चालू घडामोडी : २५ एप्रिल

एचआयव्ही आणि एड्स कायदा २०१७ मंजूर

  • एचआयव्ही आणि एड्स (प्रतिबंधक व नियंत्रण) कायदा २०१७ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली. याबाबतचे विधेयक लोकसभेने ११ एप्रिल तर राज्यसभेने २१ मार्चलाच पारित केले होते.
  • या नव्या कायद्यात एचआयव्हीग्रस्त लोकांची मालमत्ता व अधिकार यांचे संरक्षण करण्याची हमी देण्यात आली आहे.
 या कायद्यातील प्रमुख तरतुदी 
  • एचआयव्ही किंवा एड्सने बाधित असलेल्या लोकांना नोकऱ्या नाकारता येणार नाहीत किंवा त्यांना नोकरीवरून काढून टाकता येणार नाही.
  • अशा रोगांनी ग्रस्त असलेल्या लोकांच्या विरोधात प्रचार करणाऱ्यांना किमान ३ महिने कैद (जी दोन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते) आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड.
  • एखादी व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे उघड करणाऱ्या व्यक्तीला १ लाख रुपयांपर्यंत दंड.
  • एचआयव्ही किंवा एड्सने ग्रस्त लोकांबाबत नोकरीत किंवा शैक्षणिक संस्थेत अथवा आरोग्य सेवा पुरवण्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करण्यास या कायद्याने प्रतिबंध.
  • एचआयव्हीग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तीला इतरांसोबत राहण्याचा, सामायिक निवासव्यवस्थेतून वगळले न जाण्याचा आणि अशा निवासातील सर्व सोयींचा वापर करण्याचा कुठल्याही भेदभावाशिवाय हक्क राहील.
  • अशा व्यक्तीच्या मंजुरीशिवाय त्याची एचआयव्ही चाचणी, वैद्यकीय उपचार किंवा संशोधन केले जाऊ शकणार नाही.
  • एखाद्या व्यक्तीबाबतची माहिती न्यायाच्या हितार्थ आवश्यक आहे, अशा आशयाच्या न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याची एचआयव्हीबाबतची स्थिती जाहीर करण्यास भाग पाडता येणार नाही.

पर्यावरणवादी कार्यकर्ते प्रफुल्ल सामंत्रा यांना गोल्डमन पुरस्कार

  • पर्यावरणवादी सामाजिक न्याय कार्यकर्ते प्रफुल्ल सामंत्रा यांना सॅनफ्रान्सिको येथे पर्यावरणातील ‘गोल्डमन पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
  • यापूर्वी हा पुरस्कार मेधा पाटकर, एम.सी. मेहता, रशीदाबी, चंपारण शुक्ला, रमेश अग्रवाल या भारतीयांना मिळाला आहे.
  • जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीपासून कार्यरत असलेले सामंत्रा भारतातील पर्यावरण लढ्यातील एक सच्चा कार्यकर्ता म्हणून प्रसिध्द आहे.
  • ब्रिटनमधील वेदांता रिसोर्सेस या कंपनीशी ओदिशा स्टेट मायनिंग कंपनीने २००४मध्ये करार केला. त्यानुसार नियामगिरी पर्वत खोदला जाणार होता.
  • या पर्वताच्या परिसरातील कालाहांडी व रायगडा जिल्ह्यांत बॉक्साइटच्या खाणी आहेत. वेदांता कंपनीने तेथे दोन अब्ज डॉलरचा प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले होते.
  • ओदिशात ८ हजार वर्षांपूर्वीची डोंगरी कोंढ ही आदिवासी जमात नियामगिरी पर्वत परिसरात वास्तव्य करते. तेथील वनांचे जैववैविध्य त्यांच्यामुळेच टिकून आहे.
  • पण जैवविविधतेने नटलेला हा नियामगिरी पर्वत, तेथील आदिवासी जाती-जमाती या प्रकल्पाचा बळी ठरणार होते.
  • अशा परिस्थितीत प्रफुल्ल सामंत्रा यांनी वेदांता कंपनीविरोधात आदिवासींच्या लढ्याचे यशस्वी नेतृत्व केले. 
  • प्रफुल्ल यांना वकिली व्यवसायाचे प्रशिक्षण असल्याने ते ही लढाई न्यायाच्या दरबारात नेऊ शकले. डोंगरी कोंढ लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी १२ वर्षे लढा दिला.
  • हा लढा सरकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी भुवनेश्वर येथे ठिय्या आंदोलने केली. १० मैलांची मानवी साखळीही वेदांताला रोखण्यासाठी करण्यात आली होती.
  • मे २०१६मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेदांता कंपनीच्या विरोधात निकाल दिला. त्या भागात जर कुठलाही प्रकल्प करायचा असेल तर त्यासाठी तेथील आदिवासींची परवानगी घ्यावी लागेल असा दंडक न्यायालयाने घालून दिला.

मनप्रीत कौरला गोळाफेकीत सुवर्णपदक

  • आशियाई ग्रां.प्रि. मैदानी स्पर्धेत भारताच्या मनप्रीत कौरने गोळाफेकीत राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक जिंकले.
  • या स्पर्धेत भारताने या सुवर्णपदकाबरोबरच चार रौप्य व दोन कांस्यपदकांचीही कमाई केली.
  • पंजाबच्या मनप्रीतने सर्वोत्तम कामगिरी करताना १८.८६ मीटपर्यंत गोळा फेकला आणि २०१५मध्ये तिनेच नोंदविलेला १७.९६ मीटर हा राष्ट्रीय विक्रम मोडला. 
  • या सुवर्णपदकाबरोबरच ती आगामी जागतिक स्पर्धेसाठी असलेला १७.७५ मीटर हा निकष पूर्ण केला आहे. ही स्पर्धा ऑगस्टमध्ये लंडन येथे होणार आहे.
  • लांब उडीत नीना वाराकिलने रौप्यपदकाची कमाई करताना ६.४६ मीटपर्यंत उडी मारली. टिंटू लुकाने ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य मिळविले. द्युती चंदने १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविले.
  • पुरुषांच्या विभागात नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक पटकाविले. त्याने ८२.११ मीटपर्यंत भाला फेकला.
  • ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिन्सन जॉन्सनने रौप्यपदक तर गोळाफेकीत ओमप्रकाश कऱ्हाना याने कांस्यपदकावर नाव कोरले.

आमिर खानला मास्टर दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार

  • अभिनेता आमिर खानला मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
  • आमिर खानला दंगल या चित्रपटातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात आला.
  • मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते आमिर खानला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • आमिर खान सोबतच अभिनेत्री वैजयंती माला, अभिनेत्री आशालता, प्रदीर्घ क्रिकेटपटू निर्माते सुनील बर्वे आणि गायिका कौशकी चक्रवर्ती यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आले.

माजी सीबीआय संचालकांविरोधात एफआयआर दाखल

  • कोळसा घोटाळा प्रकरणी माजी सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांच्याविरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) एफआयआर दाखल केला आहे.
  • कोळसा घोटाळ्याचा तपास त्यांच्याकडे असताना त्यांनी तपासामध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. हे आरोप सिद्ध झाल्यास त्यांना ७ वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.
  • भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३(२), १३(१)(ड) अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • रणजित सिन्हा यांची या प्रकरणात चौकशी व्हावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यापूर्वी दिले होते.
  • या प्रकरणासाठी माजी सीबीआय प्रमुख एम एल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती.
  • सिन्हा यांनी या घोटाळ्यातील आरोपींसोबत खासगी भेट घेतल्याचे या समितीने न्यायालयाला सांगितले.
  • सीबीआयच्या आतापर्यंतच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच या संस्थेच्या माजी प्रमुखांवर गुन्हा नोंदवण्याची नामुष्की सीबीआयवर आली आहे.
  • याआधी सीबीआयचे माजी प्रमुख ए पी सिंग यांच्याविरोधात यावर्षी फेब्रुवारी महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात मांस निर्यातक मोईन कुरैशी यांची बाजू घेतल्याच आरोप आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा