चालू घडामोडी : २३ सप्टेंबर

नवतेज सरना अमेरिकेतील भारताचे नवे राजदूत

 • ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त नवतेज सरना यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • भारताचे अमेरिकेतील राजदूत अरुण सिंग हे निवृत्त होत असून, सरना हे लवकरच त्यांची जागा घेतील.
 • भारतीय परराष्ट्र सेवेचे (आयएफएस) १९८०च्या बॅचचे असलेल्या सरना यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून बराच काळ काम केले आहे. अत्यंत मुत्सद्दी अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
 • अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी येत्या ८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रशासकीय कारभार सांभाळायचा आहे.
 • राजदूत म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर भारत-अमेरिका संबंध कायम राखण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.
 • सरना यांनी २००८ ते २०१२ या काळात इस्राईलमध्ये भारताचे राजदूत म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.
 • मॉस्के, वॉर्सा, तेहरान, जीनिव्हा, थिंपू आणि वॉशिंग्टन येथील आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
 • याशिवाय श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त यश सिन्हा यांच्या जागी तरणजितसिंग सिद्धू यांची नियुक्ती झाली आहे. 

विसरनाई चित्रपट ऑस्करमध्ये

 • राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त तमीळ चित्रपट विसरनाई यावर्षीच्या ऑस्करमधील उत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या गटात भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करणार आहे.
 • पुढील वर्षीच्या ऑस्करमध्ये परदेशी चित्रपटांच्या गटातील २९ चित्रपटांशी भारताचा विसरनाई हा चित्रपट स्पर्धा करणार आहे.
 • गुन्हेगारीपट असलेल्या विसरनाई चित्रपटाचा निर्माता अभिनेता धनुष हा असून, त्याचे लेखन व दिग्दर्शन वेत्रीमारन यांनी केले आहे.
 • एम. चंद्रकुमार यांच्या ‘लॉक अप’ कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. दिनेश रवी, आनंदी आणि आडुकुलम मुरुगदास यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
 • पोलिसी क्रौर्य, भ्रष्टाचार आणि निरागसतेचा होणारा लोप याचे दर्शन चित्रपट घडवितो.
 • या चित्रपटाला उत्कृष्ट तमीळ चित्रपट, उत्कृष्ट सहायक अभिनेता समुथीरकनी आणि उत्कृष्ट संपादन किशोर टी असे तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
 • व्हेनिस चित्रपट महोत्सवात चित्रपटाला ‘ऍम्नेस्टी इंटरनॅशनल इटालिया पुरस्कार’ मिळाला होता.

टाईम्सच्या यादीमध्ये भारतातील ३१ शिक्षण संस्था

 • ‘टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड रँकिंग्ज २०१६-१७’च्या यादीमध्ये भारतातील ३१ शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे.
 • या यादीत ऑक्सफर्ड विद्यापीठ पहिल्या स्थानावर आहे. गेल्या १२ वर्षांत प्रथमच यूकेमधील शिक्षण संस्था या क्रमवारीत अग्रस्थानी राहिली आहे.
 • दुसऱ्या क्रमांकावर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तर तिसऱ्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आहे.
 • बेंगळुरूची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अर्थात ‘आयआयएस्सी’ ही या क्रमवारीत सर्वांत पुढे असलेली भारतीय संस्था ठरली आहे.
 • या यादीत पहिल्या २०० विद्यापीठांत एकही भारतीय शिक्षण संस्था नाही. तर पहिल्या ४०० विद्यापीठांमध्ये केवळ दोनच भारतीय शिक्षण संस्था आहेत.
 • त्यामध्ये आयआयएस्सी (२०१ ते २५०मध्ये) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी-मुंबई) (३५१ ते ४००मध्ये) या संस्थांचा समावेश आहे.
 • आयआयटी-दिल्ली, आयआयटी-चेन्नई आणि आयआयटी-रुरकी या भारतीय शिक्षण संस्थाही 'टाइम्स'च्या यादीत आहेत.
 • याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (रुरकेला), श्री वेंकटेश्वर विद्यापीठ, टाटा मूलभूत संशोधन संस्था आणि तेजपूर विद्यापीठ या चार संस्था यादीत स्थान मिळविण्यात प्रथमच यशस्वी झाल्या आहेत. 
 • एकूण ९८० शिक्षण संस्थांच्या या क्रमवारी यादीत यंदा दक्षिण आशियातील ३९ शिक्षण संस्था असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या दुपटीने वाढली आहे.
 • यात श्रीलंकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबोचा समावेश आहे, तर पाकिस्तानच्या सात संस्थांचा यात समावेश आहे.

गुजरातमध्ये ऍट्रॉसिटी खटल्यांसाठी १६ विशेष न्यायालये

 • दलित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दलित आदिवासी अत्याचाराच्या (ऍट्रॉसिटी) खटल्यांच्या जलद सुनावणीसाठी गुजरातमध्ये १६ विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत.
 • याबाबत गुजरातच्या विधी विभागाकडून अध्यादेश जारी करण्यात असून, गुजरातमधील ही सर्व न्यायालये १ ऑक्टोबरपासून कार्यरत होणार आहेत.
 • या न्यायालयांमध्ये फक्त ऍट्रॉसिटी कायदा १९८९, संदर्भातीलच खटल्यांची सुनावणी होणार असल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे.
 • १५ जिल्ह्यांमध्ये ही न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. अहमदाबादमध्ये शहर दिवाणी न्यायालय आणि ग्रामीण न्यायालय अशी दोन न्यायालये असणार आहेत.
 • गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्यानेच ही सर्व न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत.
 • उणा येथे दलित तरुणांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये दलित संघटनांनी आंदोलन केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा