नाविक: भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने २८ एप्रिल २०१६ रोजी ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम’ (आयआरएनएसएस) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला.
  • या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) पूर्णत्वास गेली आहे.
  • या यंत्रणेचे नामकरण पंतप्रधान मोदी यांनी ‘नाविक’ असे केले आहे.

अशी आहे यंत्रणा
  • या यंत्रणेत पृथ्वीभोवती ३६ हजार किमी उंचीवरून भ्रमण करणारे सात उपग्रह, भूभागावरील देखरेख आणि नियंत्रण करणारे नेटवर्क आणि लाभार्थींचा प्रत्येकी एक छोटा रिसिव्हर यांचा समावेश होतो.
  • प्रत्येक उपग्रहाचे वजन सुमारे १४०० किलो असून त्यावरचे सौर पॅनल १४०० वॅट ऊर्जा पुरवतील.
  • यातील प्रत्येक उपग्रहासाठी १५० कोटी, प्रक्षेपकासाठी प्रत्येकी १३० कोटी आणि भूभागावरील यंत्रणेसाठी एकूण ३०० कोटी रुपये खर्च आला आहे. 
अशी काम करते यंत्रणा
  • या यंत्रणेद्वारे ठिकाणांची माहिती अक्षांश, रेखांश व समुद्रसपाटीपासूनची उंची या तीन मितीमध्ये समजते.
  • उपग्रहाकडून आलेल्या रेडिओ संदेशांचे रिसिव्हरद्वारे विश्लेषण केले जाते आणि त्यानुसार ती व्यक्ती जमिनीपासून किती उंचीवर कोणत्या अक्षांश, रेखांशावर आहे हे ठरविले जाते. यासाठी किमान ३ उपग्रहांचे संदेश आवश्यक असतात.
  • अवकाशातील उपग्रहांच्या कक्षांची मांडणी अशी असते की पृथ्वीवरील यंत्रणाव्याप्त प्रदेशाच्या कोणत्याही ठिकाणापासून कोणत्याही क्षणाला या प्रणालीतील चार उपग्रह दिसू शकतात.
  • त्या ठिकाणच्या जीपीएस रिसिव्हरपासून त्या ४ उपग्रहांचे अंतर वेगवेगळे असते. उपग्रहांचे स्वतःचे ठिकाण आणि अचूक वेळ ही माहिती आणि प्रकाशाचा वेग यांच्याद्वारे पृथ्वीवरील रिसिव्हर उपग्रहापासूनचे स्वतःचे अंतर याची गणना करतो.
  • त्या अंतरातल्या फरकाचा उपयोग करून त्याच्यामध्ये असलेल्या संगणकाच्या साह्याने स्वतःच्या स्थानाबद्दल अचूक माहिती आणि वेळ प्राप्त होते. 
यंत्रणेची वैशिष्ट्ये
  • एकूण सात उपग्रह कार्यान्वित. या उपग्रहांकडून मिळणारी माहिती स्मार्टफोनवर थेटपणे वापरता येणार.
  • २० मीटर अंतरापर्यंतची अचूक माहिती मिळू शकणार. 
  • व्याप्ती - भारताचा संपूर्ण भूभाग तसेच बाहेरील १५ किलोमीटरचा पल्ला.
  • अचूक वेळेसाठी प्रत्येक उपग्रहात आण्विक घड्याळ.
  • १२ महिने २४ तास अखंड सेवा मिळणार. उपग्रहाचे आयुष्य १२ वर्षे असणार.
  • शेजारी देशांनाही सेवा देणार.
मिळणाऱ्या सेवा
  • स्थितिदर्शन, मार्गनिरीक्षण, मानचित्रण
  • दळणवळण, सर्वेक्षण, नकाशे तयार करणे.
  • विमाने, नौका यांना दिशादर्शनासाठी.
  • हायकर किंवा पर्यटकांना दिशादर्शनासाठी.
  • लष्करी उपयोगासाठीच्या इक्रिप्टेड विशेष सेवा.
  • आपत्तीमध्ये व्यवस्थापनासाठी.
अशा सेवा देणारे इतर प्रकल्प
  • जीपीएस: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने विकसित केलेली ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) ही जगातील पहिली स्थितीदर्शक यंत्रणा आहे.
  • ग्लोनास: ही प्रणाली रशियाच्या ‘ग्लोबल ऑर्बिटिंग नैविगेशन सैटेलाइट’चे संक्षिप्त रूप आहे.
  • जीएनएसएस: ही प्रणाली यूरोपीय देशांद्वारे विकसित यूरोपियन यूनियनच्या ‘गॅलेलियो’चे संक्षिप्त रूप आहे. मात्र ही यंत्रणा अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही.
  • याशिवाय चीनची बेइदोउ सैटेलाइट नैविगेशन सिस्टम व जपानची कासी-जेनिथ सैटेलाइट सिस्टम या प्रादेशिक पातळीवरील प्रणाली कार्यान्वित आहेत.
  • त्यामुळे जागतिक पातळीवर स्वतःची संपूर्ण जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करणारा भारत हा अमेरिका आणि रशियानंतर तिसरा देश ठरला आहे.
आयआरएनएसएस उपग्रहांच्या प्रक्षेपणाचा इतिहास
उपग्रह प्रक्षेपण दिन कक्षा प्रक्षेपक
१ए १ जुलै २०१३ भूसमकालिक पीएसएलव्ही-सी २२
१बी ४ एप्रिल २०१४ भूसमकालिक पीएसएलव्ही-सी २४
१सी १६ ऑक्टोबर २०१४ भूस्थिर पीएसएलव्ही-सी २६
१डी २८ मार्च २०१५ भूसमकालिक पीएसएलव्ही-सी २७
१ई २० जानेवारी २०१६ भूसमकालिक पीएसएलव्ही-सी ३१
१एफ १० मार्च २०१६ भूस्थिर पीएसएलव्ही-सी ३२
१जी २८ एप्रिल २०१६ भूस्थिर पीएसएलव्ही-सी ३३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा