चालू घडामोडी : २१ सप्टेंबर

दीर्घपल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

  • भारताने जमिनीवरून हवेमध्ये मारा करण्याची क्षमता असणाऱ्या दोन दीर्घपल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची ओडिशातील चंडीपूर येथील प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वी चाचणी घेतली.
  • भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि इस्राएल एअरोस्पेस इंडस्ट्रिज (आयएआय) यांनी संयुक्तपणे ही क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित केली आहे.
  • यशस्वी प्रायोगिक चाचण्यांनंतर ही क्षेपणास्त्रे तिन्ही सैन्यदलांमध्ये दाखल होतील. त्यामुळे भारताच्या युद्धसज्जता आणखी मजबूत होईल.
  • या क्षेपणास्त्राव्यतिरिक्त मल्टी फंक्शनल अँड थ्रेट अ‍ॅलर्ट रडार (एमएफ-स्टार) या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली आहे. ही यंत्रणा क्षेपणास्त्र दिशादर्शन, मार्ग व शोधन यासाठी वापरली जाते.
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, लार्सन अँड टुर्बो, भारत डायनॅमिक्स लिमिटेड आणि टाटा इ. खासगी उद्योगसमुहांनी देखील या क्षेपणास्त्रांसाठीच्या अनेक उपयंत्रणा विकसित केल्या आहेत.
  • यापूर्वी ३० जून ते १ जुलै २०१६ या या कालावधीत मध्यमपल्ल्याची मारक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्रांची सलग तीनदा चाचणी घेण्यात आली होती.
 या क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये आणि उपयोग 
  • माऱ्याचा पल्ला: ६० ते ८० किमी.
  • क्षेपणास्त्रावरील स्फोटके: ६० किलो.
  • एकूण वजन: २.७ टन.
  • वेग: २ मॅक (प्रति सेकंद १ किमी)
  • कोणत्याही संभाव्य हवाई धोका हाणून पाडण्याची क्षमता.
  • संरक्षणदलांची संवेदनशील आस्थापने व गर्दीच्या शहरांच्या हवाई संरक्षणासाठी प्रभावी.

निवड समितीच्या अध्यक्षपदी एमएसके प्रसाद

  • भारतीय क्रिकेट निवड समितीच्या अध्यक्षपदी माजी यष्टीरक्षक एमएसके प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • निवड समितीचे मावळते अध्यक्ष संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या निवड समितीची मुदत संपली होती.
  • त्यामुळे या समितीच्या जागी ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन समितीची नियुक्ती करण्यात आली.
  • माजी क्रिकेटपटू देवांग गांधी, जतिन परांजपे, सरणदीप सिंग आणि गगन खोडा यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
  • माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद हे ज्युनियर संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष असतील.
  • यापुढे भारतीय क्रिकेट संघ, १९ वर्षाखालील क्रिकेट संघ आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंच्या निवडीची जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीकडे असेल.
  • याशिवाय बीसीसीआयच्या सचिवपदी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अजय शिर्के यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

भूतानमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन

  • हिमालयाच्या कुशीत वसलेल्या आणि जगातला सर्वांत आनंदी देश मानला जाणाऱ्या भूतानमध्ये २२ सप्टेंबर रोजी विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
  • त्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागांतील आणि परदेशातील चारशे मराठी रसिक भूतानमध्ये दाखल झाले आहेत.
  • भूतानची राजधानी असलेल्या थिंफू शहरात विश्व मराठी परिषद आणि शिवसंघ प्रतिष्ठान यांच्या वतीने सहावे विश्व मराठी साहित्य संमेलन आयोजिण्यात आले आहे.
  • संमेलनाची सुरवात ग्रंथदिंडीने सकाळी आठ वाजता होणार आहे. त्यासाठी भूतान प्रशासनाने विशेष परवानगी दिली आहे.
  • ग्रंथदिंडीनंतर साहित्यिक हरी नरके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. ‘माध्यम’ हा विषय यंदाच्या संमेलनाचा केंद्रबिंदू असणार आहे. 
  • पत्रकार संजय आवटे यांच्या अध्यतेखाली हाेत असलेल्या या एकदिवसीय संमेलनात ग्रंथदिंडी, व्याख्याने, भाषणे, परिसंवाद या माध्यमातून मराठी भाषेचे मंथन होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा