चालू घडामोडी : २० ऑक्टोबर

जीएसटी दराबाबत केंद्र आणि राज्यांमध्ये एकमत नाही

 • जीएसटीचा दर काय असावा यावर जीएसटी परिषदेच्या तीन दिवसांच्या बैठकीत एकमत होऊ न शकल्याने हा दर निश्चित करण्यासाठी परिषदेची बैठक ३ व ४ नोव्हेंबर रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे.
 • ही नवी कर प्रणाली लागू केल्यावर ज्या राज्यांचे महसुली नुकसान होईल त्यांना भरपाई देण्याची व्यवस्था कशी करावी, यावर मात्र एकमत झाले.
 • जीएसटी दराबाबत मात्र केंद्र आणि राज्यांमध्ये अजूनही विचार विनिमय होण्याची गरज आहे.
 • जीएसटी विधेयक मंजुरीनंतर आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनात एसजीएसटी आणि सीजीएसटी ही दोन विधेयके मंजूर करण्याला सरकारचे प्राधान्य आहे.
 • त्या पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती घडवून आणण्यासाठी जीएसटी परिषदेची बैठक बोलावली होती.

भारत आणि म्यानमार दरम्यान तीन करार

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि म्यानमारच्या परराष्ट्रमंत्री आँग सान स्यू की यांनी कृषी, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासंबंधी तीन करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. 
 • मोदी आणि स्यू की या दोन्ही नेत्यांनी भारत आणि म्यानमारच्या सुरक्षा संबंधांवर प्रामुख्याने भर दिला.
 • प्रदेशात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी सहकार्य वाढविणे आणि एकत्रितपणे काम करण्याला दोन्ही देश प्राधान्य देणार आहेत.

भारत आणि चीनच्या लष्कराचा संयुक्त लष्करी सराव

 • भारत आणि चीनच्या लष्कराने २० ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पूर्व लडाखमध्ये संयुक्त लष्करी सराव केला.
 • या दोन देशांतील लष्करांनी भारतीय हद्दीत प्रथमच अशा प्रकारच्या सरावामध्ये भाग घेतला. 
 • सीमेलगतच्या एका भारतीय खेड्यात भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीनंतरच्या मदतकार्याचा दोन्ही देशांच्या लष्करांनी सराव केला.
 • याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारतीय आणि चीनी लष्कराने चीनच्या हद्दीत अशाच प्रकारचा सराव केला होता.
 • भारतीय लष्करी पथकाचे नेतृत्व ब्रिगेडियर आर. एस. रामन आणि चीनी लष्करी पथकाचे नेतृत्व वरिष्ठ कर्नल फान जून यांनी केले. 
 • आण्विक पुरवठादार देशांच्या गटातील समावेशावरून आणि मसूद अझर याला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या मुद्यावरून भारत आणि चीनमधील संबंधांत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.
 • चीन वारंवार पाकिस्तानची पाठराखण करत असून, भारताच्या भूमिकेला विरोध करत आहे.
 • या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांतील संयुक्त लष्करी सरावाच्या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सात भारतीय कंपन्यांना ‘टाइम्स नेटवर्क’तर्फे पुरस्कार

 • केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेत मोलाचे योगदान देणाऱ्या कंपन्यांना ‘टाइम्स नेटवर्क’तर्फे पुरस्कार देण्यात आले. भारतातील सात कंपन्या या पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या.
 • नवी दिल्लीतील ‘ताज पॅलेस’ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया समिट अँड अॅवॉर्डस’ या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले. 
 • ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून भारताला जगातील आघाडीचा उत्पादक देश करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने आखले आहे.
 • सकल राष्ट्रीय उत्पन्नात देशांतर्गत उत्पादनाचा वाटा २५ टक्के असावा, असाही सरकारचा प्रयत्न आहे.
 पुरस्कार यादी 
 • इस्रो : मेक इन इंडियासाठी उच्च तंत्रज्ञान पुरवणे.
 • हिंदुस्तान युनिलिव्हर लि. : सातत्यपूर्ण उत्पादन.
 • जीई इंडिया : मेक इन इंडियामध्ये सर्वाधिक गुंतवणूक.
 • सन फार्मा : मेक इन इंडियाच्या माध्यमातून सर्वाधिक निर्यात.
 • भारत फोर्ज लि. : उत्पादनांचे स्वदेशीकरण.
 • बॉस्क इंडिया : मेक इन इंडियाच्या माध्यमातून स्मार्ट उत्पादन.
 • पतंजली आयुर्वेद : मेक इन इंडियाच्या माध्यमातून अभिनव उत्पादन.

प्राजना चौथा यांना फ्रान्सचा नाईटहूड किताब

 • हत्तींबाबत संशोधन करणाऱ्या संशोधिका प्राजना चौथा यांना फ्रान्सचा नाईटहूड किताब जाहीर झाला आहे.
 • प्राजना चौथा यांना सुरुवातीपासून हत्तींमध्ये स्वारस्य आहे. दोन दशके त्या हत्तींवर संशोधन करीत आहेत. कर्नाटकातील नागरहोल येथे त्या पाच हत्तींबरोबरच राहतात.
 • त्यांनी हत्तींशी नाते जोडताना आने माने फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. त्याचा उद्देश आशियायी हत्तींचे संवर्धन हा आहे.
 • ‘द ओल्ड एलिफंट रूट’ हा चित्रपट त्यांनी भारत-म्यानमार सीमेवर हत्तींच्या स्थलांतर मार्गावर केलेल्या संशोधनावर चित्रित केला आहे.
 • प्राजना यांचे वास्तव्य भारत, आफ्रिका व युरोपात असे होते. अनेकदा त्यांनी त्यांचे उद्योगपती वडील डी. के. चौथा यांच्याबरोबर जगप्रवासही केला.
 • लंडन विद्यापीठातून त्यांनी मानववंशशास्त्र व कलाइतिहासात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
 • कर्नाटकातील जेनू कुरुबा आदिवासींसमवेत काम करताना त्यांना हत्तींचे संशोधन करावेसे वाटले.
 • आशियन हत्तींचे जतन केले पाहिजे, अन्यथा ते नष्ट होतील, असे त्या सांगतात. भारत व म्यानमार या देशांत एकूण १६ हजार हत्ती आहेत; त्यांच्या संवर्धनावर त्यांचा भर आहे.

आयएनएस अरिहंत नौदलात दाखल

 • भारताने ‘आयएनएस अरिहंत’ ही स्वदेशी बनावटीची पहिली अण्वस्त्रक्षम पाणबुडी ऑगस्ट महिन्यात नौदलात दाखल केली.
 • या पाणबुडीमुळे आकाश, जमीन आणि पाणी या तीनही ठिकाणांहून आण्विक हल्ले करण्याची (आण्विक त्रिशक्ती) क्षमता भारताने साध्य केली.
 • अरिहंत ही भारताची स्वदेशी बनावटीची पहिली अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्र असलेली पाणबुडी आहे.
 • या पाणबुडीवर के-१५ या ७५० किमीपर्यंत अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत.
 • तसेच ३५०० किमीचा पल्ला असलेले के-४ हे क्षेपणास्त्रही पाणबुडीवर तैनात केले जाणार आहे.
 • अण्वस्त्रक्षम पाणबुडी सध्या भारतासह केवळ अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटनकडे आहेत. 
 ‘अरिहंत’ची वैशिष्ट्ये 
 • वजन : ६००० टन
 • वेग : २२ नॉटिकल मैल/तास
 • लांबी : १०४ मीटर
 • रुंदी : १० मीटर
 • रिऍक्टर क्षमता : ८३ मेगावॉट
 • हल्ला करण्याची क्षमता : ३५०० किमीपर्यंत 

भारतीय टीव्ही आणि रेडिओ चॅनेल्सवर पाकिस्तानमध्ये बंदी

 • भारतीय टीव्ही आणि रेडिओ चॅनेल्सवर २१ ऑक्टोबरपासून पुर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने घेतला आहे.
 • जो कोणी रेडिओ आणि टीव्ही स्टेशन बंदीचे उल्लंघन करेल त्यांना कोणतीही नोटीस न देता परवाना रद्द करण्यात येणार आहे.
 • भारताशी संबंधित कोणतेच कार्यक्रम, सिरिअल आणि चित्रपट यामुळे दाखवण्यात येणार नाही आहेत.
 • भारतीय मीडियाला देण्यात आलेले हक्कदेखील काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवेज मुशर्रफ यांचे सरकार असताना २००६मध्ये हे हक्क देण्यात आले होते. 
 • १८ सप्टेंबरला झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना आणि त्यांच्या चित्रपटांना विरोध होत आहे.
 • भारत आणि पाकिस्तान दरम्यान सध्या असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ही बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना नोटीस

 • पनामा पेपर्स लीक प्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना नोटीस बजावली आहे.
 • फेडरल ब्युरो ऑफ रेव्हेन्यू (एफबीआर)ने नोटीस बजावण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये शरीफ यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे.
 • शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाने बेकायदेशीरपणे देशाबाहेर पैसा पाठवल्याचे पनामा पेपर्सच्या माध्यमातून उघड झाले आहे.
 • एप्रिलमध्ये उघड झालेल्या पनामा पेपर्स लीकमुळे जगभरात खळभळ उडाली होती. या कागदपत्रांनुसार पनामा येथील मोसाक फोन्सेका ही कंपनी जगभरातील धनाढ्यांच्या कंपन्यांचे व्यवहार सांभाळत असे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा