चालू घडामोडी : १५ जुलै

रेल्वेकडून ‘रेल सारथी’ मोबाईल अॅप लॉंच

  • रेल्वे प्रवाशांचा समस्या किंवा अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेकडून ‘रेल सारथी’ (Rail Saarthi) मोबाईल अॅप रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते १४ जुलै रोजी लॉंच करण्यात आले.
  • याआधी एखाद्या प्रवाशाला रेल्वेसंबंधी तक्रार करायची असल्यास अनेक अडचणी येत होत्या. तसेच, तक्रार केल्यानंतर काय कारवाई होते, यासंदर्भात प्रश्न उपस्थित होत होते.
  • मात्र आता रेल सारथी या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांच्या रेल्वे प्रवासासंबंधी सर्व प्रश्नांची उत्तरे मिळू शकणार आहे.
  • या मोबाईल अॅपवरुन रेल्वे तिकीट, प्लॅटफॉर्म तिकिट बुकींगही करता येणार आहे. तसेच या अॅपच्या माध्यमातून विमानाचे तिकीटही बुक करता येणार आहे.
  • प्रवासादरम्यान खाद्यपदार्थांची ऑर्डर, रेल्वेचे टाईम टेबल आणि विशेष म्हणजे रेल्वेचे लोकेशन सुद्धा या अॅपमधून पाहता येणार आहे.
  • रेल्वेच्या आगमन आणि प्रस्थानाची वेळ, प्लॅटफॉर्म नंबर, ट्रेनला होणारा उशीर, रद्द गाड्या, आसन व्यवस्था यांची माहितीही मिळणार आहे.
  • त्याचबरोबर या अॅपमध्ये महिला सुरक्षा, तक्रार आणि सूचना नोंदवण्याचीही सोय आहे.
  • यासोबतच या अॅपवरून टॅक्सी, पोर्टस सर्व्हिस, रिटायरिंग रूम हॉटेल, टूर पॅकेज, ई कॅटरिंग आदींचे बुकिंग करता येणार आहे.
  • भारतीय रेल्वे या सेवा, संबंधित आस्थापनांशी मिळकत वाटणीच्या मॉडेलच्या आधारावर उपलब्ध करून देईल.
  • त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून रेल्वेला दरवर्षी किमान १०० कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे.  
 एसी कोचमध्ये दिव्यांगांना आरक्षण 
  • प्रभू यांनी थर्ड एसी कोचमध्ये दिव्यांगांसाठी आरक्षणाचीही सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
  • आता थर्ड एसी कोचमध्ये दिव्यांगांसाठी लोअर बर्थ आरक्षित राहणार आहे. तर दिव्यांगासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मधली बर्थ आरक्षित राहणार आहे.
  • मात्र, एका थर्ड एसी कोचमध्ये एकच लोअर बर्थ दिव्यांगांसाठी आरक्षित असणार आहे.
  • आजवर केवळ स्लिपर क्लासमध्येच दिव्यांगांसाठी दोन बर्थ आरक्षित करण्याची सोय होती.
  • याशिवाय परदेशी नागरिकांना अॅडव्हांस बुकींगच्या सुविधेला १२० दिवसांवरून वाढवून ३६५ दिवस करण्यात आली आहे.

डॉ. मुरली बनावत यांना ब्रिक्सचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार

  • सौरऊर्जेच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे तेलंगणचे वैज्ञानिक डॉ. मुरली बनावत यांना ब्रिक्स देशांचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे. 
  • हैदराबाद विद्यापीठात रसायनशास्त्राचे सहायक प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांनी सौरऊर्जेवर संशोधन केले आहे.
  • मूळचे तेलंगणातील निझामाबाद जिल्ह्यातील असलेल्या बनावत यांनी फोटोव्होल्टॅइक सोलर सेलवर (प्रकाशीय सौर विद्युतघट) संशोधन केले आहे.
  • त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून बीएस्सी तर हैदराबाद विद्यापीठातून एमएस्सी पदवी घेतली. नंतर बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेतून फोटोव्होल्टॅइक सेलवर पीएचडी केली.
  • त्यांचे शोधनिबंध अनेक नामांकित नियतकालिकांत प्रसिद्ध झाले असून फ्रंटियर्स इन ऑप्टिक्स अँड फोटॉनिक्स, फ्रंटिटर इन फिजिक्स या नियतकालिकांचे ते संपादकही आहेत.
  • त्यांनी काही काळ सौदी अरेबियातील किंग अब्दुल्ला युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत संशोधन करताना सौरऊर्जा साठवण्यासाठी नवीन रासायनिक घटकांचा शोध घेतला आहे.
  • फोटोव्होल्टॅइक सेलसाठी सेंद्रिय व पेरोव्हस्काइट पदार्थ किफायतशीर ठरतात, ही गोष्ट त्यांनी प्रथम प्रयोगानिशी दाखवून दिली.
  • सौरऊर्जा हा प्रदूषणविरहित स्रोत असला, तरी त्याच्या साठवणुकीत असलेल्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
  • त्यासाठी पेरोव्हस्काइटचा वापर केलेले स्वस्त व वापरण्यास सोपे विद्युत घट त्यांनी तयार केले आहेत.
  • सौरऊर्जा साठवणीसाठी नवनवीन रासायनिक पदार्थ विकसित करण्यात त्यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे.
  • सौरघटाच्या निर्मितीत डॉ. मुरली यांनी मोठे काम केले असून त्याचा फायदा केवळ भारतालाच नव्हे तर ब्रिक्स देशांनाही होणार आहे.

गर्बाइन मुगुरुझाला विम्बल्डनचे विजेतेपद

  • स्पेनची महिला टेनिसपटू गर्बाइन मुगुरुझाने अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सला नमवून विम्बल्डनच्या महिला एकेरीचे जेतेपद पटकावले आहे.
  • मुगुरुझाने ७-५, ६-० असा सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. तिचे कारकिर्दीतील हे पहिलेचे विम्बल्डनचे जेतेपद आहे.
  • मुगुरुझाने कारकिर्दीतील हे दुसरे ग्रँण्डस्लॅम विजेतेपद आहे. २०१६मध्ये तिने सेरेना विल्यम्सला हरवून फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.
  • कारकिर्दीत दुसऱ्यांदा विम्बल्डन महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मुगुरुझाला याआधी २०१५साली सेरेना विलियम्सविरुद्ध पराभव झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
  • गर्बाइन मुगुरुझाच्या रूपाने २३ वर्षांनंतर प्रथमच स्पेनच्या खेळाडूला विम्बल्डन स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावण्यात यश आले.
  • याआधी मुगुरुझाची विद्यमान प्रशिक्षक कोंचिटा मार्टिनेज यांनी १९९४मध्ये मार्टिना नवरातिलोवाला नमवून विम्बल्डन स्पर्धा जिंकणाऱ्या स्पेनच्या पहिल्या महिला खेळाडूचा मान मिळवला होता.
  • उपविजेत्या व्हीनसने याआधी २०००, २००१, २००५, २००७ आणि २००८ मध्ये पाच वेळा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे.

भारताच्या सुंदरसिंह गुर्जरला सुवर्णपदक

  • लंडन येथे सुरु असलेल्या आंतराष्ट्रीय पॅरा-अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुंदरसिंह गुर्जरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • भालाफेक प्रकारात सुंदरने ६०.३६ मीटर लांब भाला फेकत श्रीलंकेच्या दिनेश प्रियंथाला मागे टाकत ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
  • राजस्थानच्या २१ वर्षीय सुंदर सिंगला गेल्यावर्षी रिओ पॅरा ऑलिंपिक स्पर्धेत उशिरा पोहचल्यामुळे अपात्र ठरविण्यात आले होते.
  • सुंदरने यापूर्वी फेझा आयपीसी ऍथलेटिक्स ग्रा प्रि स्पर्धेत भालाफेक, गोळाफेक आणि थाळीफेक या प्रकारात तीन सुवर्णपदके मिळविली होती.

गडचिरोलीत हिवताप नियंत्रणासाठी कार्यगट स्थापन

  • गडचिरोली जिल्हय़ातील हिवतापाचा प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी सर्च फाऊंडेशनचे संस्थापक महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट (टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, सर्च फाऊंडेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ, जबलपूर आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे.
  • गडचिरोलीत अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा अजूनही पोहोचलेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाने असंख्य आदिवासी मृत्युमुखी पडतात.
  • शासनाच्या या मंजुरीनुसार एकूण नऊ सदस्यीय कार्यगटाच्या अध्यक्षपदी डॉ. अभय बंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 कार्यगटाचे सदस्य 
  • अध्यक्ष: डॉ. अभय बंग
  • सहअध्यक्ष: आरोग्य सेवा संचालनालयचे (मुंबई) संचालक
  • माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे
  • राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संस्थेचे (जबलपूर) संचालक
  • टाटा ट्रस्ट रुग्णालयचे (मुंबई) प्रतिनिधी 
  • राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमचे (नवी दिल्ली) तज्ञ प्रतिनिधी
  • राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे (पुणे) कीटकशास्त्रज्ञ
  • महाराष्ट्राचे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे प्रतिनिधी
  • पुण्याचे आरोग्य सेवा सहसंचालक
 कार्यगटाची कार्य व उद्दिष्टे 
  • हिवताप नियंत्रण जिल्ह्यातील हिवताप परिस्थितीचा अभ्यास करणे.
  • हिवताप परिस्थितीचे विश्लेषण करून वाढीची कारणे शोधणे.
  • त्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करणे.
  • कीटकनाशकांची फवारणी, मच्छरदाणी, आवश्यक मनुष्यबळ या बाबींचे सुयोग्य व्यवस्थापन करणे.
  • स्थानिक भाषेतून प्रभावी आरोग्य शिक्षण देण्यासाठी कृती योजना आखणे.
  • औषधांच्या तसेच कीटकनाशकांच्या प्रतिरोधाचा अभ्यास करणे.
  • शेजारील राज्यातील हिवताप परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून त्या अनुषंगाने आंतरराज्य सभेचे आयोजन करणे.
  • गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप रुग्णांचे प्रमाण तीन वर्षांमध्ये कमीत कमी राहील यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे.

महाराष्ट्र राज्य मुक्त शालेय शिक्षण मंडळ योजना

  • महाराष्ट्र राज्य मुक्त शालेय शिक्षण मंडळ स्थापन करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मान्यता दिली आहे.
  • शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.
  • पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीच्या परीक्षांना समकक्ष परीक्षा या मंडळातर्फे घेतल्या जातील. हे प्रस्तावित मंडळ राज्य मंडळाचा भाग राहणार आहे.
  • शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचे व्यवसायिक कौशल्य, व्यवहारिक ज्ञान, गरजा यांचा वेगळा विचार सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत नाही.
  • त्यामुळे या योजनेद्वारे मुक्त विद्यालयासाठी प्रवेशाच्या पाचवी, आठवी, दहावी आणि बारावीसाठी स्वतंत्र पात्रता ठरविण्यात आल्या आहेत.
  • यामुळे कला, क्रिडा क्षेत्रात रस असणाऱ्या व करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता केवळ दहावी व बारावीमध्ये अशा विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊन मुक्त विद्यालयाची परीक्षा देता येणार आहे.
  • या योजनेसाठी राज्य पातळीवर शिक्षण संचालक दर्जाचा अधिकारी प्रमुख राहणार आहे.
  • इतर अधिकारी व कर्मचारी हे प्रतिनियुक्ती अथवा कंत्राटी तत्वावर नेमण्याचा अधिकार राज्य मंडळास शासन मान्यतेने राहणार आहे.
 योजनेची उद्दिष्टे 
  • औपचारिक शिक्षणाला पूरक व समांतर शिक्षण पद्धती.
  • शालेय शिक्षणातील गळती रोखणे.
  • प्रौढ व्यक्ती, गृहिणी, कामगार आदी सर्वांना शिक्षणाच्या संधी उपल्ब्ध.
  • व्यवसायाभिमुख शिक्षण देणे,
  • स्थानिक स्तरावर शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी शिक्षणाची सुविधा.
 योजनेची वैशिष्टये 
  • सोयीनुसार अध्ययनाची सवलत.
  • अभ्यासक्रमाची लवचिकता.
  • व्यवसायिक विषयांची उपलब्धता.
  • संचित मुल्यांकनाची व्यवस्था.
  • सर्वांना शिक्षणाची व्यवस्था.
  • दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था.

१५ जुलै: महाराष्ट्र कबड्डी दिन

  • महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्यावतीने शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचा १५ जुलै हा जन्मदिन संपूर्ण राज्यात ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • अनेकांचा विरोध डावलून, ९ खेळाडूंचा ’हुतुतू’ आणि ७ खेळाडूंचा ’आंतराराष्ट्रीय कबड्डी’ यांचे संमीलन घडवून बुवा साळवी यांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून दिली.
  • अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्षपद बुवांकडे होते. बुवा साळवी हे महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या कबड्डी संघटनेचे आधारस्तंभ होते. 
  • बुवा साळवींनी केलेल्या प्रयत्नांमुळेत कबड्डीचा १९९०च्या आशियाई खेळांमध्ये समावेश झाला आणि पुढील पाच चतुर्वार्षिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवता आले.
  • यानंतर भारताच्या बाहेर जपान, पाकिस्तान, आणि बंगला देश यांचे संघही कबड्डी खेळू लागले.
  • कबड्डीतल्या आपल्या कार्यासाठी बुवांना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र आणि देशभरात बुवा ‘कबड्डी महर्षी’ नावाने ओळखले जायचे.
  • महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा मानाचा ‘शिवछत्रपती जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सत्कार केला होता. वयाच्या ७५ व्या वर्षी बुवांचे दीर्घ आजाराने निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा