चालू घडामोडी : २३ ऑगस्ट

राजकीय पक्षांचे पुनरावलोकन दर १० वर्षांनी

  • राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा दर १० वर्षांनी आढावा घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले.
  • आयोगाने निवडणूक चिन्हासंबंधित (आरक्षण आणि वाटप) आदेश १९६८च्या परिच्छेद ६सीमध्ये दुरुस्ती केली आहे.
  • त्यानुसार आता राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांचे पाचऐवजी १० वर्षांनी पुनरावलोकन होणार आहे.
  • त्यामुळे प्रत्येक निवडणुकीनंतर अपयशामुळे दर्जा धोक्यात येण्याची भीती असलेल्या पक्षांना दिलासा मिळणार आहे.
  • राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय दर्जा ठरवण्याचे निकष मात्र पूर्वीचेच असणार असल्याचे आयोगाने नमूद केले आहे.
  • त्यामुळे २०१४ लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे राष्ट्रीय दर्जा धोक्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष (बीएसपी) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाला (सीपीआय) तूर्तास दिलासा मिळाला आहे.
  • सध्या भाजप, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बीएसपी आणि सीपीआय या सहा पक्षांना राष्ट्रीय दर्जा आहे, तर देशात राज्यस्तरीय ६४ प्रमुख पक्ष आहेत.

जीएसटी हिमाचल प्रदेशच्या विधानसभेत मंजुर

  • बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वस्तू आणि सेवा कर घटनादुरुस्ती (जीएसटी) विधेयकास हिमाचल प्रदेशच्या विधानसभेनेही मंजुरी दिली.
  • या घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी देणारे हिमाचल प्रदेश हे चौथे राज्य ठरले आहे.
  • यापूर्वी बिहार, झारखंड आणि आसाम या राज्यांनीही घटनादुरुस्ती विधेयकास मंजुरी दिली आहे.
  • ६८ सदस्य असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये कॉंग्रेसचे ३६, भाजपचे २८ आणि ४ अपक्ष असे संख्याबळ आहे. चारही अपक्षांचा सत्ताधारी कॉंग्रेसला पाठिंबा आहे.
  • मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी हे विधेयक मांडल्यानंतर लगेचच त्यावर मतदान घेण्यात आले. या विधेयकावर विधानसभेत चर्चा झाली नाही.
  • ‘जीएसटी’ प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी किमान १५ राज्यांच्या विधानसभांनी त्यास मंजुरी देणे आवश्यक आहे. राज्यसभा आणि लोकसभेने यापूर्वीच हे विधेयक मंजुर केले आहे.

श्रीमंत देशांच्या यादीत भारत सातवा

  • जगभरातील टॉप टेन श्रीमंत देशांच्या यादीत भारताने सातवा क्रमांक पटकावला असून, अमेरिका या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
  • भारतातील एकूण व्यक्तीगत संपत्ती ५,६०० अब्ज डॉलर्स आहे. तर अमेरिकेतील एकूण व्यक्तीगत संपत्ती ४८,९०० अब्ज डॉलर्स आहे.
  • जून महिन्यात जगभरातील देशांतील संपत्तीचा अभ्यास करण्यात आला. त्याआधारे जगभरातील श्रीमंत देशांची ही यादी जाहीर करण्यात आली आहे.
  • ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ने व्यक्तिगत संपत्तीच्या आधारे श्रीमंत देशांचा अहवाल जाहीर केला आहे.
  • मागील पाच वर्षांत डॉलरच्या आधारे विचार करता सर्वाधिक वेगाने वाढणारी श्रीमंत अर्थव्यवस्था चीनची ठरली आहे.
  • भारताने लोकसंख्येच्या बळावर या यादीत स्थान मिळवले आहे. फक्त दोन कोटी २० लाख लोकसंख्या असलेल्या ऑस्ट्रेलियाची या यादीतील झेप कौतुकास्पद आहे. 
जगातील टॉप टेन श्रीमंत देश
क्र. देश एकूण व्यक्तिगत संपत्ती
१. अमेरिका ४८,९०० अब्ज डॉलर्स
२. चीन १७,४०० अब्ज डॉलर्स
३. जपान १५,१०० अब्ज डॉलर्स
४. इंग्लंड ९,२०० अब्ज डॉलर्स
५. जर्मनी ९,१०० अब्ज डॉलर्स
६. फ्रान्स ६,६०० अब्ज डॉलर्स
७. भारत ५,६०० अब्ज डॉलर्स
८. कॅनडा ४,७०० अब्ज डॉलर्स
९. ऑस्ट्रेलिया ४,५०० अब्ज डॉलर्स
१०. इटली ४,४०० अब्ज डॉलर्स

नरसिंग यादववर चार वर्षांची बंदी

  • उत्तेजक प्रकरणात नरसिंग यादववर क्रीडा लवाद न्यायालयाने (कॅस) चार वर्षांची बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.
  • आपला अहवाल सादर करताना ‘कॅस’ने नरसिंगने गोळ्याच्या माध्यमातून उत्तेजक एकदा नव्हे, तर अनेकदा घेतल्याचे म्हटले आहे. 
  • नरसिंगच्या २५ जून व ५ जुलै रोजी घेण्यात आलेल्या चाचणीच त्याने प्रतिबंध घालण्यात आलेल्या मेथेनडाईनन या उत्तेजकाचे सेवन केल्याचे सिद्ध झाले होते.
  • त्या वेळी नरसिंगने आपल्याला अन्नातून उत्तेजक दिल्याचा दावा केला होता. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) त्याचा युक्तिवाद ग्राह्य मानून त्याला निर्दोष ठरवले होते.
  • मात्र, जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) या निर्णयाला ‘कॅस’कडे आव्हान दिले होते.
  • कॅसने उपलब्ध माहितीचा आधार घेत नरसिंगबाबत आपला अहवाल सादर केला.
  • नरसिंगच्या शरीरात सापडलेल्या उत्तेजकाचे अंश मोठ्या प्रमाणावर होते. इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्तेजक हे भेसळ करून दिले जाऊ शकत नाही. त्याने जाणूनबुजूनच हे केले असल्याचे ‘कॅस’ने म्हटले आहे.
  • आपल्याविरुद्ध कारस्थान केल्याबाबत नरसिंगला कोणताही सबळ पुरावा दिला नाही. त्यामुळेच त्याच्यावर चार वर्षांकरिता बंदी घालण्यात आली, असे कॅसने म्हटले आहे.

बांगलादेशमध्ये विषारी वायूची गळती

  • चितगाव (बांगलादेश) येथील खतनिर्मिती कारखान्यातून विषारी वायूची गळती झाल्याने लहान मुलांसह २५० जण अत्यवस्थ झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
  • चितगाव येथील कर्णफुली नदीच्या काठावर असलेल्या खतनिर्मिती कारखान्यातून २२ ऑगस्ट रोजी रात्री डायअमोनियम फॉस्फेट या वायूची गळती झाल्याचे लक्षात आले.
  • जोरदार वारे वाहत असल्याने हा वायू लगेचच जवळपास दहा किलोमीटरच्या परिसरात पसरला. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
  • ही गळती रोखण्यात आली असून, या परिसरातील शेकडो जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रीमध्ये दीपिका दहावी

  • हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स पुन्हा एकदा जगभरात सर्वात जास्त कमावणारी अभिनेत्री ठरली आहे. २०१५मध्येही या यादीत ती आघाडीवर होती. 
  • फोर्ब्सने २०१६मध्ये सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींची यादी जाहीर केली आहे.
  • यामध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्कर विजेती जेनिफर लॉरेन्स आहे. दुसऱ्या क्रमांकावर मेलिसा मॅक्कथी आहे.
  • विशेष म्हणजे यंदाच्या फोर्ब्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण दहाव्या क्रमांकावर आहे.
सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘टॉपटेन’ अभिनेत्री
क्र. अभिनेत्री कमाई (मिलियन डॉलर्स)
१. जेनिफर लॉरेन्स ४६
२. मेलिसा मॅक्कर्थी ३३
३. स्कार्लेट जोहानसन २५
४. जेनिफर अॅनिस्टन २१
५. फॅन बिंगबिंग १७
६. चार्लिज थेरॉन १६.५
७. अॅमी अॅडम १३.५
८. जुलिया रॉबर्टस १२
९. मिला कुनीस ११
१०. दीपिका पादुकोण १०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा