चालू घडामोडी : २१ एप्रिल

देवगड हापूसला जीआय मानांकन

  • देवगड हापूसला स्वत:ची ओळख प्राप्त करून देणारे जीआय मानांकन (भौगोलिक उपदर्शन) मिळाले असून देवगड हापूसच्या नावावर आता अन्य कोणत्याही आंब्याची विक्री केली जाणार नाही.
  • गेल्या पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने केलेल्या जी. आय. मानांकनाच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे.
  • जी. आय. मानांकनासाठी मुंबई येथे सुनावणीमध्ये देवगड हापूसला मान्यता देण्यात आली असून ‘देवगड हापूस’ हा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण झाला आहे.
  • देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आंबा असून, या आंब्याची चव व दर्जा देशात कुठल्याही आंब्याला नाही. त्यामुळे देवगड हापूसला चांगला भाव आहे.
  • त्यामुळेच कर्नाटक, मद्रास व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधील आंबा देवगड हापूसच्या नावाखाली विक्री केला जात होता. यामुळे देवगड हापूसची एकप्रकारे बदनामी होत होती.
  • देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाल्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली केली जाणारी आंबा ही विक्री रोखली जाणार आहे. देशाबाहेरही आता देवगड हापूस या नावानेच हा आंबा विकला जाणार आहे.
  • देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो.
  • हापूस आंब्याच्या जी. आय. मानांकनासाठी कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे रत्नागिरी हापूस, दापोली कृषी विद्यापीठामार्फत हापूस व देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्यावतीने देवगड हापूस असे तीन अर्ज दाखल करण्यात आले होते.
 भौगोलिक उपदर्शन म्हणजे काय? 
  • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक उपदर्शन. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  • उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी व पेटंटची मान्यता दिली जाते, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक उपदर्शन (जीआय)ची मान्यता दिली जाते. 
  • खादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शन या नावाने मिळतो.
  • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  • भौगोलिक उपदर्शन नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१ साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यू.टी.ओ.) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक उपदर्शन नोंदणी कायदा हा एक आहे.
  • आतापर्यंत महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, सोलापूर चादर, सोलापूर टेरी टॉवेल, पुणेरी पगडी, नाशिकची वाईन, पैठणी साडी, कोल्हापुरी गुळ आणि नाशिकच्या द्राक्षांना अशा प्रकारचे जीआय मिळालेले आहे.
  • जीआय मानांकनाचे फायदे 
    • जागतिक बाजारात मुल्यवर्धी 
    • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख 
    • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव

हॉटेलमध्ये सेवा शुल्क (टिप) देणे ऐच्छिक

  • केंद्र सरकारच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयने गेल्या काही दिवसांपूर्वीच सेवा शुल्काबाबत तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना मंजुरी मिळाली आहे.
  • त्यामुळे हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खाद्य पदार्थांवर लावण्यात येणारे सेवा शुल्क (टिप) देणे सक्तीचे असणार नाही.
  • हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये किती सेवा शुल्क द्यायचे, हे ग्राहकच ठरवणार असून, सेवा शुल्क ठरवण्याचा अधिकार हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना असणार नाही.

हाफिज सईदला पाकिस्तानने  दहशतवादी म्हणून घोषित केले

  • मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानने अखेर दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
  • हाफिझ सईदला ३० जानेवारीपासून लाहोर येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हे अवैध असल्याची याचिका जमात-उद-दावा या संघटनेने न्यायालयात केली होती.
  • परंतु पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने लाहोर हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हाफिज सईदचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचे स्पष्ट केले आहे.
  • अमेरिकेने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीस देण्याचेही जाहीर केलेले आहे.
  • सात मुस्लिम बहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी घालण्यात आल्यानंतर या यादीत आगामी काळात पाकिस्तानाचाही समावेश होणार असल्याचे संकेत अमेरिकेकडून देण्यात आले होते. 
  • त्यामुळे अमेरिकेच्या दबावाखाली पाकिस्तानने हाफिजला दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला असावा, अशी चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा