चालू घडामोडी : ६ मे

एनपीएसंबंधी रिझर्व्ह बँकेला व्यापक अधिकार

  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ५ मे रोजी बँकिंग नियमन (दुरुस्ती) अध्यादेश २०१७ला मंजुरी दिली.
  • या अध्यादेशामुळे अनुत्पादित कर्जाची (एनपीए) ओळख करणे आणि त्यावर तोडगा काढणे यासाठी रिझर्व्ह बँकेला व्यापक अधिकार देण्यात आले आहेत.
  • या अध्यादेशात बँकींग नियमन कायदा १९४९ चे कलम ३५ ए मध्ये दुरुस्ती करुन यात कलम ३५ एए व कलम ३५ एबीचा समावेश करण्यात आला आहे.
  • सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे अनुत्पादित कर्ज (एनपीए) सहा लाख कोटींपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश कर्ज वीज, स्टील, रस्ते योजना आणि कापड क्षेत्रात आहेत.
  • अशी कर्जे वसूल न होण्याच्या परिस्थितीत एखाद्या बँकींग कंपनीला दिवाळखोरी प्रक्रिया सुरु करण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार रिझर्व्ह बँकेला देण्यात आले आहेत.
  • विविध क्षेत्रातील निगराणीसाठी समिती स्थापन करण्याचे अधिकारही रिझर्व्ह बँकेला देण्यात आले आहेत.

पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश लैला सेठ यांचे निधन

  • दिल्ली हायकोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लैला सेठ यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. सुप्रसिद्ध लेखक विक्रम सेठ यांच्या त्या मातोश्री होत्या.
  • लैला सेठ यांनी १९५८साली लंडनमध्ये विधी परिक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. या परिक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
  • त्यानंतर त्यांनी पटना हायकोर्टात वकिली व्यवसायाला सुरूवात केली. लैला सेठ यांची १९७८साली दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यात आली.
  • त्यानंतर १९९१साली हिमाचल प्रदेश हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची नेमणूक करण्यात आली. हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक होणाऱ्या त्या महिला न्यायाधीश ठरल्या.
  • लैला सेठ यांची विधी आयोगात २०००साली नेमणूक करण्यात आली होती. हिंदू वारसा हक्क कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात त्यांची मोठी भूमिका होती. या बदलामुळे एकत्रित कुटुंबात मुलींनाही संपत्तीचा अधिकार मिळाला.

अर्णब गोस्वामी यांची रिपब्लिक वृत्तवाहिनी सुरू

  • आक्रमक आणि धारदार सूत्रसंचालनाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार अर्णब गोस्वामी यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी ६ मे पासून सुरू झाली.
  • अर्णब यांनी पहिल्याच दिवशी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यासंदर्भातील मोठा गौप्यस्फोट केला.
  • त्यांनी लालू प्रसाद यादव आणि माफिया डॉन मोहम्मद शहाबुद्दीन कारागृहात असताना या दोघांमध्ये झालेल्या संवादाचा गौप्यस्फोट केला. 
  • नवीन वृत्तवाहिनी सुरू करण्यासाठी इतका वेळ का लागला, याबद्दलचे अर्णब गोस्वामी यांनी वृत्तवाहिनी सुरू होण्यापूर्वी स्पष्ट केले.
  • अर्णब यापूर्वी ‘टाईम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक होते. परंतु गेल्यावर्षी त्यांनी ‘टाईम्स नाऊ’च्या मुख्य संपादक पदाचा राजीनामा दिला होता.
  • ‘टाईम्स नाऊ’वरील अर्णब यांचा रात्री ९ वाजता प्रसारित होणारा ‘द न्यूजअवर’ हा कार्यक्रम विशेष लोकप्रिय होता. या एका कार्यक्रमातून टाईम्स नाऊला ६० टक्के उत्पन्न मिळत होते.
  • याशिवाय ‘फ्रँकली स्पिकींग’ कार्यक्रमाच्या माध्यमातून अर्णब राजकारणी, सेलिब्रिटी, खेळाडूंसह महत्त्वाच्या व्यक्तींच्या मुलाखती घ्यायचे.
  • ‘टाईम्स समूहा’ने अर्णब गोस्वामींची ‘टाईम्स नाऊ’ आणि ‘ईटी नाऊ’ या वाहिन्यांच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

ओबामाकेअर कायदा रद्द

  • अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर ओबामाकेअर कायदा रद्द करून त्या जागी नवीन तरतुदी असलेले विधेयक मंजूर केले आहे.
  • ट्रम्प यांचा आधीचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या ओबामाकेअर योजनेला विरोध होता व सत्ता मिळाल्यास ही योजना रद्द करण्याचे त्यांनी जाहीर केले होते.
  • ओबामाकेअर रद्द करताना आता ‘दी अमेरिकन हेल्थ केअर अ‍ॅक्ट’ हे नवीन विधेयक २१७ विरुद्ध २१३ मतांनी प्रतिनिधी गृहात मंजूर करण्यात आले.
  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या एकाही सदस्याने नवीन विधेयकास पाठिंबा दिला नाही. काही रिपब्लिकन सदस्यांनीही या विधेयकाला विरोध केला आहे.
  • आता हे विधेयक अजून सिनेटमध्ये मंजूर होणे गरजेचे असून नंतर ते ट्रम्प यांच्यापुढे स्वाक्षरीसाठी येईल.
  • या विधेयकाने ओबामाकेअर योजनेतील बहुतेक तरतुदी रद्द झाल्या आहेत. त्यात विमा संरक्षणासाठी लोकांना अनुदाने, मेडिकेडचा विस्तार या तरतुदींचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा