चालू घडामोडी : ८ डिसेंबर

टाइम पर्सन ऑफ द इअर २०१६: डोनाल्ड ट्रम्प

 • ब्रिटीश नियतकालिक टाइमने पर्सन ऑफ द इअर २०१६ म्हणून अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड केली आहे.
 • ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिन्टन या पर्सन ऑफ द इअर स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर द हॅकर हा ग्रुप तिसऱ्या स्थानी आहे.
 • टाईम मासिकाकडून दरवर्षी जगातील परिस्थितीवर चांगल्या किंवा वाईट प्रकारे प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
 • अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत अनपेक्षित यश मिळविणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन, ब्लादिमिर पुतीन, मार्क झुकरबर्ग, नरेंद्र मोदी यांना मागे टाकत हा सन्मान मिळविला.
 • आतापर्यंत १० वेळा ट्रम्प यांचा फोटो टाइमच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध झाला आहे. सर्वप्रथम १९८९मध्ये त्यांचा फोटो मुखपृष्ठावर छापण्यात आला होता.
 टाइम पर्सन ऑफ द इअर 
 • टाइम या नियतकालिकाने १९२७पासून पर्सन ऑफ द इअर हा सन्मान देण्यास सुरुवात केली. तेव्हा या सन्मानाला मॅन ऑफ द इअर म्हटले जात होते.
 • १९२७मध्ये चार्ल्स लिंडबर्ग यांना हा सन्मान देण्यात आला होता. लिंडबर्ग यांनी एकट्याने अटलांटिकवरून विमान प्रवास केला होता.
 • तेव्हापासून आतापर्यंत केवळ एकाच भारतीय व्यक्तीला (१९३०मध्ये महात्मा गांधी) पर्सन ऑफ द इअर सन्मान मिळाला आहे.
 • दांडी यात्रा आणि मीठाचा सत्याग्रह या कारणांमुळे महात्मा गांधी यांची निवड पर्सन ऑफ द इअर म्हणून झाली होती.
 • अहिंसेच्या मार्गाने आतापर्यंत झालेले सर्वात मोठे आणि प्रभावी आंदोलन म्हणून दांडी यात्रेकडे पाहिले गेले होते. त्यामुळेच गांधींजींना हा सन्मान मिळाला होता.
 • २०१५मध्ये जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांची टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली होती.
 • अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे २००८ आणि २०१२ मध्ये टाइम पर्सन ऑफ द इअर ठरले होते.

‘रिसोर्स सॅट २ ए’चे यशस्वी प्रक्षेपण

 • भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) ७ डिसेंबर रोजी रिसोर्स सॅट २ ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
 • श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून पीएसलव्ही सी-३६ या प्रक्षेपकाद्वारे रिसोर्स सॅट २ ए उपग्रह आकाशात सोडण्यात आला.
 रिसोर्स सॅट २ ए 
 • या उपग्रहाचे वजन १,२३५ किलो असून तो पृथ्वीच्या कक्षेत ८१७ किलोमीटर अंतरावर फिरत राहणार आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ ५ वर्षे असेल.
 • या उपग्रहाद्वारे जागतिक वापरकर्त्यांना रिमोट सेन्सिंग डेटा सुविधा पुरविली जाईल.
 • सॅट-२ए हा उपग्रह मुख्यत्वे पृथ्वीवरील वनसंपदा, जलसंसाधने आणि खनिजे या नैसर्गिक साधनसंपत्ती आणि स्त्रोतांची माहिती गोळा करण्याचे काम करतो.
 • या उपग्रहाने पुरविलेल्या माहितीच्याआधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे नियोजन करण्यास मदत होते.
 • या उपग्रहात तीन कॅमेरे बसवण्यात आले असून त्यातून मिळणाऱ्या प्रतिमा या कृषिक्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहेत
 • या प्रतिमांच्या आधारे शेतीचे क्षेत्र, माती परीक्षण, अंदाजित पीक, दुष्काळाची व्याप्ती आदी महत्त्वपूर्ण गोष्टी समजण्यास मोलाची मदत होईल.
 • रिसोर्ससॅट हा जगातल्या उत्तम रिमोट सेन्सिंग उपग्रहांपैकी एक आहे. जगातील अनेक देशांना या उपग्रहामार्फेत सेवा पुरविण्यात येते.
 • रिसोर्स सॅट श्रेणीतील हा तिसरा उपग्रह आहे. यापूर्वी २००३ मध्ये रिसोर्ससॅट-१ आणि २०११ मध्ये रिसोर्ससॅट-२ हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते.
 • आता या दोन्ही उपग्रहांची कालमर्यादा संपुष्टात आल्याने रिसोर्स सॅट २ ए त्यांची जागा घेणार आहे.
 पीएसएललव्ही 
 • इस्त्रोच्या पीएसएललव्ही प्रक्षेपकाची अवकाशात यशस्वीपणे उपग्रह सोडण्याची ही ३८वी वेळ आहे.
 • गेल्या १८ वर्षांत भारताने पीएसएलव्हीच्या माध्यमातून ३६ यशस्वी प्रक्षेपणांतून १२१ उपग्रह अंतराळात सोडले आहे. यापैकी ७९ उपग्रह परदेशी होते.

ज्येष्ठ राजकीय पत्रकार चो रामास्वामी यांचे निधन

 • ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि भाजपचे माजी राज्यसभा खासदार श्रीनिवास अय्यर रामास्वामी ऊर्फ चो रामास्वामी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.
 • उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असणारे चो रामास्वामी ‘तुघलक’ या तामिळ राजकीय नियतकालिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते.
 • तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याशी त्यांची मैत्री होती. त्यांच्याशी त्या राजकीय सल्लामसलतदेखील करत.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. मोदी त्यांना ‘राज गुरु’ असे संबोधत.
 • चो यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला होता. त्यांनी वकिलीचा अभ्यास केला होते. त्यांच्या 'थेन्मोझियल' नाटकातल्या पात्रावरून त्यांना ‘चो' हे नाव पडले.
 • महाविद्यालयीन जीवनात ते एका नाटकाच्या ग्रुपमध्ये सक्रीय होते. तेथे त्यांची जयललिता यांच्याशी मैत्री झाली.
 • चो यांनी मद्रास उच्च न्यायालयात सहा वर्षे वकिली केली. नंतर टीटीके ग्रुपचे विधी सल्लागार म्हणून काम पाहिले.
 • त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांनी २०० सिनेमांत अभिनय केला आहे. २३ नाटके आणि १४ सिनेमाचे संवादलेखन केले आहे तर ४ सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे.
 • पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिल्या जाणारा ‘फिरोज गांधी स्मृती’ पुरस्कार त्यांना मिळाला होता.

आरबीआयचे पाचवे द्वैमासिक पतधोरण

 • यंदाच्या आर्थिक वर्षातील हे पाचवे द्वैमासिक पतधोरण जाहीर करताना रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.
 • त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. तसेच रिव्हर्स रेपो रेट ५.७५ टक्के, तर बँक रेट ६.७५ टक्के कायम ठेवण्यात आला आहे.
 • नोटाबंदीनंतर बॅंकांतील ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे रेपो दरात आरबीआय कपात करेल अशी आशा होती. मात्र, तसे झालेले नाही.
 • बॅंकांमध्ये ठेवी वाढल्याने रिझर्व्ह बॅंकेने २८ नोव्हेंबर सीआरआर तात्पुरत्या स्वरूपात शंभर टक्क्यांवर नेला होता.
 • चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत किरकोळ महागाईचा दर ५ टक्के इतका राहण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेने वर्तविली आहे.
 • पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर हे पहिलेच पतधोरण आहे. तर पतधोरण समितीच्या शिफारशीवर आधारित हे दुसरे पतधोरण आहे. 
 • गेल्या पतधोरण आढाव्यापासून सरकारने ६ सदस्यीय पतधोरण समिती नियुक्त केली असून तिचे अध्यक्षपद आरबीआय गव्हर्नरांकडे देण्यात आले आहे.
 • समितीतील गव्हर्नर वगळता अन्य पाच सदस्यांना व्याजदराबाबत निर्णय अधिकार आहेत. गव्हर्नरना केवळ अधिक मतांच्या बाजुने कौल द्यावयाचा आहे.
 • ऊर्जित पटेल यांनी त्यांच्या पहिल्या त्यांच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात ०.२५ टक्के कपात करून तो ६.२५ टक्क्यांवर आणला होता.
 रेपो रेट 
 • रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून अल्पमुदतीची कर्जे घेते तो दर.
 • रेपो रेट वाढल्यास बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होते, तर रेपो रेट कमी झाल्यास बँकेला स्वस्तात कर्ज मिळते.
 • त्यामुळे रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर हा दर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
 रिव्हर्स रेपो रेट 
 • बँका त्यांच्याकडे असलेला जास्तीचा निधी ठेवींच्या रुपात रिझर्व बँककडे जमा करतात. या ठेवींवर रिझर्व्ह बँक बँकांना देत असलेल्या व्याजदराला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा