चालू घडामोडी : २ जून

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना

  • राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, म्हणून मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.
  • या योजनेंतर्गत ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फीडरचे विलगीकरण झाले आहे, अशा ठिकाणी कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यात येईल.
 मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेबद्दल 
  • योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत करण्यात येईल. तसेच महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल.
  • प्रकल्पाकरिता शासकीय जमीन ३० वर्षांकरिता नाममात्र १ रुपया दराने भाडेपट्टीने उपलब्ध करून देण्यात येईल.
  • ही योजना महानिर्मिती कंपनी पीपीपी तत्त्वावर राबवील. खासगी गुंतवणूकदाराकडून सौर कृषिवाहिनी प्रकल्पासाठी महानिर्मिती योग्य तो करार विशिष्ट कालावधीसाठी करेल.
  • या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनी करेल. वीज बिलाची वसुली महावितरण करून महानिर्मितीकडे जमा करेल.
  • या प्रकल्पासाठी अनुदानाची रक्कम शासनाकडून महानिर्मिती कंपनीला देण्यात येईल.
  • योजनेची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी प्रधान सचिव (ऊर्जा) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येत असून, त्यात महावितरण, महाऊर्जा व महानिर्मितीमधील अधिकाऱ्यांचा समावेश राहील.
 योजनेचे फायदे 
  • राज्याच्या एकूण वीज वापराच्या ३० टक्के ऊर्जा कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महाविरतण कंपनीला तोटा सहन करावा लागतो.
  • अशा स्थितीत शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावे लागते.
  • कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल व औष्णिक विजेची बचत होईल.
  • महाराष्ट्र ऊर्जामंत्री: चंद्रशेखर बावनकुळे

अणवस्त्रसज्ज पृथ्वी-२ची यशस्वी चाचणी

  • भारताकडून ३ जून रोजी स्वदेशी बनावटीच्या अणवस्त्रसज्ज पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली.
  • ही चाचणी ओदिशातील चंदिपूर येथील भारतीय लष्कराच्या एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) मोबाईल लाँचरच्या सहाय्याने पार पडली. 
  • पृथ्वी-२ जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असून हे क्षेपणास्त्र ३५० किलोमीटरवरील लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकते.
  • पृथ्वी-२ या क्षेपणास्त्रात द्रव इंधन असणाऱ्या दोन इंजिनांचा (लिक्विड प्रोपल्शन) वापर करण्यात आला आहे.
  • पृथ्वी-२ मध्ये ५०० ते १००० किलो अणवस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. याशिवाय, लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी क्षेपणास्त्रात दिशादर्शन प्रणालीही आहे.
  • क्षेपणास्त्राचा मार्ग संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे रडार, विद्युत प्रकाशीय मागोवा यंत्रणा, दूरसंवेदन केंद्रे यांच्या मदतीने निश्चित करण्यात आला होता.
  • पृथ्वी २ क्षेपणास्त्र २००३मध्ये भारताच्या लष्करी दलांमध्ये समाविष्ट करण्यात आले असून भारताच्या एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात तयार केलेले ते पहिले क्षेपणास्त्र मानले जाते.
  • पृथ्वी २ क्षेपणास्त्राची यापूर्वीची उपयोजित चाचणी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी ओदिशातील याच चाचणी क्षेत्रातून घेण्यात आली होती.

अमेरिका पॅरिस हवामान करारातून बाहेर

  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक तापमान वाढ आणि प्रदूषण कमी करण्याच्या दुष्टीने अत्यंत महत्वाच्या पॅरिस हवामान करारातून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे.
  • यामुळे आता अमेरिका जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचा भाग असणार नाही.
  • ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीतील प्रचारादरम्यान ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशी घोषणा देत पॅरिस करारातून बाहेर पडल्याचे आश्वासन दिले होते.
  • पॅरिस करार म्हणजे अमेरिकेसाठी एक प्रकारची शिक्षा होती. या करारामुळे ऊर्जा स्त्रोतांवर निर्बंध आले होते. अमेरिकेचा आर्थिक प्रगतीचा वेग खुंटला होता असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.  
  • हा करार म्हणजे अमेरिकेला आर्थिकदृष्टया कमकुवत करण्याच्या प्रयत्नाचा भाग आहे असे त्यांचे म्हणणे होते.
  • जागतिक हवामानातील बदलांच्या आधारे कृती करण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी २०१५मध्ये झालेल्या पॅरिस करारावर जगातील १९५ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या.
  • अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडल्याने हरित वायू उत्सर्जन रोखण्यासाठीच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर गंभीर परिणाम होणार आहेत.

सूर्याच्या अभ्यासासाठी नासाची ‘पार्कर सोलर प्रोब’ मोहीम

  • सूर्याच्या वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी ‘पार्कर सोलर प्रोब’ हे अंतराळ यान ३१ जुलै २०१८ रोजी रवाना करण्याची घोषणा ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने केली आहे.
  • ही मोहीम एकूण सात वर्षांची असून, ती २०२५मध्ये संपेल. हे यान सूर्याच्या पृष्ठभागापासून ४० लाख मैल एवढे जवळ जाईल.
  • २,५५० फॅरेनहीट एवढ्या प्रचंड उष्णतेमध्ये हे यान ताशी ४.३० लाख किमी वेगाने सूर्याच्या २४ प्रदक्षिणा करत सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करेल.
  • सुमारे १० फूट उंचीचे हे यान वितळून जाऊ नये यासाठी बाह्यभागावर एका विशिष्ट कार्बनी संयुगाचा पाच इंच जाडीचा मुलामा केलेला असेल.
  • मानवाने सहा दशकांपूर्वी अंतराळ संशोधनास सुरुवात केली तेव्हापासून सूर्याला गवसणी घालून त्याची रहस्ये उलगडणे हे त्याचे अंतिम उद्दिष्ट राहिले आहे.
  • ‘नासा’ने याआधी पाठविलेल्या काही यानांनी याहूनही दूरवरचा प्रवास केलेला आहे. १९७७मध्ये ‘व्हॉयेजर-१’ हे यान ११.७ अब्ज मैलांचा प्रवास करून आपल्या सूर्यमालेच्या पार बाहेर निघून गेले.
  • सन २०१५मध्ये प्ल्युटो ग्रहाच्या जवळून गेलेले ‘दि न्यू होरायझन प्रोब’ या यानाने आत्तापर्यंत ३.५ अब्ज मैलांचा प्रवास केला असून ते अद्याप थांबलेले नाही.
  • थेठ सूर्यावर यान उतरविणे शक्य नसल्याने त्याच्या शक्य तेवढया जवळ जाऊन हे काम करणारे ‘पार्कर सोलर प्रोब’ हे पहिले यान असणार आहे.
  • संपूर्ण ग्रहमालेस व्यापून टाकणाऱ्या सौरवाऱ्यांचा वैज्ञानिक सिद्धान्त ६० वर्षांपूर्वी मांडणारे थोर खगोलभौतिकी शास्त्रज्ञ प्रा. युजिन पार्कर यांच्या सन्मानार्थ या मोहिमेस ‘पार्कर सोलर प्रोब’ नाव देण्यात आले आहे.
  • ‘नासा’ने त्यांच्या कोणत्याही अंतराळ यानास कोणाही जिवंत व्यक्तीचे नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा