चालू घडामोडी : ३१ डिसेंबर

भारत इंटरफेस फॉर मनी अ‍ॅपचे उद्घाटन

  • मोबाइल आणि अंगठय़ाचा ठसा एवढीच आवश्यकता असणारे आधार क्रमांकावर आधारलेल्या ‘भीम’ नावाच्या पेमेंट अ‍ॅपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० डिसेंबर रोजी उद्घाटन केले.
  • ‘भारत इंटरफेस फॉर मनी’ असे या अ‍ॅपचे पूर्ण नाव आहे. पण त्यावरून ‘भीम’ असे राजकीयदृष्टय़ा सूचक असणारे नामाभिधान मोदींनी केले आहे.
  • याद्वारे ‘लेस कॅश’ मोहिमेला थेट राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे.
 ‘भीम’ अ‍ॅपबद्दल 
  • दोन आठवडय़ांत हे अ‍ॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. तूर्तास अ‍ॅपवरून ३० बँकांचे व्यवहार होऊ शकतात.
  • सध्या हे अ‍ॅप फक्त अँड्रॉइडवर उपलब्ध असून युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय)च्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करते.
  • त्यासाठी कोणताही प्रक्रिया कर नाही. मात्र वापरकर्त्यांची बँक व्यवहारांवरील कर लावू शकते.
  • ‘भीम’वरून व्यवहार करण्यासाठी पैसे पाठविणारा आणि स्वीकारणारा या दोघांचेही ‘यूपीआय’सक्षम बँकेत खाते हवे.
  • वापरणाऱ्याच्या फोनमध्ये मोबाइल बँकिंग सुरू असणे आवश्यक नाही. मात्र वापरणाऱ्याच्या मोबाइल क्रमांकाची नोंद बँकेत असणे गरजेचे.

एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ जानेवारी २०१७पासून एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा २,५०० रुपयांवरून ४,५०० रूपयांपर्यंत वाढविली आहे.
  • परंतु एका आठवड्यात पैसे काढण्याच्या मर्यादेत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. अजूनही ही मर्यादा २४,००० इतकी कायम आहे.
  • नोटाबंदीच्या निर्णयानंतर एटीएममधून तसेच बँक खात्यामधून पैसे काढण्यावर मर्यादा घालण्यात आली होती.
  • नोटाबंदी करून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले आहे.
  • बँकांमध्ये जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जमा करण्याची मुदत ३० डिसेंबरला संपली आहे.

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन निलंबित

  • भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभय सिंग चौताला यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) आजीव अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाने आयओएवर निलंबनाची कारवाई केली आहे.
  • याप्रकरणी क्रीडा मंत्रालयाने ‘आयओए’ला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्याला उत्तर देण्यासाठी ‘आयओए’ला शुक्रवापर्यंतची मुदत दिली होती.
  • या मुदतीमध्ये ‘आयओए’ने क्रीडा मंत्रालयाला उत्तर पाठवले नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
  • आयओएवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यामुळे त्यांचे कामकाज करण्याचे अधिकार राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला देण्यात आले आहेत.
  • जोपर्यंत ‘आयओए’ आपला निर्णय मागे घेत नाही आणि त्यांच्यावरील निलंबन उठत नाही, तोपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक साहाय्य, सुविधा देण्यात येणार नाही.
  • ‘आयओए’ची २७ डिसेंबरला वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेत कलमाडी आणि अभयसिंग चौताला यांची आजीव अध्यक्षपदी  निवड करण्यात आली होती.
  • याच्या निषेधार्थ २९ डिसेंबर रोजी नरेंद्र बात्रा यांनी आयओएच्या सहयोगी उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
  • आयओएचे अध्यक्ष: एन. रामचंद्रन

भारताचा सिंगापूरबरोबर दुहेरी करवसुली प्रतिबंध करार

  • भारताने ३१ डिसेंबर रोजी सिंगापूरबरोबर दुहेरी करवसुली प्रतिबंधाचा सुधारीत करार केला.
  • २०१६ वर्षांच्या सुरुवातीला मॉरिशस व सायप्रसबरोबर भारताने असाच करार केला होता.
  • सुधारीत करारान्वये सिंगापूरस्थित गुंतवणूकदारांना भारतातील भांडवली नफ्यावरील कर सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यामुळे सिंगापूरच्या माध्यमातून तयार होणाऱ्या काळ्या पैशाला पायबंद बसेल.
  • दशकापासून अस्तित्वात असलेल्या जुन्या करारातील सिंगापूरमधून येणाऱ्या गुंतवणुकींकरिता असलेल्या सर्व कर सवलती आता रद्द होणार आहेत.
  • भारतासाठी थेट विदेशी गुंतवणुकीचे मॉरिशस व सिंगापूर हे दोन प्रमुख स्रोत आहेत. भारतातील एकूण एफडीआयपैकी या दोन देशांचा हिस्सा निम्म्याहून अधिक आहे.
  • सिंगापूरमधून होणाऱ्या गुंतवणुकीवरील नफ्यावर कर लागू करण्याची प्रक्रिया नव्या आर्थिक वर्षांत एप्रिल २०१७ पासून सुरू होणार आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ताबदल

  • अरुणाचल प्रदेशातील पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलने (पीपीए) मुख्यमंत्री पेमा खंडू यांच्यासह ६ आमदारांना निलंबित करत तकाम पारियो यांना मुख्यमंत्री घोषित केले होते.
  • त्यानंतर पेमा खंडू यांच्यासह ३३ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे अरुणाचल प्रदेशात भाजपचे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
  • ६० जागांच्या या विधानसभेत आता भाजपची संख्या ४५ आणि दोन अपक्ष अशी ४७ झाली आहे. त्यात भाजपाचे स्वत:चे १२ आमदार आहेत.
  • काँग्रेसचे तीनपैकी दोन आमदारही भाजपाच्या वाटेवर आहेत. त्यांनीही पक्षांतर केले की विधानसभेत पीपीएचे शिल्लक राहिलेले १० व एक अपक्ष एवढे अकराच सदस्य विरोधी बाकांवर असतील
  • अशा प्रकारे पक्षांतराच्या माध्यमातून का होईना भाजपाला ईशान्येकडील राज्यात प्रथमच पूर्ण बहुमताचे स्वत:चे सरकार आणण्यात यश आले आहे.

अमेरिकेची रशियाविरोधात कारवाई

  • अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील हॅकिंगच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने रशियाच्या ३५ राजनैतिक अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
  • याशिवाय रशियाच्या अमेरिकेतील दोन ठिकाणच्या कार्यालयांवर बंदी देखील घालण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील रशियाच्या ३५ राजनैतिक अधिकाऱ्यांना देशात राहण्यास अयोग्य ठरविण्यात आले असून, मेरिलॅंड आणि न्यूयॉर्कमधील रशियाची दोन कार्यालये बंद करण्याचा आदेशही देण्यात आला आहेत.
  • रशियाच्या ‘जीआरयू’ आणि ‘एफएसबी’ या दोन गुप्तचर संस्था आणि या संस्थांना सायबर हल्ल्यांसाठी साहित्याचा पुरवठा करणाऱ्या तीन कंपन्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

चीनमध्ये हस्तीदंत व्यवसायावर बंदी

  • हत्तींच्या सुरक्षतेसाठी हस्तीदंतच्या सर्व प्रकारच्या व्यवसायावर बंदी घालण्याची घोषणा चीनतर्फे करण्यात आली आहे. २०१७ अखेरपर्यंत हस्तीदंताचा सर्व प्रकारचा व्यवसाय बंद होणार आहे. 
  • ऑक्टोबर २०१६मध्ये नामशेष होणाऱ्या प्रजातीबाबत साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या दबावानंतर चीनतर्फे हा निर्णय घेण्यात आला.
  • जगातील हस्तीदंत व्यवसायात चीनचा ७० टक्के सहभाग आहे. यापूर्वी केनिया देशाने एप्रिल २०१६मध्ये १०५ टन हस्तीदंत्त नष्ट केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा