चालू घडामोडी : ११ मे

चारधाम तीर्थक्षेत्रे लवकरच रेल्वेने जोडणार

  • हिंदू धर्मात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चारधाम तीर्थक्षेत्रांच्या मार्गावर रेल्वे सुरु करण्याचा प्रकल्प येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे.
  • रेल्वेमंत्री सुरेश प्रभू १३ मे रोजी रेल्वे विकास निगम लिमिटेडतर्फे सुरु करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे हे बद्रीनाथ येथे भूमिपूजन करणार आहेत.
  • या प्रकल्पामुळे चारधाममधील गंगोत्री, यमुनोत्री, बद्रिनाथ आणि केदारनाथ ही चारही ठिकाणे रेल्वेने जोडली जाऊन यात्रेकरुंना एकावेळी रेल्वेने याठिकाणी जाता येईल.
  • चारधाममधील चारही स्थळे उत्तराखंडमधील डोंगराळ भागात वसलेली असल्याने याठिकाणी रेल्वेचा मार्ग तयार करणे हे रेल्वे प्रशासनासाठी मोठे आव्हान असणार आहे.
  • या भागात २०१४-१५ दरम्यान केलेल्या सर्वेक्षणानुसार ३२७ किमी मार्गावर रेल्वेमार्गाची बांधणी करावी लागणार असून, त्यासाठी साधारणपणे ४३००० कोटी इतका खर्च येण्याची शक्यता आहे.
  • नव्याने बांधण्यात येणाऱ्या रेल्वे मार्गावर २१ नवीन रेल्वेस्थानके, ६१ बोगदे आणि ५९ पूल बांधावे लागतील.
  • या चारधामांना हिंदू धर्मानुसार महत्त्व असून प्रत्येकाचे महत्त्व वेगवेगळे आहे. यमुनोत्री म्हणजेच यमुना नदीचा उगम असून, हे क्षेत्र समुद्रपातळीपासून ३२९३ मीटरवर आहे.
  • गंगा नदीचा उगम असलेले गंगोत्री समुद्रपातळीपासून ३४०८ मीटरवर आहे. तर १२ ज्योर्तिलिंगांपैकी एक असणाऱ्या शंकराचे पीठ केदारनाथ ३५८३ मीटर आणि भगवान विष्णूचे ठाणे असलेले बद्रीनाथ ३१३३ मीटर उंचीवर आहे.

दक्षिण कोरियाच्या अध्यक्षपदी मून जे इन

  • दक्षिण कोरियात ९ मे रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत मून जे इन यांचा विजय झाला. त्यानंतर लगेचच त्यांनी दक्षिण कोरियात अध्यक्षपदाची शपथही ग्रहण केली.
  • मून यांना ४१.२ टक्के मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी लिबर्टी कोरिया पार्टीचे हाँग जून पो यांना २४ टक्के मते मिळाली. मध्यममार्गी अन शेऑल यांना २१.४ टक्के मते मिळाली.
  • डाव्या विचाराचे मून हे माजी मानवी हक्क वकील असून, त्यांनी उत्तर कोरियासमवेत शांततेचा पुरस्कार केला आहे.
  • त्यांनी उत्तर कोरियाबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी त्या देशाला भेट देण्याची तयारी दर्शवली आहे.
  • मून यांच्यासमोर देशांतर्गत भ्रष्टाचाराचे मोठे आव्हान असून, माजी अध्यक्ष पार्क गेन हाय यांना भ्रष्टाचार प्रकरणात सत्ताभ्रष्ट करून त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला होता.

शिवेंद्र सिंह यांची फिआफच्या कार्यकारी समितीत निवड

  • दिग्दर्शक शिवेंद्र सिंह डुंगरपूर यांची ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काइव्हज’च्या (फिआफ) कार्यकारी समितीत निवड झाली आहे. ‘फिआफ’ ही संस्था चित्रपट जतनाच्या क्षेत्रातील ‘युनो’ मानली जाते.
  • शिवेंद्र सिंह हे राजस्थानमधील डुंगरपूर राजघराण्यातील आहेत. त्यांनी विख्यात डून स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले असून, नंतर दिल्लीच्या स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी इतिहासाची पदवी मिळवली आहे.
  • त्यानंतर त्यांनी पुण्याच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेमधून (एफटीआयआय)  दिग्दर्शन आणि पटकथालेखन यात पदवी प्राप्त केली.
  • २००१मध्ये त्यांनी स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी काढली. व्यावसायिक चित्रपट काढण्यापेक्षा माहितीपट, लघुपट काढण्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केले.
  • भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दीनिमित्त शिवेंद्र सिंह यांनी काढलेला ‘द इम्मॉर्टल्स’ हा माहितीपट खूप गाजला.
  • आपले गुरू पी के नायर यांच्या जीवनावर आधारित ‘द सेल्युलॉइड मॅन’ हा माहितीपटही त्यांनी बनवला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा