चालू घडामोडी : १८ डिसेंबर

ज्युनिअर भारत संघ हॉकी विश्वविजेता

 • भारताच्या ज्युनिअर हॉकी संघाने बेल्जियमला २–१ ने पराभवाची धूळ चारून ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.
 • १५ वर्षांनंतर भारताने ही कामगिरी करून नवा इतिहास रचला आहे. याआधी ऑस्ट्रेलियातील होबार्ट येथे २००१मध्ये भारताने विश्वचषक जिंकला होता. 
 • ज्युनिअर हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचा हा अंतिम सामना लखनौतील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये भारत आणि बेल्जियम या संघांमध्ये झाला.
 • ८व्या मिनिटाला गुरूजंत सिंग आणि २२व्या मिनिटाला सिमरनजित सिंगने केलेले गोल भारताच्या विजयात निर्णायक ठरले.

बिपिन रावत भारताचे नवे लष्करप्रमुख

 • भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली आहे.
 • सध्याचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे या महिनाअखेरीस निवृत्त होत असून, रावत हे त्यांची जागा घेतील.
 • मुळचे उत्तराखंडयेथील बिपिन रावत यांनी १ सप्टेंबर २०१६ रोजी लष्कराच्या उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला होता.
 • त्यांनी डेहराडून येथील भारतीय सैन्य अकादमी (आयएमए)मधून पदवी मिळवली आहे. त्यांना ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ किताब प्राप्त झालेला आहे.
 • १९७८मध्ये ११ गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमधून रावत यांनी लष्करातील सेवेस सुरवात केली होती.
 • रावत यांना उंचावरील लढायांचा आणि घुसखोरीविरोधी मोहिमांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी चीन व पाकिस्तान सीमेवरील भारतीय तुकड्यांचे नेतृत्व केले आहे.
 • रावत यांच्याहून वरिष्ठ असलेल्या दोन अधिकाऱ्यांना डावलून त्यांना लष्कर प्रमुखपद दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
 • १९७२मध्ये इंदिरा गांधी सरकारने लेफ्टनंट जनरल पी. एस. भगत या ज्येष्ठ सैन्याधिकाऱ्याऐवजी सॅम माणेकशॉ यांची नेमणूक केली होती.
 • तर, १९८३मध्ये लेफ्टनंट जनरल एस. के. सिन्हा यांच्याऐवजी अरुणकुमार वैद्य यांच्यावर लष्करप्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
 बी. एस. धनोआ नवे हवाई दलप्रमुख 
 • नवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचेही नाव सरकारने जाहीर केले आहे.
 • हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा हे ३१ डिसेंबरला निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी धनोआ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • धानोआ सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. कारगिल युद्धावेळी रात्रीच्या अनेक मोहिमांमध्येही त्यांनी थेट सहभाग घेतला आहे.

‘रॉ’च्या प्रमुखपदी अनिलकुमार धस्माना

 • भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुप्तचर संघटना रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ)च्या प्रमुखपदी अनिलकुमार धस्माना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • ते १ जानेवारी २०१७ ला नवी जबाबदारी स्वीकारतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाल मिळणार आहे.
 • धस्माना हे १९८१च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्याचे ‘रॉ’ प्रमुख राजेंद्र खन्ना यांची जागा घेतील.
 • ते मध्य प्रदेश केडरचे असून केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात विशेष सचिव होते. त्यांनी रॉमध्ये २३ वर्षे सेवा बजावली आहे.

आयबीच्या प्रमुखपदी राजीव जैन

 • देशांतर्गत गुप्तचर संघटना इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या प्रमुखपदी केंद्र सरकारने राजीव जैन यांची नियुक्ती केली आहे.
 • ते १ जानेवारी २०१७ला नवी जबाबदारी स्वीकारतील. त्यांना दोन वर्षांचा कार्यकाल मिळणार आहे.
 • राजीव जैन हे १९८०च्या बॅचचे झारखंड केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते सध्या ‘आयबी’मध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत आहेत.
 • ‘आयबी’चे प्रमुख दिनेश्वर शर्मा हे महिनाअखेरीस निवृत्त होत असून, त्यांनी केंद्र सरकारने देऊ केलेली मुदतवाढ नाकारली आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये १०० टक्के आधार नोंदणी

 • नवी दिल्ली, तेलंगणा, हरियाना, पंजाब, चंदिगडनंतर आता हिमाचल प्रदेशही शंभर टक्के आधार नोंदणी असलेले राज्य ठरले अहे.
 • हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत ७२,५२,८८० जणांनी आधार नोंदणी केली आहे. 
 • आधार नोंदणीची २०१५च्या जनगणनेच्या आकड्याशी तुलना केली जाते. या आधारे देशातील एकूण ६ राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्ये ठरली आहेत.
 • हिमाचल प्रदेशमध्ये २४० कायमस्वरुपी आधार नोंदणी केंद्रे उभारण्यात आली आहेत.
 • या केंद्रामध्ये नव्याने आधार नोंदणीसह, पूर्वी नोंदणी केलेल्या आधारमध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

शरद पवार यांचा एमसीए अध्यक्षपदाचा राजीनामा

 • लोढा समितीच्या शिफारशीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 • लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसाठी ७० वर्षांची कमाल मर्यादा निश्चित केली आहे.
 • तसेच राजकीय व्यक्तींना संघटेनेच्या अध्यक्षपदी राहण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच एका पदाधिकाऱ्याला जास्तीत जास्त दोन कालावधीसाठी पदाधिकारी होता येते.
 • शरद पवार हे यापूर्वी दोनवेळा एमसीएचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी २०१० ते २०१२ या कालावधीत आयसीसीचे चेअरमन म्हणूनही कामगिरी बजावली होती.
 • या शिफारशींनुसार शरद पवार एमसीएचे अध्यक्षपद भुषविण्यास अपात्र ठरतात. शरद पवारांचे वय ७६ वर्ष असून त्यांनी याआधी दोनवेळा एमसीएचे अध्यक्षपद भुषविले आहे.
 • एमसीएने लोढा समितीच्या शिफारशी स्विकारण्याचा निर्णय घेतला तर त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागेल. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता आहे.

फ्रान्सिस चेकाचा विजेंदर सिंगकडून पराभव

 • भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने टांझानियाच्या फ्रान्सिस चेका याचा पराभव करत ‘आशिया-पॅसिफिक सुपर मिडलवेट’चे अजिंक्यपद कायम राराखले आहे.
 • विजेंदरने याच वर्षी ऑस्ट्रेलियाच्या कॅरी होप याचा पराभव करत हा किताब मिळवला होता.
 • एकूण १० फेऱ्यांच्या या सामन्यामध्ये विजेंदरने तिसऱ्याच फेरीत चेका याला निर्णायक ठोसा लगावत पराभूत केले.
 • सामन्याच्या सुरुवातीस चेका याने आक्रमक खेळ केला. मात्र विजेंदरने आश्वासक खेळ करत चेकाला वेगवान व नेमक्या ठोशांनी जेरीस आणले.
 • या सामन्यापूर्वी चेकाकडे ४३ व्यवसायिक सामन्यांचा अनुभव होता. त्यापैकी ३२ सामन्यात त्याने विजय मिळवला होता.

व्हेनेझुएलाचा नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर

 • व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर टाकला असून आता जानेवारीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
 • व्हेनेझुएला सरकारने १२ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून देशातील सर्वाधिक मूल्याची शंभर बोलिव्हरची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
 • बँकांमध्ये झालेली गर्दी, नोटांची कमतरता आणि देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • सरकारने १०० बोलिव्हरची नोट रद्द करून ५००, २००० आणि २०,००० बोलिव्हरची नवी नोट बाजारात आणली होती. तसेच नोटा बदलून घेण्यासाठी फक्त ७२ तासांचा वेळ देण्यात आला होता. 
 • देशातील काळ्या पैशांचा बाजार रोखण्यासाठी व्हेनेझुएलाच्या सरकारने हा निर्णय घेतला होता.
 • व्हेनेझुएला सध्या गंभीर अर्थसंकटात सापडली असून, सध्या याठिकाणी जगातील सर्वाधिक महागाई आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा