चालू घडामोडी : २९ एप्रिल

वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांना सुवर्णपदक

  • सुप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी मॉस्को येथे झालेल्या ‘सँड आर्ट चॅम्पियनशिप’ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची त्यांची ही दुसरी वेळ आहे.
  • रशियातील कोलमेन्स्कोय आणि मास्को येथे ‘आपल्याभोवतीचं विश्व’ या विषयावर ही स्पर्धा २२ ते २८ एप्रिल दरम्यान पार पडली.
  • या स्पर्धेत विविध देशातील २५ शिल्पकारांनी भाग घेतला होता. भारताकडून सुदर्शन पटनायक हे स्पर्धेत सहभागी झाले होते.
  • पटनायक यांनी हिरवळीचा संदेश देणारी श्री गणेशाची मूर्ती साकारली. त्यांच्या या शिल्पाला प्रथम पारितोषिक देण्यात आले.
  • गेल्या वर्षी मॉस्कोमध्ये ‘विश्वशांती’ या विषयावर झालेल्या स्पर्धेत पटनायक यांनी महात्मा गांधी यांचे वाळूचे शिल्प साकारले होते. या शिल्पासाठीही त्यांना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते.
  • नुकताच त्यांनी ओडिशाच्या समुद्र किनारी वाळूचा सर्वात मोठा किल्ला बनविला होता. त्यासाठी त्यांची गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली होती.

पी व्ही सिंधू आशियाई चॅम्पियनशीपमधून बाहेर

  • रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आशियाई चॅम्पियनशीपमधून बाहेर पडली आहे.
  • या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पहिला गेम जिंकल्यानंतर चीनच्या बिंगजियाओविकडून ती पराभूत झाली.
  • या सामन्यात सिंधूला बिंगजियाओविने २१-१५, १४-२१, २२-२४ असे हरवले. सिंधूच्या या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

जर्मनीत बुरखा घालण्यास अंशत: बंदी

  • दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून जर्मनीच्या संसदेने सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर असताना संपूर्ण शरीर झाकणारा बुरखा घालण्यास अंशत: बंदी केली आहे.
  • केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना ही बंदी लागू होणार आहे. यात निवडणूक अधिकारी, लष्करी व न्यायिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
  • परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्गापासून बचाव करताना आणि पोलिस अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावताना पूर्णपणे चेहरा झाकण्याची मुभा असेल.
  • जर्मनीत २०१५पासून दहा लाखांपेक्षा अधिक स्थलांतरित आणि निर्वासित आले असून, यातील बहुतांश मुस्लिम देशांमधील आहेत.
  • तसेच बर्लिनमधील ख्रिसमस मार्केटमधील दहशतवादी हल्ल्यासह अनके दहशतवादी हल्ले मागील काळात जर्मनीत झाले आहेत.
  • यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाल्याची ओरड उजव्या विचारसरणीच्या गटांनी केली आहे.
  • याच गटांनी फ्रान्सप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी पूर्णपणे बुरखा बंदी करण्याची मागणी केली होती. मात्र, सरकारने पूर्णपणे बंदी न करता अंशत: बंदी करण्याचा कायदा केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा