चालू घडामोडी : १९ जानेवारी

प्रगतीशील शहरांच्या यादीमध्ये बंगळुरू प्रथम स्थानी

  • जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) काहीर केलेल्या प्रगतीशील शहरांच्या यादीमध्ये बंगळुरू शहराने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
  • तंत्रज्ञानाचा आणि नाविण्यपूर्ण गोष्टींचा अंगिकार हे मुदे विचारात घेऊन प्रगतीशील शहरांची यादी तयार करण्यात आली आहे.
  • पाणी आणि विजेच्या समस्या असलेले बंगळुरू शहर देशाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची राजधानी समजली जाते. याशिवाय नवउद्यमींसाठी (स्टार्ट अप) बंगळुरूतील वातावरण पोषक समजले जाते.
  • इन्फोसिससारख्या बड्या कंपन्यांची कार्यालये बंगळुरूत असल्याने देशभरातील हजारो तरुण-तरुणी बंगळुरूमध्ये नोकरीसाठी राहतात.
  • बंगळुरुसोबतच हैदराबाद शहरानेही पहिल्या दहा शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. प्रगतीशील शहरांच्या यादीत हैदराबाद पाचव्या स्थानावर आहे.
  • बंगळुरूनंतर प्रगतीशील शहरांच्या यादीत व्हिएतनामच्या हो ची मिन्ह शहराने दुसरे स्थान पटकावले आहे. तर सिलिकॉन व्हॅली तिसऱ्या स्थानी आहे.
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या या ३० प्रगतीशील शहरांच्या यादीत बंगळुरू, हैदराबादसह दिल्ली, मुंबई आणि चेन्नई या शहरांनाही स्थान देण्यात आले आहे.

सीबीआय संचालकपदी अलोक वर्मा

  • दिल्लीचे  पोलिस आयुक्त अलोक वर्मा यांची १९ जानेवारी रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • वयोमानानुसार वर्मा येत्या जुलैमध्ये सेवानिवृत्त होणार होते. पण आता त्यांना सीबीआय संचालक म्हणून पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ मिळेल.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सरन्यायाधीश जगदीशसिंग खेहर व काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे या तीन सदस्यांच्या समितीने वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
  • याआधीचे संचालक अनिल सिन्हा डिसेंबर २०१६मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते व गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना हंगामी संचालक म्हणून काम पाहात होते.
  • वर्मा हे १९७९च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. त्यांच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतील सीबीआय संचालक हे २४वे पद आहे.
  • गेल्या वर्षी २९ फेब्रुवारीला दिल्ली पोलिस आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाली होती. त्यापूर्वी ते तिहार कारागृहाचे महासंचालक होते.
  • आलोक कुमार वर्मा यांच्या दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदाच्या ११ महिन्यांच्या कार्यकाळात आम आदमी पक्षाच्या अनेक आमदारांना अटक झाली होती.

पटेल ‘फिफा’च्या अर्थ समितीचे सदस्य

  • अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष (एआयएफएफ) प्रफुल्ल पटेल यांची चार वर्षांसाठी फिफाच्या अर्थ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.
  • डिसेंबर २०१६मध्ये पटेल यांची आशियाई फुटबॉल परिसंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
  • पटेल यांच्या प्रमुखपदाच्या काळात भारतात पहिल्यांदा पुढील वर्षी १७ वर्षे गटाच्या फिफा वर्ल्डकपचे आयोजन करण्यात येत आहे.
  • याशिवाय मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात एआयएफएफने एएफसी १६ वर्षे गटाच्या स्पर्धेचे यजमानपददेखील भूषविले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा