चालू घडामोडी : १८ ऑगस्ट

साक्षी मलिकला रिओमध्ये कांस्यपदक

 • फ्रीस्टाइल कुस्तीच्या ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत किर्गिझस्तानच्या आयसूलू टिनीबेकोव्हला नमवत भारताला रिओ ऑलिम्पिकमधील पहिले पदक जिंकून दिले.
 • ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्ती स्पर्धेत पदक पटकावणारी साक्षी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
 • सायना नेहवाल (बॅडमिंटन), मेरिकोम (बॉक्सिंग), कर्नम मल्लेश्वरी (वेटलिफ्टिंग) यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी चौथी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
 • हरयाणा सरकारने राज्याचा गौरव वाढवणाऱ्या साक्षीला सरकारी सेवेत नोकरी देण्याची तसेच अडीच कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
 • साक्षी सध्या उत्तर रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपीक असून रेल्वेनेही तिला पदोन्नती देण्याची तसेच ५० लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे.
 • साक्षी मलिकचे पदक भारताचे कुस्तीमधील पाचवे पदक ठरले आहे, तर साक्षी मलिक ही भारताची चौथी ऑलिम्पिक पदकविजेती पैलवान ठरली आहे.
  • १९५२ मध्ये हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक मिळवले होते.
  • सुशीलकुमारने २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक व २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले होते.
  • २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनेदेखील कांस्यपदक आपल्या नावावर केले होते.
  • त्यानंतर आता २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकने कांस्यपदक जिंकत कुस्तीतले पाचवे पदक मिळवले आहे.

चार नव्या रेल्वेगाड्या लवकरच सुरु करणार

 • दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनाही परवडणाऱ्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ नावाची रेल्वेसेवा सुरू करणार आहे.
 • ‘अंत्योदय एक्स्प्रेस’सह चार नव्या गाड्या काही महिन्यांत सुरू करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे.
 नव्या रेल्वेगाड्या 
 • अंत्योदय एक्स्प्रेस : गर्दीच्या मार्गांवर धावणारी अनारक्षित सुपर फास्ट गाडी.
 • हमसफर : सर्व डबे थर्ड एसीचे असलेली ‘तेजस’ वर्गातील गाडी. वेग ताशी १३० किमी. स्थानिक खाद्यपदार्थ, वाय-फाय.
 • उदय : (UDAY : Utkrisht Double-Decker Air-conditioned Yatri उत्कृष्ट डबल डेकर एअर कन्डिशन्ड यात्री). गर्दीच्या मार्गांवर दोन शहरांमधील अंतर रात्रीत कापणारी गाडी.
 • दीन दयालू : काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना अनारक्षित ‘दीन दयालू’ डबे जोडणार. अधिक प्रवाशांसाठी सोय.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यक्रमामुळे पर्यावरणाची हानी

 • आर्ट ऑफ लिव्हिंगने आयोजित केलेल्या कार्यक्रमामुळे यमुना नदीच्या पूरप्रवण क्षेत्राची मोठी हानी झाल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने काढला आहे.
 • या कार्यक्रमामुळे पर्यावरणाचे इतक्या मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले की त्याची पुन्हा भरपाई होऊ शकत नाही, असेही या समितीने नमूद केले आहे.
 • श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनने यमुनेच्या काठावर मार्च महिन्यात जागतिक संस्कृती महोत्सव घेतला होता.
 • या महोत्सवामुळे पर्यावरणाची हानी झाली काय याचा अभ्यास करण्यासाठी एनजीटीने जलस्रोत मंत्रालयाचे सचिव शशी शेखर यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना केली होती.
 • या समितीने आपला अहवाल नुकताच एनजीटीच्या सुपूर्द केला. या अहवालात म्हटले आहे की, कार्यक्रमाचे मुख्य स्थळ म्हणून वापर करण्यात आलेले पूरक्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.
 • सपाटीकरणासह पूरक्षेत्राची दबाई करण्यात आल्यामुळे जल संचयासाठी जागा उरली नाही. अनेक वनस्पती आणि झाडेझुडपेही नाहीशी होऊन जैवविविधतेचा ऱ्हास झाला आहे.
 • द आर्ट ऑफ लिव्हिंगने हा अहवाल फेटाळला असून, पर्यावरण हानीचे आरोप अवैज्ञानिक, पक्षपाती असल्याचे म्हटले आहे.
 • पर्यावरणीय हानीच्या भरपाईसाठी एनजीटीने गेल्या मार्चमध्ये द आर्ट ऑफ लिव्हिंगला पाच कोटी रुपयांचा दंड ठोठावून आणखी नुकसान होऊ न देण्याचे शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

सचिनने महाराष्ट्रातील गाव दत्तक घेतले

 • दुष्काळात होरपळणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील डोणजे हे दुर्गम गाव सचिन तेंडूलकरने दत्तक घेतले आहे.
 • संसद आदर्श ग्राम योजनेत सचिनने महाराष्ट्रातले पहिले गाव म्हणून डोणजेची निवड केली. यापूर्वी सचिनने आंध्रप्रदेशातील एक गाव दत्तक घेतले आहे.
 • डोणजे गाव सीना कोळेगाव प्रकल्पात बाधित झालेलं गाव आहे. पण कायम क्रिकेटचं वेड असलेल्या या गावाची पंचक्रोशीतली ओळख म्हणजे या गावात भरणारे क्रिकेटचे सामने.
 • राज्यात ज्या वेळी क्रिकेटचा फारसा प्रचार व प्रसार नव्हता, त्या वेळी या गावात ग्रामीण भागातले क्रिकेटचे सामने अत्यंत लोकप्रिय होते.
 • या गावाला संसद आदर्श ग्राम योजनेतून सचिन तेंडुलकर यांनी दत्तक घेतल्याने या गावाचा आता कायापालट होण्याची आशा निर्माण झाली आहे.

प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारत आघाडीवर

 • ब्लूबाइट्स या संस्थेने टीआरए रिसर्च या संस्थेबरोबर केलेल्या सर्वेक्षणानुसार जगातील प्रतिष्ठित औषध कंपन्यामध्ये भारतीय कंपन्या आघाडीवर आहेत.
 • ‘इंडियाज् मोस्ट रेप्युटेड ब्रँड्स’ असे या सर्वेक्षण अहवालाचे नाव आहे.
 • सर्वाधिक प्रतिष्ठित औषध कंपनी म्हणून १९६८पासून कार्यरत असणाऱ्या व ३०२९.५ कोटी रुपये महसूल असणाऱ्या ल्युपिन कंपनीची निवड झाली आहे.
 • जगातील प्रतिष्ठित औषध कंपन्यांमध्ये देशातील ५८ कंपन्यांची वर्णी लागली आहे. त्यामध्ये पहिल्या चारही कंपन्या भारतीय आहेत.
 • ल्युपिन खालोखाल सन फार्मा कंपनीला तर त्यानंतर सिप्ला कंपनीला लोकांची पसंती मिळाली आहे. चौथ्या क्रमांकावर डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज् ही कंपनी आहे.
 • सर्वाधिक प्रतिष्ठित दहा भारतीय कंपन्या : ल्युपिन, सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज्, ग्लेनमार्क, झायडस कॅडिला, बायोकॉन, अरविंदो, पिरामल फार्मा, अजंता फार्मा.

‘रणथंबोरच्या राणी’चा मृत्यू

 • ‘रणथंबोरची राणी’ अशी ओळख असलेली वाघीण ‘मछली’चा १८ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला.
 • मछली गेल्या काही दिवसांपासून आजारी होती, तिने खाणेपिणेही सोडले होते. वनविभागाने एक पथक डॉक्टरांसह मछलीच्या देखभालीसाठी पाठवले होते.
 • मछली १९ वर्षांची होती. सामान्यपणे वाघ १३ ते १५ वर्षांपर्यंत जगतात मात्र १९ वर्षे जगलेल्या मछलीच्या बाबतीत अपवाद ठरला.
 • मछली वाघीण ही रणथंबोरची राणी म्हणून ओळखली जायची. तिच्या चेहऱ्यावर माशासारख्या खुणा असल्याने तिला मछली हे नाव पडले होते.
 • रणथंबोरला भेट देणाऱ्या पर्यटकांचे ती खास आकर्षण होती. गेल्या दहा वर्षात तिच्या वास्तव्यामुळे रणथंबोर उद्यानाच्या उत्पन्नात १ कोटी डॉलरची भर पडली.
 • जगातील ‘मोस्ट फोटोग्राफ्ड’ अर्थात सर्वाधिक फोटो काढली गेलेली वाघीण अशी मछलीची ख्याती होती. तिच्यावर अनेक डॉक्युमेंट्रीजही तयार झाल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा