चालू घडामोडी : २५ जुलै

ग्रीन रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाचे उद्घाटन

 • पहिल्या ‘ग्रीन रेल्वे कॉरिडॉर’ प्रकल्पाचे केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उद्घाटन केले. या प्रकल्पाच्या अंतर्गत रेल्वे गाडीतून मानवी मलमूत्र रेल्वे मार्गावर टाकण्याचा प्रकार बंद करण्यात आला आहे.
 • या योजेनेंतर्गत यावर्षी सुमारे ३०,००० जैव-शौचालये (बायो-टॉयलेट) रेल्वे गाड्यांमध्ये बसविण्यात येणार आहेत. रेल्वेच्या सर्वच बोगींमध्ये बायो-टॉयलेट बसविण्याची रेल्वेची योजना आहे.
 • त्यामुळे स्वच्छतेचे प्रमाण वाढण्यास हातभार लावणार असून, रेल्वे रुळांची गंजण्याची समस्याही कमी होणार आहे. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत या रेल्वे मार्गावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

नक्षलवादाविरोधातील सीआरपीएफच्या १३ नवीन तुकड्या

 • नक्षलवादाविरोधातील लढा आणखी बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने राखीव दलाच्या १३ नवीन तुकड्या तयार करण्यास संमती दिली आहे.
 • छत्तीसगड येथे चार, झारखंड, ओडिशा येथे प्रत्येकी तीन, आणि महाराष्ट्रात दोन तुकड्या तयार केल्या जाणार आहेत.
 • या व्यतिरिक्त छत्तीसगडमधील बस्तर येथे सीआरपीएफची एक स्वतंत्र तुकडी तयार केली जाणार असून, यामध्ये ७५ टक्के स्थानिक युवकांना संधी दिली जाणार आहे.
 • या तुकड्यांमध्ये स्थानिक युवकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे नक्षलवाद्यांसमोर कडवे आव्हान निर्माण होईल. 
 • कित्येकदा भाषा व पुरेशा माहितीअभावी नक्षलवादविरोधी मोहिमा अपयशी ठरतात. स्थानिक युवकांना तेथील भौगोलिक स्थिती व अन्य बाबींचा अंदाज असतो.
 • यामुळे नक्षलवादविरोधी कारवायांना आवर घालण्यासाठी त्यांची मोठी मदत मिळू शकते. तसेच, स्थानिकांना यातून रोजगारही उपलब्ध होईल.

युवा भालाफेकपटू नीरज चोप्राला सुवर्णपदक

 • युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटात ८६.४८ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले.
 • यापूर्वी २० वर्षांखालील गटात ८४.६९ मीटर अंतरावर भाला फेकण्याचा विक्रम लॅटेवियाच्या जिगिमुंडस सिर्यमसच्या नावावर होता.
 • या विक्रमापेक्षा जवळपास २ मीटरपेक्षा जास्त अंतरावर भाला फेकत नीरजने नवा विश्वविक्रम रचला आहे.
 • नीरज वरिष्ठ तसेच कनिष्ठ प्रकारात जागतिक विक्रम नावावर करणारा पहिला भारतीय अ‍ॅथलेटिक्सपटू ठरला आहे.
 • तसेच कनिष्ठ गटाच्या जागतिक मैदानी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू आहे.
 • जागतिक विक्रम नोंदवतानाच नीरजने वरिष्ठ प्रकारात राजिंदर सिंग यांचा ८२.२३ मीटर अंतराचा राष्ट्रीय विक्रमही मोडला. 
 • सीमा पुनियाने २००० साली २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेत थाळी फेकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. मात्र उत्तेजक सेवनप्रकरणी दोषी आढळल्याने तिचे पदक काढून घेण्यात आले होते.
 • रिओ ऑलिम्पिकसाठी नीरज पात्र ठरू शकला नाही, मात्र या कामगिरीमुळे यंदाच्या हंगामातील वरिष्ठ गटातील सर्वोत्तम आठ कामगिरींमध्ये नीरजच्या प्रदर्शनाचा समावेश झाला आहे.
 • रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी भालाफेकीत निर्धारित अंतर ८३ मीटर होते. मात्र ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची शेवटची तारीख ११ जुलै असल्याने नीरजची संधी हुकली.

के. पी. ओली यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा

 • अल्पमतात आल्याने अडचणीत सापडलेले नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी अविश्वास ठरावाला सामोरे न जाताच २५ जुलै रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
 • नेते प्रचंड यांच्या सीपीएन-माओवादी पक्षाने आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय दोन आठवड्यांपूर्वीच जाहीर केला होता.
 • त्यांनी आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी कॉंग्रेसने ओली यांच्याविरोधात संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडला होता. मागील दोन दिवसांपासून या ठरावावर चर्चा सुरू होती.
 • मधेशी पीपल्स राइट फोरम आणि राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी या दोन सहकारी पक्षांनी या अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओली नेपाळच्या अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला.
 • बहुमतासाठी २९९ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक असताना ओली यांच्याकडे केवळ १७५ सदस्यांचेच पाठबळ असल्याने हा अविश्वासदर्शक ठराव मंजूरच झाला असता. 
 • राजीनामा देण्यापूर्वी ओली यांच्या मंत्रिमंडळाने देशात कलम ३०५ लागू करावे, अशी शिफारस अध्यक्षा भंडारी यांच्याकडे केली होती. यानुसार, नवे सरकार स्थापण्यात येणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्याचा अधिकार अध्यक्षांना मिळतो.
 • के. पी. ओली यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती. राजसत्ता संपुष्टात आल्यानंतर नेपाळमध्ये गेल्या दहा वर्षांत सत्तेवर आलेले हे आठवे सरकार होते.
 • गेल्या वर्षी आधी भूकंप आणि नंतर मधेशी आंदोलन यामुळे हे सरकार आधीच अडचणीत सापडले होते.
 • नेपाळने नवी राज्यघटना स्वीकारल्यानंतर मधेशी यांनी यातील तरतुदींविरोधात सुमारे पाच महिने आंदोलन केले होते. 
 • आता सहकारी पक्षांनी पाठिंबा काढल्याने नऊ महिन्यांतच राजीनामा देण्याची वेळ या सरकारवर आल्याने नेपाळ पुन्हा अस्थिरतेच्या उंबरठ्यावर आला आहे.

भगवंत मान तात्पुरते निलंबित

 • लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आम आदमी पक्षाचे लोकसभेतील खासदार भगवंत मान यांना सत्र संपत नाही तोपर्यंत संसदेत उपस्थित राहू नये अशी सूचना केली आहे.
 • आपल्या मोबाईलच्या माध्यमातून संसदेच्या आवारातील दृश्ये त्यांनी फेसबुकवर लाईव्ह केली होती. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत सापडले होते.
 • या सर्व प्रकारामुळे २२ जुलै रोजी लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले होते.
 • हा प्रकार संसदेच्या आणि पर्यायाने देशाच्या सुरक्षेशी निगडित असल्यामुळे मान यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी सर्व पक्षांनी मागणी केली होती.
 • त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी नऊ सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल पुढच्या महिन्यात सादर करण्यात येणार आहे. भाजप खासदार किरीट सोमय्या हे या समितीचे अध्यक्ष आहेत.

फराज हुसैनचा ट्यूनिशियाकडून विशेष सन्मान

 • बांगलादेशातील ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान आपल्या जीवाची पर्वा न करता मित्रांचे प्राण वाचवणारा फराज हुसैन हा २० वर्षीय विद्यार्थी मानवतेचे उदाहरण बनला आहे.
 • मानवतेसाठी शहीद झालेल्या या अमर सैनिकाचे बलिदान लक्षात घेत उत्तर आफ्रिकेतील ट्यूनिशियाच्या ‘गार्डन ऑफ रायटस वर्ल्डवाइड’तर्फे विशेष सन्मान करण्यात आला आहे.
 द गार्डन ऑफ रायटस वर्ल्डवाइड 
 • ‘द गार्डन ऑफ रायटस वर्ल्डवाइड’ ही इटलीतील मिलानमधील एक ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर चालणारी संघटना आहे. 
 • या संघटनेने जगभरात अनेक ठिकाणी आपल्या शाखा स्थापन केल्या आहेत. ट्यूनिशियाची राजधानी ट्यूनिश येथील शाखेचे गेल्यावर्षी जुलैमध्ये उद्घाटन करण्यात आले होते.
 • ट्यूनिश मधील इटलीच्या दूतावासातील ही मानवतेसाठी काम करणाऱ्या अरबी आणि मुस्लिम लोकांसाठी वाहिलेली संघटना आहे.
 • जे लोक इतरांचा जीव वाचवतात अशा परोपकारी लोकांसाठी वापरण्यात येणारी ‘रायटस’ (सदाचारी) ही संकल्पना आहे. 
 • ‘रायटस’ ही संकल्पना बायबलवर आधारित आहे. ‘जे इतरांचा जीव वाचवतात ते संपूर्ण जगालाच वाचवतात’, असा या संकल्पनेचा बायबलप्रणित अर्थ आहे.

भाजप आमदार टुन्ना पांडे निलंबित

 • धावत्या गाडीत एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन आणि छेडछाड केल्याप्रकरणी भाजपने आमदार टुन्ना पांडे याला निलंबित केले आहे.
 • आपल्याच पक्षाच्या विधान परिषद सदस्यावर कारवाई करताना भाजपने पांडे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. 
 • पांडे पूर्वांचल एक्स्प्रेसने प्रवास करत असताना त्यांनी एका मुलीची छेड काढत तिच्याशी गैरवर्तन केले. हाजीपूर पोलिसांनी पांडे याना अटक केली असून, पक्षाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे.
 • टुन्ना पांडे याची ओळख दारू माफिया अशी आहे. उत्तर प्रदेशात त्यांचा दारूचा मोठा व्यवसाय आहे, बिहारमध्ये दारूबंदी झाल्यानंतर अन्य राज्यांत त्यांनी व्यवसाय वाढवला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा