

    Serena wins 7th Wimbledon
  • जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला टेनिसपटू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने विम्बल्डन महिला एकेरीचे जेतेपद मिळवले.
  • सेरेना विल्यम्सने अंतिम फेरीत अँजेलिक कर्बरचा ७-५, ६-३ असा पराभव करत विम्बल्डन स्पर्धा जिंकली आहे.
  • सेरेना विल्यम्सने सातव्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरले आहे. सेरेना विल्यम्सच्या कारकिर्दीतील हे २२वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
  • या विजयासह सेरेनाने जर्मनीच्या स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँडस्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
  • अँजेलिक कर्बरने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम पटकावताना सेरेनाला नमवून ऑस्ट्रेलियन ओपन २०१६ स्पर्धा जिंकली होती.
 सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस पराभूत 
  • गतविजेत्या व जागतिक दुहेरीच्या रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या सानिया मिर्झा व मार्टिना हिंगिस यांना विम्बल्डन टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला.
  • पाचव्या सीडेड टिमिया बाबोस (हंगेरी) व यारोस्लाव्हा श्वेडोव्हा (कझाखस्तान) यांनी सानिया-मार्टिन यांच्यावर ६-२, ६-४ असा ६८ मिनिटांत विजय मिळवला.
 पेस-हिंगिसही गारद 
  • विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत लिअँडर पेस व मार्टिन हिंगिस यांना पराभव पत्करावा लागला आहे.
  • हीतर वॉटसन (ब्रिटन) व हेंरी काँटियन (फिनलँड) या नवख्या जोडीने पेस-मार्टिना यांचा ३-६, ६-३, ६-२ असा पराभव केला.
 रॉजर फेडररदेखील स्पर्धेतून बाहेर 
  • विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅनडाच्या मिलॉस रावनिकने स्वित्झर्लंडच्या माजी विजेत्या रॉजर फेडररवर ६-३, ६-७ (३-७), ४-६, ७-५, ६-३ असा विजय मिळवून विम्बल्डनच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
  • तब्बल तीन तास २५ मिनिटे रंगलेल्या या लढतीत ३४ वर्षांच्या फेडररने २५ वर्षांच्या मिलॉस रावनिकला कडवी झुंज दिली, पण रावनिकची ताकद सरस ठरली आणि फेडरर मागे पडला.
  • जागतिक रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या नोव्हाक जोकोविचचा स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतच पराभव झाल्याने रॉजर फेडररला यंदा विम्बल्डन जेतेपदाची संधी होती. 

थोर समाजसेवक अब्दुल सत्तार इधी यांचे निधन

  • मानवतेसाठी आपले पूर्ण आयुष्य समर्पित करणारे आणि पाकिस्तानमध्ये दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेले अब्दुल सत्तार इधी यांचे ९ जुलै रोजी पहाटे प्रदीर्घ आजारपणाने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते.
  • इधी फाउंडेशनमार्फत पाकिस्तानमध्ये शेकडो रुग्णवाहिका, रुग्णालये आणि अनाथाश्रम चालविले जातात. इधी यांच्याबद्दल सर्व राजकीय पक्षांमध्येही मोठा आदर असून नागरिकांमध्येही ते लाडके होते.
  • मानवतेसाठी आपले पूर्ण आयुष्य समर्पित करणारे इधी हे समाजसेवा आणि मानवतेसाठी काम करत होते. त्यामुळे त्यांची ओळख दानशूर अशी होती. 
 अब्दुल सत्तार इधी यांचा जीवनपरिचय 
  • १ जानेवारी १९२८ साली भारतातील बंतवा येथे त्यांचा जन्म झाला होता. मात्र फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले होते.
  • ईधी यांनी कमी वयातच आपले जीवन समाजसेवेसाठी वाहून घेतले होते. ६० वर्षांपूर्वी त्यांनी 'वेल्फेअर' फाउंडेशनच्या माध्यमातून कार्याला सुरूवात केली.
  • अनाथाश्रम, नर्सिंग होम, दवाखाने, वुमन शेल्टर आणि पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी दीन-दुबळ्यांची, रुग्णांची सेवा केली. काही काळानंतर त्यांनी ईधी फाउंडेशनची स्थापना देखील केली.
  • आज पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये ईधी फाउंडेशनचे काम सुरू आहे. या कार्यासाठी त्यांना १९८६ साली 'रॅमन मॅगसेसे', तर १९८८ साली 'लेनिन पीस प्राईज' या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.
  • याशिवाय इतर अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी अब्दुल सत्तार इधी यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • ईधी यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या आत्मचरित्राचा श्रीकांत लागू यांनी केलेला अनुवाद रोहन प्रकाशनने ‘केवळ मानवतेसाठी...’ म्हणून प्रकाशित केला आहे. 

विठुरायाच्या भक्तांना विमा संरक्षण

  • सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन्‌ मैल पायी पंढरीत येणाऱ्या भक्तांना आता श्री विठ्ठल मंदिर समितीने विमा संरक्षण लागू केले आहे. हे विमा संरक्षण वर्षभरासाठी लागू राहणार आहे.
  • यंदाच्या आषाढी यात्रेपासून पंढरीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या जास्तीत जास्त २५ भाविकांना वर्षभर विम्याचे संरक्षण मिळणार आहे. 
  • ओरिएंटल युनायटेड विमा कंपनीकडून भाविकांना विम्याचा लाभ देण्यात येणार असून, यासाठी पंढरपूर शहर व परिसरातील १० किलोमीटर परिसराचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे.
  • आषाढी यात्रेदरम्यान व वर्षभरात भाविकांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास एक लाख रुपये, तर एक अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये याप्रमाणे विम्याचा लाभ देण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा