चालू घडामोडी : १२ नोव्हेंबर

जपानचा भारतासोबत ऐतिहासिक अणूकरार

 • जपानने भारतासोबत अणुऊर्जेच्या शांततापूर्ण उपयोगात सहकार्य करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. भारतासोबत अणूकरार करणारा जपान हा ११वा देश आहे.
 • त्यामुळे भारताला जपानकडून अणुऊर्जेच्या उत्पादनासाठी आवश्यक इंधन, उपकरणे आणि तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यातील शिखर बैठकीनंतर दोन्ही देशांनी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली.
 • यामुळे अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर (एनपीटी) स्वाक्षरी न केलेला भारत असा पहिला देश ठरला आहे ज्याच्याशी जपानने नागरी अणुसहकार्य करार केला.
 • या करारामुळे अणुऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून देशाची विजेची गरज भागवून भारताला विकासाच्या मार्गावर मोठी मजल मारता येणार आहे.
 • या करारामुळे जपानबरोबरील आर्थिक आणि संरक्षण संबंधांना बळकटी येणार असून, अमेरिकेतील कंपन्यांनाही भारतात अणुभट्ट्या उभारता येणार आहेत.
 • या कराराशिवाय दोन्ही देशांदरम्यान अंतराळासह विविध क्षेत्रांत इतरही नऊ करार झाले. तसेच जपानने अणू पुरवठादार गटात (NSG) भारताच्या कायम सदस्यत्वाचेही समर्थन केले आहे.
 • अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, मंगोलिया, फ्रान्स, नामिबिया, अर्जेंटिना, कॅनडा, कझाकस्तान आणि ऑस्ट्रेलिया या देशांनीही भारताबरोबर नागरी अणू करार केले आहेत.

डिश टीव्हीद्वारे व्हिडीओकॉन डी२एचचे अधिग्रहण

 • देशातील सर्वात मोठी डायरेक्ट-टू-होम (डीटीएच) प्रसारण सेवा असलेल्या डिश टीव्हीने याच क्षेत्रातील व्हिडीओकॉन डी२एच ही कंपनी विलीन करून घेत असल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.
 • उभयतांनी एकीकृत सेवा म्हणून कार्य करण्याला मंजुरी दिली असून, त्यांचा एकत्रित ग्राहक पाया २.७६ कोटी इतका विस्तारणार आहे.
 • या विलीनीकरणानंतर एकत्रित कंपनीचे डिश टीव्ही व्हिडीओकॉन लिमिटेड असे नामकरण केले जाईल.
 • डिश टीव्हीचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक जवाहर गोएल हे नव्या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेतृत्व करतील.
 • नव्या कंपनीत डिश टीव्हीचा ५५.४ टक्के तर उर्वरित ४४.६ टक्के भांडवली वाटा हा व्हिडीओकॉन डी२एचच्या विद्यमान भागधारकांचा असेल.
 • डिश टीव्ही ही भारताच्या भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपनी असून, व्हिडीओकॉन डी२एच ही अमेरिकेतील नॅसडॅक शेअर बाजारात सूचिबद्ध आहे.

संजय घोडावत प्रायव्हेट पायलट परीक्षा उत्तीर्ण

 • ‘संजय घोडावत ग्रुप’चे चेअरमन संजय घोडावत हे प्रायव्हेट पायलट परीक्षा उत्तीर्ण झाले असून, यानंतर त्यांचे पायलट ट्रेनिंग अमेरिकेतील फ्लायिंग स्कूलमध्ये होणार आहे.
 • ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांना इंटरनॅशनल प्रायव्हेट पायलट लायसन्स मिळणार असून, स्वत:चे हेलिकॉप्टर चालविणारे घोडावत हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे पायलट म्हणून ओळखले जाणार आहेत.
 • घोडावत यांनी औद्योगिक क्षेत्रामध्ये ३० वर्षे उत्कृष्टरीत्या त्यांच्या विविध कंपन्यांचे नेतृत्व करून यशस्वी उद्योगपतीची भूमिका पार पाडली आहे.
 • ते स्वत: मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. उद्योग व शिक्षण क्षेत्रांत त्यांनी उभारी घेऊन आपले प्रचंड नावलौकिक मिळविले आहे.
 • ‘संजय घोडावत ग्रुप’च्या माध्यमातून त्यांनी घोडावत एन्टरप्रायझेस प्रा. लि. ह्या हवाई वाहतूक कंपनीची उभारणी केली.
 • या कंपनीकडे दोन हेलिकॉप्टर्स असून, भविष्यात ई सी १३५ व ई आर जे १३५ या दोन अद्ययावत विमानाच्या साहाय्याने हवाई वाहतुकीचा त्यांचा मानस आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा