चालू घडामोडी : ८ नोव्हेंबर

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद

 • ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबर मध्यरात्रीपासून चलनातून बंद करण्यात आल्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला.
 • बनावट नोटा आणि दहशतवादी कारवायातील त्यांची भूमिका, तसेच काळा पैसा यांना आळा घालण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे.
 पाचशे आणि हजारच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया 
 • १० नोव्हेबर ते ३० डिसेंबरपर्यंत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बँक आणि पोस्ट कार्यालयात जमा कराव्या लागणार आहेत.
 • हा कालावधी एकूण ५० दिवसांचा असून किती नोटा जमा करता येतील यावर कोणतेही बंधन नाही.
 • परंतु १० ते २४ नोव्हेंबर या काळात नागरिकांना प्रतिदिन ४००० रुपयांच्या नोटाच बॅंका किंवा पोस्टामध्ये कमी रकमेच्या नोटांमध्ये बदलून मिळतील.
 • नागरिकांना नोटा जमा करताना ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड) सादर करणे अनिवार्य आहे.
 • नोटांची अंतर्गत अदलाबदल करण्यासाठी आणि नवीन व्यवस्था लावण्यासाठी ९ नोव्हेंबरला देशातील सर्व बॅंका व सर्व एटीएमही बंद राहणार.
 • एटीएम सुरू झाल्यावर सुरुवातीला प्रतिदिन २००० रुपयेच काढता येणार. नंतर ही मर्यादा ४००० रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल.
 • ज्या नागरिकांनी ३० डिसेंबरपर्यंत त्यांच्याकडील ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बॅंकेत जमा केलेल्या नाहीत. त्यांना ३१ मार्च २०१७ पर्यंत रिझर्व्ह बॅंकेत प्रतिज्ञापत्र सादर करून या नोटा जमा करण्याची संधी मिळणार आहे.
 ५०० आणि २००० रुपयांच्या नवीन नोटा 
 • एक हजाराच्या नोटा चलनातून पूर्णपणे बंद होणार असून, ५०० रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येतील. तसेच २००० रुपयांची नोटही चलनात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
 • त्यामुल्के आता दोन हजारांची नोट हे देशातील सर्वाधिक किंमत असलेले चलन असेल. 
 • याआधी दहा हजारांची नोट जारी करण्यात आली होती. मात्र १९४६मध्ये ती परत घेण्यात आली.
 • लवकरच या नवीन नोटा बँकांच्या सर्वसाधारण शाखांमध्ये उपलब्ध होतील. त्यानंतर या नोटा लोकांना एटीएममध्येदेखील मिळतील.
 • नव्या पाचशेच्या हिरव्या रंगाच्या नोटेच्या दर्शनी भागावर प्रथमच देवनागरीमध्ये ५००चा आकडा असून, पाठीमागील बाजूस लाल किल्ल्याचे चित्र आहे.
 • तर नव्या दोन हजाराच्या नोटेच्या पाठीमागील भागावर मंगलयानाचे चित्र आहे. या नोटेचा रंग गुलाबी आहे. यातही दर्शनी भागावर देवनागरीमध्ये २०००चा आकडा असेल.
 • दोन्ही नोटांच्या दर्शनीय भागात महात्मा गांधीचे उजव्या बाजूला तोंड असणारे छायाचित्र असणार आहे. यापूर्वीचे छायाचित्र हे डाव्या बाजूला तोंड करून होते.
 • दोन्ही नोटांवर स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह आहे. या नव्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेच्या नाशिकच्या छापखान्यात सुरू आहे.
 • या नोटांवर सुरक्षाचिन्हे अशा रीतीने छापण्यात आली आहेत, की त्यामुळे त्यांची नक्कल करणे शक्य होणार नाही.
 या निर्णयाचे परिणाम 
 • बनावट नोटांवर नियंत्रण: बनावट नोटांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होते. मोदी सरकारकडून या नोटाच रद्द करण्यात आल्याने बनावट नोटांना आळा बसू शकतो.
 • काळ्या पैशांना चाप लागणार: बेहिशोबीरित्या या नोटा बाळगणाऱ्या लोकांना त्यांच्याकडील नोटा जमा करताना त्याबद्दलचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. त्यामुळे काळ्या पैशांना चाप बसेल.
 • नेट बँकिंग, डेबिट कार्ड, धनादेशांच्या वापराला चालना: आता प्लास्टिक मनीचा अधिकाधिक वापर होईल. यामुळे अनेक व्यवहार कायद्याच्या चौकटीत येतील. त्यामुळे बेकायदेशीर व्यवहारांना आळा बसेल.
 • नेट बँकिंग, डेबिट-क्रेडिट कार्ड, धनादेश यांचा वापर यापुढे वाढेल. त्यामुळे बनावट नोटा सहजासहजी चलनात येऊ शकणार नाहीत.
 नोटा चलनातून बंद करण्याचा इतिहास 
 • भारतात स्वातंत्र्यापूर्वीपर्यंत म्हणजे १९४६पर्यंत १० हजार रुपयांची नोट होती. नंतर ती बाद करण्यात आली.
 • या सरकारने १९५४ साली १० हजार रुपयांची नोट पुन्हा चलनात आणली सोबतच ५ हजार रुपयांचीही नोट जारी करण्यात आली..
 • मार्च १९७७मध्ये मात्र मोरारजी देसाई यांचे सरकार आले व या सरकारने लगेच १९७८साली ५ हजार व १० हजाराच्या नोटा रद्द करण्याच निर्णय घेतला.
 • रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत छापलेली सर्वात मोठी नोट दहा हजार रुपयांची असून १९३८ आणि त्यानंतर १९५४मध्ये या नोटेची छपाई करण्यात आली होती.
 • ऑक्टोबर १९८७ मध्ये ५०० रुपयांची नोट चलनात आणण्यात आली तर नोव्हेंबर २०००मध्ये १००० रुपयांची नोट पुन्हा जारी झाली.
 • आता २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात येणार असून, या मूल्याची नोट देशाच्या इतिहासात प्रथमच वापरात येणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या काळात रोजगार क्षमतेत वाढ

 • ‘इंडिया स्किल्स’च्या सर्व्हेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात देशात रोजगार क्षमतेत आश्चर्यकारक वाढ झाली आहे.
 • २०१४ च्या सुरुवातीला म्हणजेच युपीए सरकारच्या काळात रोजगार क्षमता ३३.९ टक्के होती. ती ४०.४ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
 • २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीच्या तुलनेत २०१५ मध्ये रोजगार क्षमता ३७.२ टक्के होती. २०१६ मध्ये त्यात ३८.१ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
 • विशेष म्हणजे रोजगार क्षमतेत महिलांनी पुरुषांनाही मागे टाकले आहे. सर्व्हेक्षणानुसार, ४१ टक्के महिला नोकरी मिळवू शकतात. तर ४० टक्केच पुरुष नोकरी मिळवू शकतात.
 • हा सर्व्हे पिपल स्ट्रॉंग, कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, लिंक्डइन, यूएनडीपी, व्हीबॉक्स, असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी, ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन या सहकार्यातून करण्यात आला आहे.
 • देशात रोजगार देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांचा क्रमांक लागतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा