चालू घडामोडी : ३ जुलै

भारत-इस्राईल राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण

  • भारत-इस्राईल राजनैतिक संबंधांच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ ते ६ जुलै दरम्यान इस्राईलच्या भेटीवर जाणार आहेत.
  • गेल्या ७० वर्षांत इस्राईलला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान असून, दोन्ही देशांतील संबंध या दौऱ्यामुळे अधिक दृढ होतील.
  • या भेटीत इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि नरेंद्र मोदी यांचा द्विपक्षीय संबंधांचे विस्तारीकरण तसेच ते सखोल करण्यावर भर राहील.
  • इस्राईलला मान्यता दिल्यानंतर त्या देशाबरोबर पूर्ण स्वरूपाचे राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास २५ वर्षे पूर्ण होत आहेत.
  • कृषी क्षेत्र, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच संशोधन, संरक्षण, जल व्यवस्थापन, ऊर्जा अशा विविध क्षेत्रांत भारत व इस्राईल दरम्यानचे सहकार्य विस्तारलेले आहे.
  • भारतात १५ राज्यांत कृषिविषयक सेंटर्स ऑफ एक्सलन्स उभारून शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी संशोधन, प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जल व पीक व्यवस्थापन यासंदर्भात इस्राईलने भारताला भरीव मदत केली आहे.
  • २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरूप बचावलेला मुलगा मोशे यालाही मोदी या दौऱ्यामध्ये भेटणार आहेत. खाबाद हाउसवर झालेल्या हल्ल्यामध्ये मोशेचे आई-वडील मारले गेले होते.
  • इस्राईलनंतर मोदी ७ व ८ जुलै रोजी जर्मनीमधील हॅंबर्ग येथे होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेसाठी जाणार आहेत.
  • व्यापार, आर्थिक सहकार्य, विकास, पर्यावरण व वातावरण बदल या मुद्द्यांबरोबरच दहशतवादावरही या परिषदेत चर्चा होणे अपेक्षित आहे.
 भारत-इस्राईल द्विपक्षीय संबंधांचा प्रवास 
  • १९४७: पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले.
  • १९५०: भारताने इस्राईलला कायदेशीर मान्यता दिली.
  • १९५३: इस्राईलला मुंबईत वाणिज्य दूतावास उघडण्याची परवानगी मिळाली.
  • १९५० ते १९९०: भारत आणि इस्राईल दरम्यान अनौपचारिक स्वरूपाचे संबंध.
  • १९९२: दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले.
  • १९९७: इस्राईलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
  • २०००: उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्राईलला भेट
  • २००३: इस्राईलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट.
  • २००६: कृषिमंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची इस्राईल भेट.
  • २०१२: परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्राईलला भेट.
  • २०१४: पंतप्रधान नरेंद्र मोदी व बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यूयॉर्कमध्ये भेट.
  • २०१४: गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्राईलला भेट.
  • २०१५: इस्राईलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट.
  • २०१५: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन व इस्राईलला भेट. इस्राईलला जाणारे व तेथील संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय राष्ट्रपती.
  • २०१६: परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची इस्राईलला भेट.
  • २०१६: इस्राईलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांची भारताला भेट. मुंबईत खाबाद हाउसलाही दिली भेट.

जर्मनीने जिंकला कॉन्फेडरेशन्स चषक

  • २०१४साली झालेल्या फिफा विश्वचषकाच्या विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या जर्मनीने २०१७च्या कॉन्फेडरेशन्स चषकावरही प्रथमच आपले नाव कोरले.
  • विश्वविजेत्या जर्मनीने अंतिम लढतीत चिलीचा १-० असा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला.
  • शेवटपर्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत २०व्या मिनिटाला मिडफिल्डर स्टॅनडलने केलेला एकमेव गोल जर्मनीच्या विजयात निर्णायक ठरला.
  • फुटबॉलमध्ये विश्वचषक आणि कॉन्फेडरेशन्स चषक अशा दोन स्पर्धा जिंकणारा आता जर्मनी हा फ्रान्स आणि ब्राझील यांच्यानंतरचा तिसरा संघ ठरला आहे.
  • स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूसाठी दिला जाणारा ‘गोल्डन बॉल’ पुरस्कार जर्मनीच्या ज्युलियन ड्रॅक्सलरला प्रदान करण्यात आला.
  • चिलीच्या अ‍ॅलेक्सिश सांचेझला ‘सिल्व्हर बॉल’ आणि जर्मनीच्या लीऑन गोरेत्झकाने ‘ब्राँझ बॉल’ किताबावर मोहोर उमटवली.
  • आरबी लीपझिग क्लबचा आघाडीचा आक्रमणपटू वेर्नेरने स्पर्धेतील सर्वाधिक गोलसाठी दिला जाणारा ‘गोल्डन बूट’ किताब जिंकला.
  • प्रत्येकी एक गिल केलेल्या स्टिंडल आणि गोरेत्झका यांना ‘सिल्व्हर बूट’ हा किताब संयुक्तपणे देण्यात आला.
  • या चषकाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पोर्तुगालने मेक्सिकोवर २-१ ने मात करत तिसरे स्थान पटकावले.
  • या स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच रशियाला देण्यात आले होते. तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेचा यजमान असल्यामुळे प्रथमच रशियाला कॉन्फेडरेशन चषक स्पधेत खेळण्याची संधीही मिळाली होती.
  • २००५, २००९ आणि २०१३ असे सलग ३ वेळा कॉन्फेडरेशन चषक जिंकणाऱ्या ब्राझीलच्या संघाला यावर्षी या स्पधेसाठी पत्र ठरण्यास अपयश आले.
 फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
  • फिफा कॉन्फेडरेशन्स चषक फिफाद्वारे आयोजीत केली जाणारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे. ही स्पर्धा सध्या दर चार वर्षांनी खेळवली जाते.
  • ह्या स्पर्धेत जगातील सहा फुटबॉल महामंडळांमधून प्रत्येक एक संघ निवडला जातो. विद्यमान विश्वचषक विजेता तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेचा यजमान देश ह्यांना या स्पर्धेत आपोआप प्रवेश मिळतो.
  • आशियामधून एएफसी. आशिया चषक विजेता, आफ्रिकेमधून आफ्रिका देशांचा चषक विजेता, उत्तर व मध्य अमेरिकेमधून कॉन्ककॅफ गोल्ड चषक विजेता, दक्षिण अमेरिकेमधून कोपा अमेरिका विजेता, ओशनियामधून ओ.एफ.सी. देशांचा चषक विजेता तर युरोपामधून युएफा यूरो विजेता देश कॉन्फडेरशन्स चषकासाठी पात्र ठरतात.
  • १९९२साली सौदी अरेबियामध्ये किंग फहाद चषक या नावाने या स्पर्धेची सुरूवात झाली.
  • आत्तापर्यंत केवळ मेक्सिको (१९९९), फ्रान्सने (२००३) आणि ब्राझील(२०१३) या ३ देशांनी कॉन्फेडरेशन चषक यजमानपद भूषविताना स्पर्धेचे जेतेपदही पटकाविले आहे.

अमेरिकेकडून भारताला सी-१७ विमानांची विक्री

  • ट्रम्प प्रशासनाने भारताला बोइंग कंपनीची सी-१७ मालवाहू विमान विकण्याचा निर्णय घेतला आहे. या विमानाची अंदाजित रक्कम ३६.६२ कोटी डॉलर आहे.
  • या प्रस्तावित विक्रीमुळे भारताची सद्यःस्थिती आणि भविष्यात हवाई दलाच्या परिवहनाच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
  • हवाई वाहतुकीच्या या अतिरिक्त क्षमतेचा वापर हा संकटकाळात आणि आपत्कालीन काळात करता येणार आहे.
  • सी-१७ विमानाची कमी लांबीच्या धावपट्टीवर उतरण्याची क्षमता असून एअर लिफ्ट आणि एअर ड्रॉप या अभियानात ते महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकते.
  • सी-१७ विमान हे १,७०,९०० पौंडाचे वजनी सामान (जवान, रुग्ण आणि उपकरणासह) ने-आण करू शकते.
  • तसेच यात क्षेपणास्त्र सूचना यंत्रणा, आयडेंटिफिकेशन फ्रेंड किंवा फोई (आयएफएफ) ट्रान्सपॉंडर, काऊंटर मेजर डिस्पेसिंग सिस्टिम तसेच दिशादर्शक उपकरणाचा समावेश आहे.

सीआयएसएफद्वारे पुरविण्यात येणार सुरक्षा जगातील सर्वोत्तम

  • वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) पुरवण्यात येणारी सुरक्षा जगातील सर्वोत्तम सुरक्षा असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.
  • यासाठी वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसतर्फे लवकरच सीआयएसएफला पुरस्कार देत सन्मानित करण्यात येणार आहे.
  • सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दल सीआयएसएफने राखलेला दर्जा सर्वोत्तम असून वर्ल्ड क्वालिटी काँग्रेसकडून त्यांची दखल घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • दिल्ली विमानतळावरुन दरवर्षी किमान ५६ दशलक्ष प्रवासी प्रवास करत असतात. या विमानतळावर रोज ४००० सीआयएसएफ जवान दिवसरात्र सुरक्षेसाठी तैनात असतात.
  • दिल्लीसह मुबई, चेन्नई आणि कोलकाता विमानतळ संवेदनशील असून नेहमी रडारवर असतात. दहशतवादी कारवाया करण्यासाठी नेहमीच या विमानतळांना टार्गेट केलं जातं. त्यामुळे यांची सुरक्षा जास्त महत्वाची असते.

रेल्वेकडून इकॉनॉमी एसी कोचेसची घोषणा

  • भारतीय रेल्वेने आता स्वस्तात वातानुकूलित (एसी) प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.
  • रेल्वेकडून तृतीय श्रेणी एसी कोचसाठी आकारल्या जाणाऱ्या भाड्यापेक्षा कमी भाडे असलेल्या नव्या इकॉनॉमी एसी कोचेसची घोषणा करण्यात आली आहे.
  • या प्रस्तावित संपूर्ण एसी रेल्वेमध्ये एसी-३, एसी-२ आणि एसी-१ या कोचेसच्या बाजूला हे तीन टायर इकॉनॉमी एसी कोचेस असतील.
  • नवीन इकॉनॉमी एसी श्रेणीच्या डब्यातील थंडावा अन्य एसी ट्रेनच्या तुलनेत कमी असेल. यातील तापमान २४ ते २५ डिग्री सेल्शिअस एवढे असेल.
  • या प्रस्तावित पूर्णत: वातानुकूलित रेल्वेचे आणखी एक वैशिष्ट्य असे की यात स्वयंचलित दरवाजेही असतील.
  • बाह्य उष्म्यापासून बचाव करून प्रवाशांचा प्रवास आरामदायी करणे, हाच या प्रस्तावित योजनेचा उद्देश आहे.
  • सध्या मेल आणि एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना स्लीपर, थर्ड एसी, सेकन्ड एसी आणि फर्स्ट एसी दर्जाचे डबे आहेत. तर राजधानी, शताब्दी, हमसफर आणि तेजस या गाड्या संपूर्ण वातानुकूलित आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा