चालू घडामोडी : २० सप्टेंबर

स्मार्ट सिटीसाठी तिसरी यादी घोषित

  • केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी २० सप्टेंबर रोजी देशभरात विकसित करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शहरांची नावे घोषित केली.
  • स्मार्ट सिटीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण ६३ शहरांनी सहभाग घेतला होता; यामधील २७ शहरांची निवड करण्यात आली आहे.
  • या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यामधील कल्याण डोंबिवली, नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक या पाच शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
  • स्मार्ट सिटीमुळे सेवा आणि व्यवस्था पारदर्शी व गतीमान होणार आहे. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होणार आहेत.

भारताचा ५००वा कसोटी सामना

  • न्यूझीलंडविरुद्ध ग्रीन पार्कवर २२ सप्टेंबरपासून भारताच्या खेळल्या जाणाऱ्या ५००व्या कसोटी सामन्यादरम्यान उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेतर्फे भारताच्या माजी कसोटी कर्णधारांचा सत्कार करण्यात येणार आहे.
  • आतापर्यंत १२ माजी कसोटी कर्णधारांनी निमंत्रणाचा स्वीकार करीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.
  • त्यात चंदू बोर्डे, अजित वाडेकर, सुनील गावस्कर, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, के. श्रीकांत, अनिल कुंबळे, रवी शास्त्री आणि वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे.
  • या कार्यक्रमाच्या उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते तर समारोप मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.
  • ५००व्या कसोटी सामन्यानिमित्त २५ हजार विशेष टी-शर्ट तयार करण्यात आले आहेत. हे टी-शर्ट प्रेक्षकांव्यतिरिक्त शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
  • या व्यतिरिक्त ५०० किलो लाडूंचे वाटप करण्यात येणार असून ५०० फुगे हवेत सोडण्यात येतील.
  • तसेच २००० शालेय विद्यार्थी व दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत कसोटी सामना बघण्याची संधी देण्यासाठी यूपीसीएची तयारी सुरू आहे. 

रशियामध्ये पुन्हा पुतिन यांची सत्ता

  • रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाला संसदीय निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे.
  • आतापर्यंत ९० टक्के मतमोजणी पूर्ण झाली असून, ४५० सदस्यांच्या संसदेत युनायटेड रशिया पक्षाचे ३३८ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पुतिन यांची सत्ता कायम रहाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा ज्याप्रमाणे जागतिक राजकारणावर परिणाम होतो. त्या तुलनेत रशियाची निवडणूकी तितकी महत्वाची वाटत नसली तरी, जागतिक संतुलनाच्या दृष्टीकोनातून या निवडणुकीचे महत्व आहे.
  • कारण अनेक मुद्यांवर अमेरिका आणि रशियामध्ये तीव्र मतभेद आहेत. वेळोवेळी या मतभेदांचा जागतिक राजकारणावर परिणाम झाला आहे.

कांगोमध्ये आंदोलनादरम्यान हिंसाचार

  • मध्य आफ्रिकेमधल्या कांगो देशाच्या किन्शासा राजधानीत आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे.
  • सरकारविरोधात प्रदर्शन करत असताना हा पोलीस आणि रिपब्लिकन गार्ड यांनी केलेल्या गोळीबारामुळे हिंसाचार उफाळून आला.
  • राष्ट्रपती जोसेफ कबिला यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी गटांनी आंदोलन छेडले असून, विरोधकांनी ही मागणी थेट रस्त्यांवर उतरून केली होती.
  • मात्र पोलिसांनी त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात १७ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा