चालू घडामोडी : २८ डिसेंबर

विरल व्ही. आचार्य आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर

  • केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक विरल व्ही. आचार्य यांची नियुक्ती केली आहे.
  • उर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यानंतर रिक्त झालेल्या डेप्युटी गव्हर्नरपदी आचार्य यांची तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
  • देशाचे पतधोरण निश्चित करताना आता एन एस विश्वनाथन, एस एस मुंद्रा, आर गांधी या इतर तीन डेप्युटी गव्हर्नरबरोबर आचार्य यांचाही सहभाग असेल.
  • आचार्य हे न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेस येथे २००८पासून प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत.
  • आचार्य यांनी १९९५मध्ये मुंबई आयआयटीतून कम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगमधील पदवी प्राप्त केली आहे. २००१मध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून त्यांनी पीएचडी पूर्ण केली आहे.
  • २००१ ते २००८ या कालावधीत त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापनही केले आहे. त्यांनी बँक ऑफ इंग्लंडमध्येही काम केले आहे.
  • बँका आणि वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट कर्जाचे मूल्यांकन यासारख्या विषयांमध्ये आचार्य यांनी संशोधन केले आहे.
  • अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. नुकताच त्यांना आर्थिक क्षेत्रातील उभरते नेतृत्व म्हणून पुरस्कार मिळाला आहे.
  • आचार्य यांना संगीतक्षेत्रातही रस असून त्यांनी संगीतबद्ध केलेला एक अल्बमही बाजारात आला आहे. यातील गीते ऋषिकेश व प्राजक्ता रानडे यांनी गायली आहेत.

जुन्या नोटा बाळगल्यास दंडात्मक कारवाई

  • १० पेक्षा अधिक ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा जवळ बाळगल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
  • या बैठकीत यासंदर्भातील वटहुकूम जारी करण्यास मंजुरी देण्यात आली असून, हा वटहुकूम लवकरच राष्ट्रपतींकडे पाठवला जाणार आहे.
  • या अध्यादेशानुसार ३० डिसेंबरनंतर जुन्या नोटा बाळगणाऱ्यांना १० हजार रुपये दंड किंवा जप्त रकमेच्या पाच पट रक्कम यापैकी जी जास्त रक्कम असेल तितका दंड आकारला जाईल.
  • या प्रकरणात कोणत्याही तुरुंगवासाची तरतूद करण्यात आलेली नसून, याप्रकरणातील किमान दंड १० हजार रुपये असणार आहे.
  • पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
  • नोटाबंदीच्या ५० दिवसांत आतापर्यंत बँकांमध्ये ९० टक्के म्हणजे १४ लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. उर्वरित १० टक्के रक्कम अद्याप जमा होऊ शकलेली नाही.

दिल्लीच्या नायब राज्यपालपदी अनिल बैजल

  • नजीब जंग यांनी दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा दिलेला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना मंजूर केला आहे.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने या पदासाठी आता अनिल बैजल यांची यांचे नाव सुचविले असून आता राष्ट्रपतींनीही त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे बैजल हे दिल्लीचे २१वे नायब राज्यपाल असतील.
  • कार्यकाळ पूर्ण होण्यास १८ महिने बाकी असताना नजीब जंग यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता.
  • ७० वर्षीय बैजल हे १९६९च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात बैजल यांनी गृहसचिव म्हणून काम केले होते.
  • केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले असून नगर विकास मंत्रालयातील सचिवपदावरुन ते २००६मध्ये निवृत्त झाले होते.
  • दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ‘विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन’ या थिंक-टॅंकचेही ते सदस्य होते.
  • जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियान (जेएनएनयूआरएम) या मोहीमेची संकल्पना आणि अंमलबजावणीत बैजल यांचा मोलाचा वाटा होता.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे निधन

  • मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे २८ डिसेंबर रोजी हृदयविकाराने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
  • केंद्रीय मंत्री राहिलेल्या सुंदरलाल पटवा यांनी मध्यप्रदेशचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.
  • सुंदरलाल पटवा यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२४ मध्ये झाला होता. त्यांनी आपली राजकीय कारकिर्दीची सुरूवात जनसंघापासून केली होती.
  • १९७७मध्ये ते जनता पार्टीशी जोडले गेले. पटवा हे १९७७मध्ये छिंदवाडामधून पोटनिवडणूक लढवून खासदार झाले होते.
  • १९९८मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

‘स्टार वॉर्स’ फेम अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन

  • १९७७साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटातील प्रिन्सेस लेया म्हणून नावारुपास आलेल्या अभिनेत्री कॅरी फिशर यांचे निधन झाले आहे.
  • १९७५मध्ये अभिनेता वॉरन बिटीसोबतच्या ‘शॅम्पू’ या चित्रपटाद्वारे फिशर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.
  • या सुपरहिट चित्रपटानंतर कॅरी फिशर यांनी ऑस्टिन पॉवर्स, द ब्लूस ब्रदर्स, चार्लिज एन्जेल्स, हॅना अॅण्ड हर सिस्टर्स, स्क्रिम ३ आणि व्हेन हॅरी मेट सॅली अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते.
  • १९७७साली प्रदर्शित झालेल्या ‘स्टार वॉर्स’ या चित्रपटाने कॅरी फिशर यांनी विशेष लोकप्रियता मिळाली.
  • त्यांची ही भूमिका आणि 'हेल्प मी ओबी वन, यु आर माय ओन्ली होप' हा संवाद आजही चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहे.
  • हॉलिवूडपटांमध्ये धीट, सक्षम आणि काहीशा चिडखोर स्वभावाच्या व्यक्तिरेखा साकारण्याला फिशर यांनी प्राधान्य दिले होते.
  • गेल्या बऱ्याच काळापासून फिशर व्यसनाच्या आहारी गेल्या होत्या. त्यासोबतच त्यांचे मानसिक संतुलनही बिघडले होते. त्यांच्यावर उपचारही सुरु होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा