चालू घडामोडी : २४ ऑगस्ट

सरोगसी विधेयकाला मंजुरी

 • सरोगसी विधेयकाला केंद्राने मंजुरी दिली आहे. भारतातल्या सरोगेट मातांच्या हक्कांच्या दृष्टीने हे विधेयक महत्त्वाचे आहे.
 • सरोगसीमधील अनैतिकतेला आळा घालण्याचा प्रयत्न या विधेयकातून करण्यात आला आहे.
 • सरोगसीचा व्यवसाय करण्यावर बंदी घालण्याची तसेच अविवाहित जोडप्यांसाठी सरोगसीद्वारे अपत्य न देण्याची तरतूद या विधेयकात आहे.
 विधेयकाची ठळक वैशिष्ठ्ये 
 • कायदेशीर विवाह झालेले भारतीय दाम्पत्यच फक्त सरोगसीमातृत्वाने अपत्य जन्माला घालू शकेल. मात्र, त्यासाठी दोघांपैकी एकाचे वंध्यत्व वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले असणे बंधनकारक आहे.
 • परकीय नागरिकास किंवा परदेशस्थ अनिवासी भारतीयास कोणाही भारतीय स्त्रीकडून सरोगसी माता म्हणून सेवा घेता येणार नाही.
 • अविवाहित दाम्पत्य, एकटे पालक, लिव्ह-इन पद्धतीने एकत्र राहणारे अथवा समलिंगी दाम्पत्य सरोगसी मातृत्वाचा वापर करू शकणार नाहीत.
 • ज्यांनी याआधी अपत्य दत्तक घेतले आहेत त्यांना सरोगसीद्वारे अपत्य दत्तक घेता येणार नाही अशीही तरतूद करण्यात आली आहे.
 • कोणाही स्त्रीला केवळ दयाळू भावनेतून इतर कोणाच्या तरी मुलाची सरोगसी माता होता येईल. त्यासाठी तिला वैद्यकीय खर्चाखेरीज अन्य कोणताही मोबदला मिळणार नाही.
 • सरोगसी मातृत्वाच्या व्यवहारांचे नियमन करण्यासाठी केंद्र व राज्यांच्या पातळीवर स्वतंत्र मंडळे स्थापन करणार.
 • सरोगसी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना १० वर्ष तुरुंगवास आणि १० लाख रुपयापर्यंत दंडाच्या शिक्षेची तरतुद.

स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक

 • भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांबद्दलची गोपनीय माहिती लीक झाल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 • फ्रान्समधील डीसीएनएस या पाणुबड्यांची बांधणी करणाऱ्या कंपनीची २२,००० पानांची कागदपत्रे लीक झाल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 • या कागदपत्रांमध्ये भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन पाणबुड्यांच्या ऑपरेटिंग मॅन्युअलच्या गोपनीय माहितीचा समावेश असल्याचा संशय आहे.
 • या माहितीमध्ये पाणबुड्यांचे सेन्सर्स, युद्ध व्यवस्थापन यंत्रणा, पाणतीर (टॉर्पेडो) प्रक्षेपण प्रणाली आणि पाणबुडीतील दिशादर्शन प्रणालीचा समावेश होता.
 • ही माहिती पाकिस्तान किंवा चीनसारख्या देशांच्या हाती पडल्यास सागरी संरक्षणाच्यादृष्टीने भारतासाठी धोका उत्त्पन्न होऊ शकतो.
 ‘आयएनएस कलावरी’ची वैशिष्ट्ये 
 • भारतीय नौदलातील स्कॉर्पिअन प्रकारातील पहिली पाणबुडी असणाऱ्या कलावरीची मे २०१६ मध्ये समुद्रात चाचणी घेण्यात आली.
 • ही पाणबुडी लवकरच नौदलात दाखल होणार आहे. याशिवाय, आगामी २० वर्षांत अशाच ६ स्कॉर्पिअन पाणबुड्या नौदलात दाखल होणार आहेत.
 • यासाठी फ्रान्सच्या डीसीएनएसकडून मेसर्स एमडीएल बरोबर तंत्रज्ञान हस्तांतरणाचा करार करण्यात आला आहे.
 • युद्धनौकाविरोधी व पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रे, पाणसुरुंग पेरण्याची ताकद, गुप्त माहिती गोळा करण्याच्या अत्याधुनिक सुविधांनी आयएनएस कलावरी पाणबुडी सुसज्ज आहे.
 • या पाणबुड्यांमध्ये अत्याधुनिक युद्ध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून अचूक लक्ष्यभेदामुळे त्या काही वेळातच शत्रूंना उद्ध्वस्त करू शकतात.
 • या पाणबुड्यांमध्ये समुद्राच्या पृष्ठभागावरून किंवा पाण्याखालून टॉर्पिडो मिसाईल (पाणतीर) आणि पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.
 • उष्ण कटिबंधासह सर्व प्रकारच्या वातावरणात स्कॉर्पिअन पाणबुड्या काम करू शकतात.
 • स्कॉर्पिअन पाणबुडीत वेपन्स लाँचिंग ट्युबची (डब्ल्यूएलटी)  सुविधा असून त्यामुळे या पाणबुडीतून शस्त्रे नेता येऊ शकतात.
 • तसेच पाणबुडीत शस्त्र हाताळणीसाठी असलेल्या विशेष सुविधांमुळे ही शस्त्रे सुमद्रात सहजपणे रिलोड करता येतात.
 • या पाणबुडीवर बसवलेल्या शस्त्रे आणि जटील सेन्सर्स अत्युच्च दर्जाच्या युद्ध व्यवस्थापन यंत्रणेद्वारा नियंत्रित केली जातात.

हिंदूंपेक्षा मुस्लिमांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक

 • घटस्फोट किंवा विवाहानंतर विभक्त होण्याचे प्रमाण हिंदूंपेक्षा मुस्लिमांमध्ये अधिक असल्याची माहिती जनगणननेच्या २०११च्या अहवालातून समोर आली आहे. 
 • भारतामध्ये ख्रिश्चन आणि बुद्ध धर्मियांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर जैन धर्मात सर्वाधिक कमी घटस्फोट होत असल्याचे आढळून आले आहे.
 अहवालात आढळलेल्या बाबी 
 • सोबत न राहणाऱ्या हिंदू धर्माच्या दांपत्यांसह प्रत्येकी हजार विवाहित जोडप्यांपैकी ५.५ टक्के जोडपे विभक्त होत आहेत. तर घटस्फोटाचे प्रमाण १.८ टक्के आहे.
 • मुस्लिम धर्मियांमधील तलाक पद्धतीमुळे घटस्फोटित महिलांचे प्रमाण प्रत्येकी हजार विवाहित महिलांमध्ये ५ टक्क्यांवर आहे.
 • विधुर (पत्नी मृत झालेले) पुरुषांपेक्षा विधवा महिलांचे प्रमाण दोन-तीन पट अधिक आहे. त्यामागे महिलांचे आयुर्मान पुरुषांच्या तुलनेने अधिक असल्याचे म्हटले आहे.
 • हिंदूंच्या एकूण लोकसंख्येपैकी १६ टक्के पुरुष अविवाहित आहेत. तर १० टक्के महिला अविवाहित आहेत.
 • ख्रिश्चनांमध्ये अविवाहितांचे प्रमाण सर्वाधिक असून पुरुषांचे प्रमाण २१ टक्के तर महिलांचे प्रमाण १८ टक्के आहे.

साक्षी मलिक बेटी बचाओ बेटी पढाओची ब्रँड ऍम्बेसिडर

 • रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिक हिला हरियाना सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेची ब्रँड ऍम्बेसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 • तसेच साक्षीला हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते अडीच कोटी रुपयांचा धनादेश बक्षीस म्हणून देण्यात आला.
 • साक्षी ही हरियानातील रोहतक जिल्ह्यातील मोखरा खास गावातील रहिवाशी आहे. साक्षीने ५८ किलो वजनी गटात ब्राँझपदक मिळविले होते.

शारदा गैरव्यवहारप्रकरणी नलिनी चिदंबरम यांना समन्स

 • शारदा चीटफंड गैरव्यवहारप्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) समन्स बजाविण्यात आले आहे.
 • ईडीकडून शारदा चिटफंट घोटाळ्यातील सहभागाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
 • शारदा चिटफंडचे अध्यक्ष सुदीप्त सेन यांनी २०१३ मध्ये सीबीआयला पत्राद्वारे दिलेल्या कबुलीनंतर या घोटाळ्यात नलिनी चिदंबरम यांचे नाव पुढे आले होते.
 • नलिनी या चेन्नईस्थित वरिष्ठ वकील असून सीबीआयकडून त्यांची तपासणी सुरू होती.
 • काँग्रेस नेते मतांगसिंह यांच्या पत्नी मनोरंजना सिंह यांच्या हस्तक्षेपानंतर शारदा समुहाकडून वकिलीच्या शुल्कापोटी नलिनी चिदंबरम यांना एक कोटी रुपये देण्यात आल्याचा आरोप आहे.

मदर तेरेसा यांच्या सन्मानार्थ टपाल पाकीट

 • संत मदर तेरेसा यांना संतपद देण्याच्या समारंभाच्या पार्श्वभूमीवर भारतात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी एक विशेष टपाल पाकीट जारी करण्यात येणार आहे. २ सप्टेंबरला या पाकिटाचे अनावरण करण्यात येईल.
 • भारतीय टपाल खात्यातर्फे जारी करण्यात येणारे हे पाकीट रेशमापासून बनवलेले असणार आहे. अशी केवळ एक हजार पाकिटेच बनविण्यात येणार आहेत.
 • त्यावर २०१०मध्ये मदर तेरेसा यांच्या जन्म शताब्दीनिमित्त भारत सरकारने जारी केलेले पाच रुपयांचे नाणे कोरण्यात येणार आहे.
 • मदर तेरेसांचे जन्मस्थान असलेल्या मॅसेडोनिया प्रजासत्ताकमध्येही सोन्याचा मुलामा असलेले चांदीचे नाणे तयार करण्यात येणार आहे.

तामिळनाडू तृतीयपंथीयांना पोलीस दलात स्थान देणारे पहिले राज्य

 • राज्य पोलीस दलातील सेवेचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे.
 • प्रत्यक्षात निवड होऊन तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा त्यांना इतर दोन लिंगासोबत समान हक्क देणारे देशातील ते पहिले राज्य ठरेल.
 • तामिळनाडू सरकारने १३,१३७ पोलीस शिपायांच्या भरतीच्या आदेशात पात्र तृतीयपंथी व्यक्तीही अर्ज करू शकतील, असे नमूद केले आहे.
 • जे ‘तृतीयलिंगी’ म्हणून अर्ज करतील त्यांना शैक्षणिक अर्हता, शारीरिक क्षमता व आरक्षणाच्या बाबतीत महिला प्रवर्गाचे निकष लागू होणार आहेत.
 • यापूर्वीही राज्यामध्ये तृतीयपंथींना अर्ज करण्यास मज्जाव नव्हता. फक्त त्यांना पुरुष मानावे की स्त्री याविषयी सुस्पष्ट निर्देश नसल्याने त्यांच्या अर्जांवर पुढे कारवाई केली जाऊ शकत नव्हती.

दिवाळीच्या सन्मानार्थ अमेरिकेमध्ये टपाल तिकीट

 • दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या सन्मानार्थ अमेरिकेतील टपाल विभागातर्फे (यूएसपीएस) टपाल तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • दिवाळीवर टपाल तिकीट काढावे, अशी मागणी अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिक अनेक वर्षांपासून करीत होते.
 • सोनेरी रंगातील चमचमत्या पार्श्वभूमीवर ज्योतीने उजळलेल्या परंपरागत दिव्याचे चित्र या तिकिटावर असणार आहे.
 • त्यावर ‘फॉरएव्हर यूएसए २०१६’ हे शब्द असतील. ५ ऑक्टोबरला या टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे व नोव्हेंबरमध्ये ते व्यवहारात आणले जाईल.
 • सॅली अँडरसन यांनी तिकिटावरील दिव्याचे छायाचित्र काढले असून, या प्रकल्पाचे कला संचालक विल्यम गिकर हे आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा