चालू घडामोडी : १४ ऑगस्ट

अक्षरधामचे निर्माते स्वामी महाराज यांचे निधन

 • अक्षरधामचे निर्माते व स्वामी नारायण पंथ म्हणून प्रसिद्ध बोचासणवासी अक्षर पुरुषोत्तम संस्थेचे आध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज नारायण स्वरूपदास यांचे सारंगपूर येथे १३ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. 
 • भगवान स्वामीनारायण परंपरेतील ते पाचवे गुरू होते आणि गेली सात दशके त्यांनी भारतातील आणि जगभरातील १७ हजार शहरांचा प्रवास करून संस्थेचे  कार्य वाढविले होते.
 • अतिशय निरलस, तसेच प्रेमळ गुरू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म ७ डिसेंबर १९२१ रोजी बडोद्याजवळील एका गावातील शेतकरी कुटुंबात झाला होता.
 • वयाच्या १८ व्या वर्षी ते ब्रह्मस्वरूप शास्त्रीजी महाराजांच्या संपर्कात आले आणि साधू नारायण स्वरूप म्हणून ओळखले जाऊ लागले.
 • शास्त्रीजी महाराजांनी त्यांची निष्ठा आणि काम पाहून १९५०साली बीएपीएसच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक केली, तेव्हा ते अवघे २९ वर्षांचे होते.
 • शास्त्रीजी महाराजांचे १९५१साली निधन झाल्यानंतर, आधी योगी महाराज यांची आणि नंतर प्रमुख स्वामी महाराजांची त्यांच्या जागी नेमणूक करण्यात आली.
 • तेव्हापासून जवळपास ७ दशके प्रमुख स्वामी महाराज देशात आणि विदेशात समाजसेवा आणि सत्संग कार्यात गुंतले होते. आदिवासींच्या विकासात त्यांचा सहभाग होता.
 • नैसर्गिक आपत्तीतही ते व अनुयायी मदत करताना दिसत. त्यांनी दिल्ली व गांधीनगरप्रमाणे देशात आणि परदेशात ११०० स्वामीनारायण मंदिरांची उभारणी केली.
 • माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, दलाई लामा, नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस कोफी अन्नान यांच्यापासून जगभरातील अनेक नेत्यांनी प्रमुख स्वामी महाराजांच्या कार्याची अनेकदा प्रशंसा केली होती.

शेतकरी दिन तिथीनुसार साजरा होणार

 • राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप शिवसेना युती सरकारने शेतकरी दिन तिथी नुसार साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी कृषीक्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा जन्मदिवस शेतकरी दिन (२९ ऑगस्ट) म्हणून साजरा करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता.
 • २०१४पासून २९ ऑगस्ट हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यासाठी त्यांचे नातू व तत्कालीन राज्य सरकारमधील कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला.
 • नारळी पौर्णिमेच्या दिवशी विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म झाला होता. यंदा नारळी पौर्णिमा १७ ऑगस्ट रोजी असल्याने शेतकरी दिन १७ ऑगस्ट रोजी साजरा करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे.
 • तिथीनुसार हा दिन साजरा करण्यात येणार असल्याने दरवर्षी नारळी पौर्णिमेला बदलत्या तारखेनुसार हा दिन साजरा केला जाईल. 
 • माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी १ जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो. तो वर्षानुवर्षे याच तारखेला होत आहे.
 • मात्र, शेतकरी दिन दोन वर्षे २९ ऑगस्टला साजरा केल्यानंतर आता तो तिथीनुसार साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

ललिता बाबर अंतिम फेरीत

 • साताऱ्याच्या मराठमोळ्या ललिता बाबरने रिओ ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समधील ३००० मीटर स्टीपलचेस शर्यतीत अंतिम फेरी गाठली आहे.
 • १९८४मध्ये पी. टी. उषाने ४०० मी. हर्डल्स शर्यतीत ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर पात्रता फेरीतून अंतिम फेरी गाठणारी ललिता दुसरीच भारतीय धावपटू आहे.
 • प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या शर्यतीत ललिताने ९ मिनिटे १९.७६ सेकंदात शर्यत पूर्ण करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. 
 • ही कामगिरी करताना आशियाई विजेत्या ललिताने सुधा सिंगने नोंदविलेला ९ मिनिटे २६.५५ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला.

अतुलनीय देशसेवेसाठी शौर्य पुरस्कार जाहीर

 • स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी अतुलनीय देशसेवेसाठी ८२ जणांना शौर्य पुरस्कार जाहीर केले आहेत.
 • भारताच्या ७०व्या स्वांतत्र्यदिनाच्या औचित्यावर सशस्त्र सेना कर्मचारी आणि निमलष्करी दलांच्या सदस्यांना शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
 • या पुरस्कारांमध्ये १ अशोक चक्र, १४ शौर्य चक्र, ६३ सेना पदके, २ नौसेना पदके आणि २ वायुसेना पदकांचा समावेश आहे.
 • हवालदार हंगपन दादा यांना मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात येणार आहे.

सुवर्णपदकाने फेल्प्सच्या कारकीर्दीचा शेवट

 • अमेरिकेचा जलतरणपटू मायकेल फेल्प्सने आपल्या रिओ ऑलिंपिक अभियानाचा शेवट ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक पटकावून केला.
 • रिओ ऑलिंपिकमध्ये मायकेल फेल्प्सने ५ सुवर्ण व १ रौप्यपदक मिळविले. फेल्प्सने आपल्या जलतरणाच्या कारकिर्दीत २३ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ ब्राँझपदकांसह एकूण २८ पदके मिळविलेली आहेत.
 • फेल्प्सने अथेन्स ऑलिम्पिकमध्ये ६ सुवर्ण आणि २ कांस्य, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ८ सुवर्ण, तर लंडन ऑलिम्पिकमध्ये ४ सुवर्ण आणि २ रौप्यपदकांवर आपले नाव कोरले होते.
 • २३ सुवर्णपदकांसह २८ पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील एकमेव जलतरणपटू आहे.
 • हे फेल्प्सचे शेवटचे ऑलिंपिक आहे. या ऑलिंपिकनंतर निवृत्त होणार असल्याचे फेल्प्सने यापूर्वीच जाहीर केले होते.
 अमेरिकेला १००० सुवर्णपदके 
 • ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक तालिकेत आपले वर्चस्व कायम राखत असलेल्या अमेरिकेने आतापर्यंत तब्बल एक हजार सुवर्णपदके जिंकण्याची कामगिरी केली आहे.
 • रिओ ऑलिंपिक स्पर्धेमध्ये जलतरणात अमेरिकेने महिलांच्या ४ बाय १०० मीटर मिडले रिले प्रकारात सुवर्णपदक जिंकत ऑलिंपिक स्पर्धांमधील हजारावे सुवर्णपदक मिळविले.
 • अमेरिकेसाठी पहिले सुवर्णपदक १८९६च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये तिहेरी उडी प्रकारात जेम्स कोन्नोलीने मिळविले होते.
 • यंदाच्या ऑलिंपिकमध्ये आतापर्यंत अमेरिकेने २४ सुवर्णांसह ६१ पदके मिळविलेली आहेत. जलतरणात अमेरिकेने १६ सुवर्णपदाकांसह ३३ पदके मिळविली आहेत.

फराहचे धावताना ट्रॅकवर पडूनही पुन्हा उठत सुवर्णपदक

 • ग्रेट ब्रिटनच्या मोहम्मद फराहने १०,००० मीटर शर्यतीत धावताना ट्रॅकवर पडूनही पुन्हा उठत सुवर्णपदक मिळविण्याची कामगिरी केली आहे.
 • फराहने आपल्या कारकिर्दीतील ऑलिंपिकमधील हे तिसरे सुवर्णपदक मिळविले आहे. यापूर्वी फराहने लंडन ऑलिंपिकमध्ये १०,००० मीटर आणि ५००० मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते.
 • २५ लॅपच्या या शर्यतीत १०व्या लॅपवेळी तो मैदानावर कोसळला. पण, त्याने पुन्हा उठून शर्यत कायम ठेवली. त्यावेळी त्याला अमेरिकेचा सहकारी गॅलेन रुपने पाठबळ दिले.
 • अखेर त्याने शेवटच्या दोन लॅपमध्ये आपली आघाडी कायम ठेवली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. फराहने १०,००० मीटर अंतर २७ मिनीट ५.१७ सेकंदांत पूर्ण केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा