चालू घडामोडी : २९ सप्टेंबर

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताची सर्जिकल स्ट्राईक

  • सीमेजवळ दहशतवादी एकत्र आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने सीमारेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढवला.
  • पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आले.
  • लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली.
  • उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारताने या कारवाईद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
 कारवाई कशी झाली? 
  • पाकव्याप्त काश्मीरमधील प्रशिक्षण तळांवर दहशतवादी एकत्र जमल्याची माहिती मिळाली. हे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत होते.
  • उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर किमान २० वेळा दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचे प्रयत्न केले होते. हे सर्व प्रयत्न भारतीय लष्कराने उधळले होते.
  • आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर २८ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० या कालावधीमध्ये भारतीय लष्कराचे काही जवान पाकव्याप्त काश्मीरमध्ये हेलिकॉप्टरमधून दाखल झाले.
  • प्रत्यक्ष ताबारेषेपासून ५०० मीटर ते २ किलोमीटर एवढ्या अंतरामध्ये ही कारवाई झाली. प्रत्यक्ष कारवाई ही जमिनीवर झाली.
  • या कारवाईमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील किमान सात दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. या कारवाईत ३८ दहशतवादी ठार झाले आहेत.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना विश्वासात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लष्करी कारवाई केली.
  • या कारवाईचे नियोजन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि लष्कारातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी केल्याचे सांगण्यात येते.
  • भारताने सीमेपलीकडे जाऊन दहशतवादी तळांवर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे.
 सर्जिकल स्ट्राईक 
  • ‘सर्जिकल स्ट्राईक’ म्हणजे अतिशय ठरवून आणि नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाई होय.
  • यामध्ये अप्रत्यक्षरिसुध्दा वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते.
  • सर्जिकल स्ट्राईकचा अत्यंत कमी वेळासाठी वापर केला जातो. अशा प्रकारची कारवाई करायची असेल तर हवाई दलाची परवानगी घ्यावी लागते.
  • सर्जिकल स्ट्राईक ही विशिष्ट भागावरच केली जाते. हल्ल्याचे नियोजन करताना सर्व बाबींचा विचार केला जात असून ही कारवाई रात्रीच्या वेळीच केली जाते.
  • भारतीय लष्कराने म्यानमारमाध्ये घुसून अशा प्रकारची कारवाई केली होती. भारताच्या पॅरा कमांडोने १ तासात ४०हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले होते.
  • अमेरीकन सैन्याने २००३मधील इराक युध्दाच्या सुरूवातीच्या काळात बगदादवर केलेला हल्ला हा सर्जिकल स्ट्राईकचे उदाहरण आहे.
  • भारतीय लष्कराने २८ सप्टेंबर रोजी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक‘ची योजना सात दिवसांपासून सुरू होती. या कारवाईत ३८ दहशतवादी ठार झाले आहेत.

ऐतिहासिक पॅरिस हवामान करारास मान्यता

  • पॅरिस येथील ऐतिहासिक हवामान करारास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे.
  • महात्मा गांधी जयंतीला म्हणजे २ ऑक्टोबर रोजी त्याची औपचारिकता पूर्ण करण्यात येणार आहे.
  • हा करार अमलात आणणाऱ्या देशात भारत हा एक महत्त्वाचा देश आहे. यामुळे भारताची पर्यावरण व हवामानविषयक काळजी असल्याचे सूचित होते.
  • आतापर्यंत ६१ देशांनी हा करार मान्य केला आहे. भारताने कार्बन उत्सर्जन ५१.८९ टक्के इतके खाली आणण्याचे मान्य केले आहे.
  • पॅरिस करारामध्ये पर्यावरणातील बदलांवर चिंता व्यक्त करताना जागतिक तापमानात वाढ २ अंश सेल्शिअसने कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पॅरिस कराराला मान्यतेसह इतर काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
  • कोरिया-भारत करार: एकमेकांच्या सागरी शिक्षण संस्थांच्या प्रमाणपत्रांना मान्यता देण्याच्या दक्षिण कोरियाबरोबरच्या कराराला मान्यता देण्यात आली.
  • १९७८ मधील प्रमाणित सागरी प्रशिक्षण जाहीरनाम्यानुसार हा करार करण्यात आला आहे.
  • नवप्रवर्तनास उत्तेजन: भारत व सिंगापूर यांच्यात नवप्रवर्तनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या समझोता करारास मान्यता देण्यात आली आहे.
  • औद्योगिक मालमत्ता पेटंट, व्यापारचिन्हे या मुद्दय़ांवर द्विपक्षीय सहकार्याचा यात समावेश आहे.
  • हिंदुस्थान केबल्सला पॅकेज: कोलकाता येथील हिंदुस्थान केबल्स लि. ही कंपनी बंद करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
  • या कंपनीला सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती लाभ व सरकारी कर्जाचे समभागात रूपांतर करण्यासाठी ४७७७.०५ कोटी रुपयांचे साहाय्य मंजूर केले आहे.

स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये भारत ३९वा

  • जागतिक स्तरावरील औद्योगिक व आर्थिक स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक ३९वा लागला आहे.
  • ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ने जगभरातील १२२ देशांचा अभ्यास करून हा निर्देशांक तयार केला.
  • देशातील संघटना, त्यांची ध्येयधोरणे आदी घटकांवर देशाची निर्मितीक्षमता अवलंबून असते.
  • या अहवालाच्या निर्मितीसाठी आर्थिक प्रगतीमधील १६ महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करण्यात आला होता.
  • यामध्ये पायाभूत सुविधा, आर्थिक वातावरण, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, आर्थिक बाजारपेठ विकास आदी घटकांचा समावेश होतो. 
  • यापैकी संस्था, पायाभूत सुविधा, स्थूल आर्थिक परिस्थती, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, प्रशिक्षण आदी बारा गटांमध्ये भारताने बाजी मारली आहे.
  • दहशतवादी कारवायांमुळे जागतिक पातळीवर खलनायक ठरलेल्या पाकिस्तान या यादीमध्ये शेवटच्या म्हणजेच १२२व्या स्थानी आहे.
  • देशांतर्गत वाढलेली गुन्हेगारी, करबुडवेगिरी, आर्थिक आणि सरकारी अस्थैर्य यामुळे पाकिस्तानात व्यापार करणे अधिक जोखमीचे झाले आहे.
  • या निर्देशांकानुसार श्रीलंकेचा ७१वा, भूतानचा ९७वा, नेपाळचा ९८वा तर बांगलादेशचा १०६वा क्रमांक लागला आहे.

तेल उत्पादन कमी करण्याचा ओपेकचा निर्णय

  • कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन ७ लाख ५० हजार बॅरलपर्यंत कमी करण्याचा निर्णय ‘ओपेक’ या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने घेतला आहे.
  • या निर्णयामुळे कच्च्या तेलाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात पाच टक्के वाढ झाली आहे. ओपेकचे सदस्य देश जगभरातील कच्च्या तेलापैकी ४० टक्के उत्पादन करतात. 
  • अल्जायर्स येथे सुरू असलेल्या ओपेकच्या बैठकीत अनपेक्षितपणे तेल उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतल्याने तेलाचे भाव वाढले.
  • नोव्हेंबरपासून त्यांनी प्रतिदिन ३.२५ कोटी बॅरलपर्यंत उत्पादन कमी करण्यावर सहमती दर्शविली आहे. 
  • तेलाचे भाव २०१४च्या मध्यापासून निम्म्यापेक्षा अधिक घसरले आहेत. भावातील घसरण रोखण्यासाठी उत्पादन घटविण्याच्या पर्यायावर मागील काही काळ चर्चा सुरू होती.
  • मात्र याला ओपेकमधील काही देशांचा आक्षेप होता. आता या निर्णयावर एकमत झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढून स्थिरता येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा