चालू घडामोडी : २७ एप्रिल

जेष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन

  • अभिनेता ते नेता असा प्रवास करणारे विनोद खन्ना यांचे २७ एप्रिल रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.
  • विनोद खन्ना यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथे झाला. भारत पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंब मुंबईमध्ये स्थायिक झाले होते.
  • १९६८मध्ये ‘मन का मीत’ या सिनेमातून विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
  • त्यानंतर अनेक सिनेमात सहायक अभिनेता आणि खलनायकाच्या भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता.
  • १९७१मध्ये ‘हम तूम और वो’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा मुख्य अभिनेता म्हणून काम केले. ‘दयावान’ या सिनेमाने विनोद खन्ना यांना नावलौकीक मिळाले होते.
  • मेरे अपने, कुर्बानी, पूरब और पश्चिम, रेशमा और शेरा, हाथ की सफाई, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर अँथनी या सिनेमांमधून त्यांनी आपल्यातील अभिनय गुण दाखवून दिले.
  • २०१५मधील ‘दिलवाले’ हा त्यांचा अखेरचा सिनेमा ठरला. विनोद खन्ना यांचा आगामी सिनेमा ‘एक थी रानी ऐसी भी’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता.
  • यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना सिनेसृष्टीला अलविदा करून आध्यात्मिक गुरू रजनीश (ओशो) यांच्याकडे निघून गेले होते.
  • १९९७मध्ये विनोद खन्ना राजकारणात सक्रीय होत भाजप पक्षामध्ये दाखल झाले. १९९८च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील गुरुदासपूरमधून ते खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले.
  • १९९९ ते २००४ या वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रीपदही भूषवले. जुलै २००२मध्ये त्यांची सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रीपदी व त्यानंतर परराष्ट्र राज्यमंत्री या महत्वाच्या पदावर नियुक्ती झाली.
  • परराष्ट्र राज्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर विनोद खन्ना यांनी भारताचे पाकिस्तान तसेच पॅलेस्टाईनसोबतचे संबंध सुधारण्यावर भर दिला.
  • भारत आणि पाकिस्तानमधील बस सेवा करारात त्यांनी दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली होती.
  • संयुक्त राष्ट्रात दहशतवादाचा मुद्दा प्रभावी मांडण्यासाठी पॅलेस्टाईनचे सहकार्य मिळावे यासाठी विनोद खन्ना यांनी प्रयत्न केले होते.
  • २००४ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत विनोद खन्ना गुरुदासपूरमधून खासदार झाले. पण २००९च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
  • सिनेसृष्टीत प्रसिद्धी कमावल्यानंतर राजकारणातही यशस्वी झालेल्या काही निवडक व्यक्तींपैकी विनोद खन्ना होते. ते बॉलिवूड इतकेच राजकारणातही यशस्वी ठरले.

सातारा महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा

  • अवघ्या ११ महिन्यांत ५२ हजार शौचालये पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.
  • प्रधानमंत्री यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेल्या हागणदारीमुक्तीच्या चळवळीमध्ये या जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १,४९० ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.
  • घर तेथे शौचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन तसेच सार्वजनिक ठिकाणची व वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छ पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्त्वपूर्ण घटक आहेत.
  • जून २०१६मध्ये राज्य शासनाने एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आव्हान दिले होते.
  • सातारा जिल्हा परिषदेने ५२ हजार शौचालये पूर्ण करत अवघ्या ११ महिन्यांतच हे आव्हान समर्थपणे पूर्ण केले आहे.
  • ग्रामपंचयातींची तपासणी करून त्यांचा दर्जा व पात्रता ठरविण्यासाठी राज्य शासनाने स्वच्छता क्षेत्रात काम करणाऱ्या ४६ त्रयस्थ स्वयंसेवी संस्थांची नियुक्ती केली होती.
  • या सर्व संस्थांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची २७ मार्च २०१७ अखेर तपासणी पूर्ण करून राज्य शासनास अहवाल सादर केला.
  • २४ एप्रिल रोजी या अहवालावरून सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील सर्व प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.

चीनच्या पूर्णपणे देशी बनावटीच्या युद्धनौकेचे जलावतरण

  • चीनने २७ एप्रिल रोजी पूर्णपणे देशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचे जलावतरण केले.
  • अशा प्रकारे पूर्णपणे स्वत:च्या ताकदीवर विमानवाहू युद्धनौका बांधणारा चीन हा जगातील सातवा देश ठरला आहे.
  • ‘००१ए’ या प्रकारातील ही विमानवाहू युद्धनौका ५० हजार टनांची आहे. तिचे आरेखन सन २०१३मध्ये व प्रत्यक्ष बांधणी सन २०१५मध्ये सुरु झाली होती. 
  • सागरी चाचण्या पूर्ण झाल्यावर आणि त्यावरील सर्व प्रकारची लढाऊ विमाने उपलब्ध झाल्यानंतर ही विमानवाहू युद्धनौका २०२०पूर्वी नौदलाच्या सक्रिय सेवेत दाखल होईल.
  • २०२०पर्यंत नौदलाचा विस्तार करून युद्धनौका, पाणबुड्या व रसद पुरविणाऱ्या नौका असा एकूण २६५ ते २७३ युद्धनौकांचा बलाढ्य ताफा उभा करण्याची चीनची महत्वाकांक्षी योजना आहे.
  • या कामगिरीने हा कम्युनिस्ट देश अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि स्पेन या निवडक देशांच्या पंक्तींत पोहोचणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा