चालू घडामोडी : ९ सप्टेंबर

‘डेरा’च्या मुख्यालयात शोधमोहीम सुरु

  • बलात्कार प्रकरणात दोषी राम रहिमच्या तब्बल ८०० एकरात वसलेल्या ‘डेरा सच्चा सौदा’च्या मुख्यालयात सशस्त्र सुरक्षा दलाचे जवान व पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शोधमोहीम सुरु केली आहे.
  • या मोहिमेत कोणीही बाधा आणू नये यासाठी खबरदारी म्हणून सिरसा आणि परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेचे चित्रणही करण्यात येत आहे.
  • याशिवाय सिरसा जिल्ह्यात अफवा रोखण्यासाठी १० सप्टेंबरपर्यंत मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
  • यामध्ये त्यांनी नोंदणी न झालेल्या अलिशान गाड्या, चलनातून बाद झालेल्या नोटा, अनेक लॅपटॉप व कॉम्प्युटर्स, हार्ड डिस्क्स, कसलीही लेबल नसलेली औषधे तसेच महागडे ड्रेस व शूज आदी साहित्य जप्त केले.
  • याशिवाय मुख्यालयात अवैध स्फोटके आणि फटाक्यांचा कारखानाही आढळून आला आहे. या कारखान्याला पोलिसांनी टाळे ठोकले आहे. त्यातील स्फोटके आणि फटाके ताब्यात घेतले आहेत.
  • याबरोबरच राम रहीमच्या गुहेकडे जाणारा गुप्त मार्ग शोधण्यात आला. तेथे अनेक एकरांवर सेंद्रिय शेती होते. आतमध्ये हजारांहून अधिक मजूर व कामगार आतापर्यंत काम करीत होते.
  • डेरा परिसरात १६ नाके तयार करण्यात आले असून निमलष्करी दलाच्या ४१ तुकड्या (सुमारे ५ हजार जवान) सिरसामध्ये तैनात आहेत.
  • या शोध मोहिमेत ४१ निमलष्करी तुकड्या, ४ जिल्ह्यांतील पोलीस, बॉम्बशोधक पथके आणि एका श्वानपथकाचा समावेश आहे.
  • यावेळी अधिकाऱ्यांच्या मदतीला १० लोहारही घेण्यात आले आहेत. लोहारांच्या मदतीने डेऱ्यातील अनेक खोल्या उघडण्यात आल्या.
  • या परिसरात शाळा, महाविद्यालय, अम्युजमेंट पार्क, मॉल, दुकाने, रुग्णालय याबरोबरच मसाला बनवण्याची फॅक्टरी, चित्रपटगृह असल्याचे आढळून आले आहे.

युवा राष्ट्रकुल स्पर्धेत निकिताला सुवर्णपदक

  • ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे आयोजित युवा राष्ट्रकुल स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात नाशिकची वेटलिफ्टर निकिता काळेने सुवर्णपदक जिंकले.
  • तिने ७३ किलोपर्यंत स्नॅच आणि ९० किलोपर्यंत क्लीन जर्क असे एकूण १६३ किलो वजन उचलून सुवर्णपदकावर नाव कोरले.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण मिळविणारी निकिता ही नाशिक जिल्ह्य़ातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.
  • नाशिकच्या छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेची निकिता ही विद्यार्थिनी असून छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.
  • याआधी बँकॉक येथे एप्रिलमध्ये झालेल्या जागतिक युवा स्पर्धेसाठी भारतीय संघात तिची निवड झाली होती.
  • डिसेंबर २०१६मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या युवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत निकिताने सुवर्ण आणि कांस्य अशी कमाई केली होती.

अमेरिकी लेखिका केट मिलेट यांचे निधन

  • जगातील स्त्रीवादाला नवी कलाटणी देणाऱ्या बंडखोर अमेरिकी लेखिका व कलाकार केट मिलेट यांचे ६ सप्टेंबर रोजी निधन झाले.
  • मिलेट यांचा जन्म मिनेसोटा येथे झाला. त्यांचे शिक्षण कला शाखेत ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. त्यानंतर त्यांनी लेखिका व कलाकार म्हणून वाटचाल सुरू केली.
  • कोलंबिया विद्यापीठात त्यांनी साहित्यावर आधारित शोधनिबंध लिहिला होता. त्यात त्यांच्या ‘सेक्शुअल पॉलिटिक्स’ या पुस्तकाची बीजे होती.
  • पुरुषसत्ताक पद्धती व त्यांचे रचनात्मक परिणाम यांचा बारकाईने अभ्यास त्यांनी केला होता.
  • पुरुषांचे वर्चस्व हे इतर राजकीय जातकुळीसारखेच असते व ते शारीरिक क्षमतांवर नव्हे तर मूल्यपद्धतीने रुजलेले असते. त्यात खरे तर जैविकतेचा काही संबंध नसतो असे त्यांनी म्हटले होते.
  • स्त्रीवादाची पहिली लाट आली ती थोडीशी मर्यादित व व्यवस्थेंतर्गत बंडाशी संबंधित होती व ती तिच्याच वजनाने कोसळली.
  • दुसरी लाट मात्र क्रांतिकारी होती आणि ती लाट केट मिलेट यांच्यामुळेच सगळ्यांच्या लक्षात राहिली. कारण त्याच या लाटेच्या शिल्पकार होत्या.
  • बर्नार्ड कॉलेज येथे शिक्षक असताना विद्यार्थी आंदोलन संघटित केल्याने त्यांना १९६८मध्ये नोकरीतून काढण्यात आले होते.
  • त्यांच्या ‘सेक्शुअल पॉलिटिक्स’ या पुस्तकाने त्यांना नाव मिळवून दिले. त्यात स्त्री-पुरुष यांच्यातील संबंधांचे राजकारण हा विषय होता.
  • या पुस्तकाच्या दहा हजार प्रती पंधरा दिवसांत विकल्या गेल्या होत्या व एकूण सातहून अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या होत्या.
  • त्यांचे हे पुस्तक म्हणजे स्त्रीमुक्तीचे बायबल मानले जाते. त्यांनी जे काम केले त्यामुळेच आज कायदेशीर गर्भपात, व्यावसायिक समानता, लैंगिक स्वातंत्र्य हे सगळे महिलांना मिळू शकले.
  • याशिवाय त्यांची प्रॉस्टिटय़ूशन पेपर्स, फ्लाइंग, सीता, दी पॉलिटिक्स ऑफ क्रुएल्टी व मदर मिलेट ही पुस्तकेदेखील विशेष गाजली होती.
  • एकूणच त्यांच्या लेखनाच्या प्रेरणा या स्त्रियांची प्रत्येक क्षेत्रात होणारी छळवणूक व दडपशाही याच होत्या.
  • त्या कलाकारही होत्या. ‘दी ग्रेट अमेरिकन लेस्बियन आर्ट’ या प्रदर्शनात त्यांच्या कलाकृती मांडण्यात आल्या होत्या.
  • नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर विमेन, न्यूयॉर्क रॅडिकल विमेन, रॅडिकलेस्बियन्स या संस्थांशी त्यांचा संबंध होता.

अमेरिका, फ्रान्सला इरमा वादळाचा तडाखा

  • अमेरिका, वेनेझुएला, फ्रान्स आणि नेदरलँड या चार देशांना इरमा वादळाने जोरदार तडाखा दिल्यामुळे येथे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.
  • कॅटगरी पाचमध्ये येणारे हे वादळ धडकले तेव्हा वाऱ्याचा ताशी वेग २६० किलोमीटर होता. क्युबाला धडकल्यानंतर हे वादळ अमेरिकेच्या फ्लोरिडाकडे वळले.
  • या वादळामुळे कॅरेबियन बेटावर १९ जणांचा मृत्यू झाला असून, हजारो घरांचे नुकसान झाले आहे.
  • याशिवाय फ्रान्समध्ये १० जणांचा मृत्यू झाला असून, ७ जण बेपत्ता आहेत. नेदरलँडच्या सेंट मार्टीन बेटावर दोघांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा