चालू घडामोडी : ६ सप्टेंबर

पंतप्रधान मोदी म्यानमार दौऱ्यावर

  • ब्रिक्स देशांची नववी शिखर परिषद ५ सप्टेंबर रोजी संपल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या म्यानमार दौऱ्यावर आहेत.
  • या दौऱ्यात त्यांनी भारत व म्यानमारमधील द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यावर भर दिला आहे. तसेच रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्नही अप्रत्यक्षपणे उपस्थित केला.
  • यावेळी मोदींनी म्यानमारच्या नागरिकांसाठी नि:शुल्क व्हिसा उपलब्ध करवून देण्याची घोषणा केली.
  • म्यानमारमध्ये सुरु असलेला वांशिक तणाव आणि रोहिंग्यावर होणारा अत्याचार यामुळे रोहिंग्या मोठ्या संख्येने म्यानमारची सीमा ओलांडून इतर देशांमध्ये विस्थापित होत आहेत.
  • म्यानमारच्या राखिन प्रांतात सुरु असलेल्या दंगली व जाळपोळीच्या सत्रामुळे गेल्या ११ दिवसांमध्ये १.२५ लाख लोकांनी म्यानमारची सीमा ओलांडून बांगलादेशात प्रवेश केला आहे.
  • सध्या भारतात ४० हजार विस्थापित रोहिंग्या राहत असून, भारताने त्यांची पुन्हा म्यानमारमध्ये रवानगी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 भारत-म्यानमार संबंध 
  • भारत आणि म्यानमार या शेजारी देशांचे संबंध गेली अनेक शतके अस्तित्वात आहेत. राजकीय तसेच व्यापारी आणि सांस्कृतिक आदानप्रदान या देशांमध्ये नेहमीच होत राहिले.
  • भारतामध्ये उगम पावलेला बौद्ध धर्म आशियातील विविध देशांमध्ये पसरत गेला. म्यानमारमध्ये आज ९० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या बौद्धधर्मिय आहेत.
  • म्यानमारमध्ये भारतीय वंशाचे आणि हिंदू लोकही राहतात. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या व्यवसायामुळे म्यानमारमध्ये भारतीय लोक नोकरीसाठी स्थायिक झाले होते.
  • १९३७पर्यंत म्यानमार म्हणजे तेव्हाचा ब्रह्मदेश ब्रिटिश भारताचा हिस्सा होता. १९४८साली म्यानमार स्वतंत्र झाल्यानंतर भारताने म्यानमारशी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले.
  • १९८७साली पंतप्रधान राजीव गांधी यांनी म्यानमारला भेट दिली होती. त्यानंतर पी. व्ही. नरसिंहराव यांनी दोन्ही देशांच्या संबंधाना वेग आणला. 
  • २०००सालच्या आकडेवारीनुसार म्यानमार भारताला २२ कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या उत्पादनांची निर्यात करत होता तर भारताकडून ७.५ कोटी डॉलर्स इतक्या रकमेच्या वस्तूंची आयात करत होता.
  • थायलंड, चीन, सिंगापूरनंतर भारत हा म्यानमारसाठी चौथ्या क्रमांकावरचा महत्त्वाचा व्यापार भागीदार आहे.
  • आता भारताने म्यानमार- थायलंड असा रस्तामार्ग तयार करण्यासाठी हात पुढे केला आहे.
  • तसेच कलादान मल्टिनोडल ट्रान्सपोर्ट प्रकल्पासही सुरुवात झाली आहे. यामध्ये कोलकाता आणि सित्वे ही बंदरे जलमार्गाने जोडली जातील. दोन्ही देशांना व्यापारासाठी याचा मोठा उपयोग होईल.
 आंग सान सू क्यी 
  • या दौऱ्यादरम्यान मोदींनी म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू क्यी यांची भेट घेतली.
  • ७२ वर्षांच्या सू क्यी यांचे वडिल आंग सान हे म्यानमारचे पितामह तसेच म्यानमारच्या स्वातंत्र्याचे शिल्पकारही म्हणून ओळखले जातात.
  • ब्रह्मदेशच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. परंतु त्यांना ब्रह्मदेश स्वतंत्र झालेला पाहता आला नाही. स्वातंत्र्यापुर्वी ६ महिने आधीच त्यांची हत्या करण्यात आली.
  • आंग सान सू क्यी यांचा जन्म १९ जून १९४५ रोजी रंगूनमध्ये झाला. १९६०मध्ये त्या आईबरोबर भारतात आल्या.
  • त्यांची आई डॉव खिन क्यी यांची म्यानमारच्या नेपाळ व भारतामधील राजदूतपदावरती नेमणूक झाली होती.
  • भारतामध्ये आंग सान यांनी नवी दिल्लीमधील कॉन्व्हेंट ऑफ जिझस अॅंड मेरीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले आणि लेडी श्रीराम महाविद्यालयामध्ये राज्यस्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
  • त्यानंतर सेंट ह्युज महाविद्यालय, ऑक्सफर्ड येथे तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रामध्ये बीए पदवी आणि राज्यशास्त्रात एमए पदवी संपादित केली.
  • त्यानंतर त्यांनी एमफिल पर्यंत शिक्षण घेतले. शिक्षणानंतर सू ची यांनी संयुक्त राष्ट्रासाठी तीन वर्षे काम केले.
  • त्यांनतर त्यांनी लष्करशाहीने पोखरलेल्या मायदेशामध्ये लोकशाहीसाठी काम करण्याचे ठरवले व सरकारच्या विरोधातील प्रमुख आवाज म्हणून त्यांनी अल्पावधीत स्वतःचे स्थान निर्माण केले.
  • त्यामुळे १९८९साली त्यांना प्रथम नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले. म्यानमारमधील २१ वर्षांपैकी १५ वर्षे सू क्यी यांनी नजरकैदेत घरातच काढली.
  • १३ नोव्हेंबर २०१० रोजी सू ची यांची नजरकैदेतून सुटका करण्यात आली. सध्या त्या म्यानमारच्या पहिल्या स्टेट कौन्सिलर तसेच परराष्ट्रमंत्रीही आहेत.
  • त्यांना नोबेल, राफ्टो, साखरोव, सायमन बोलिव्हॉं प्राईझ, ऑलोफ पामे प्राईझ, कॉंग्रेशनल गोल्ड मेडल अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
  • आंग सान सू क्यी यांचा जवाहरलाल नेहरु अॅवॉर्ड आणि भगवान महावीर वर्ल्ड पीस अॅवॉर्डने भारतात सन्मान करण्यात आला आहे.
  • भारताबद्दलच्या सर्व आठवणी आंग सान सू क्यी यांनी ‘द परफेक्ट होस्टेज’ या पुस्तकामध्ये संग्रहित केल्या आहे.

प्रसिध्द पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या

  • पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बेंगळुरू येथील त्यांच्या राहत्या घरी ५ सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
  • चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देश पुन्हा एकदा सुन्न झाला आहे.
  • यापूर्वी ज्या पद्धतीने उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या विचारवंतांची हत्या करण्यात आली. त्याच पद्धतीने हे हत्याकांड घडले आहे.
  • हिंदुत्वावादाचा विरोध केल्याचा समज करीत यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर (२०१३), ज्येष्ठ साहित्यिक एम कलबुर्गी (२०१५) आणि गोविंद पानसरे (२०१५) यांच्या हत्या करण्यात आली होती.
  • या घटनेनंतर राजकारणी आणि कला-साहित्य विश्वातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत, या घटनेचा निषेध केला आहे.
  • पत्रकार गौरी लंकेश प्रसिद्ध कवि पी. लंकेश यांच्या कन्या होत्या. त्या ‘लंकेश पत्रिका’ या कन्नड साप्ताहिकाच्या संपादक होत्या.
  • विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्त वाहिन्यावर प्राइम टाइममध्ये होणाऱ्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा.
  • त्या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या.

भारत एस-४०० सिस्टीम खरेदी करणार

  • भारत लवकरच रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करणार असून, भारतीय हवाई दलाने नुकत्याच या क्षेपणास्त्राच्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
  • हवाई दलात एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीमचा समावेश झाल्यानंतर हवाई सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. 
  • एस-४०० सिस्टीमद्वारे शत्रूची लढाऊ, टेहळणी विमाने, क्रूझ मिसाईल आणि ड्रोन विमाने ४०० किलोमीटर अंतरावर असतानाच नष्ट करता येऊ शकतात.
  • या सिस्टीममुळे भारताला आपल्या हद्दीत राहूनच चीन आणि पाकिस्तानचे हवाई हल्ले निष्प्रभ करता येतील तसेच हवाई वर्चस्वही मिळवता येईल. 
  • रशियामध्ये भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दोनवेळा या सिस्टीमच्या यशस्वी चाचण्या घेतल्या.
  • या चाचण्या पूर्ण झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयाचा रोसो बोरॉन एक्सपोर्ट या कंपनीबरोबर खरेदी प्रक्रिया सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • ही कंपनी रशियाच्या अन्य देशांबरोबरच्या संरक्षण व्यवहाराचे काम पाहते. त्यात किंमती ठरवणे, डिलव्हरी या विषयांचा समावेश असतो.
  • एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम महागडी असली तरी, भारताला ही सिस्टीम मिळविणे अत्यंत आवश्यक आहे.  
  • या सिस्टीममुळे भारताला पाकिस्तानवर वरचढ होता येईल तसेच चीनशी बरोबरी साधता येईल. कारण चीनने आधीच ही सिस्टीम विकत घेतली आहे. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या उपस्थितीत ऑक्टोंबर २०१६मध्ये १७व्या भारत-रशिया परिषदेत एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम विक्रीचा करार झाला होता.
 एस-४०० एअर डिफेन्स सिस्टीम 
  • रशियाच्या अलमाझ अँटे कंपनीने एस-४०० एअर डिफेंन्स मिसाईल सिस्टीम बनवली आहे. यामध्ये रडार, मिसाइल लाँचर्सचा समावेश आहे. 
  • ४०० किलोमीटरच्या टप्प्यातील ३६ लक्ष्याचा एकाचवेळी लक्ष्यभेद करण्याची क्षमता या सिस्टीममध्ये आहे. 
  • या सिस्टीममुळे पाकिस्तानचे सर्व हवाई तळ आणि तिबेटमधील चीनचे लष्करी तळ भारताच्या रेंजमध्ये येतील. 

जागतिक विद्यापीठांच्या यादीत भारताची घसरण

  • उच्च शिक्षणासंदर्भात जागतिक विद्यापीठांच्या क्रमवारीचा १४वा वार्षिक अहवाल ‘टाइम’कडून प्रसिद्ध करण्यात आला.
  • या अहवालात ७७ देशांतील १००० विद्यापीठांचा समावेश आहे. यामध्ये भारतातील विद्यापीठांच्या क्रमवारीत घसरण झाल्याचे दिसते. 
  • या अहवालानुसार, जागतिक स्तरावर पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा किंवा उच्च शिक्षण संस्थेचा समावेश नाही.
  • भारतातील नावाजलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) या संस्थांच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे.
  • संशोधनातील घटलेल्या प्रमाणामुळे आयआयएससीच्या क्रमवारीत मोठी घसरण झाली आहे. ही संस्था २०१ ते २५० या गटातून घसरून यंदा २५१ ते ३०० गटात गेली आहे.
  • त्याचबरोबर आयआयटी (दिल्ली), आयआयटी (कानपूर) आणि आयआयटी (मद्रास) या नावाजलेल्या संस्थांच्या क्रमवारीतही घसरण झाली आहे.
  • या आकडेवारीनुसार, जागतिक स्तरावर ऑक्सफर्ड विद्यापीठ पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
  • केंब्रिज विद्यापीठ कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्टँडफोर्ड विद्यापीठ या संस्थांना मागे टाकत दुसऱ्या स्थानावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा