चालू घडामोडी : २ नोव्हेंबर

महिलांसाठी गोवा सर्वात सुरक्षित राज्य

  • ‘प्लान इंडिया’द्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार, महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गोवा हे देशातील सर्वात सुरक्षित तर बिहार सर्वाधिक असुरक्षित राज्य ठरले आहे.
  • बिहारसोबतच झारखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्लीदेखील महिलांसाठी असुरक्षित असल्याचे आकडेवारी सांगते.
  • तर गोव्याखालोखाल केरळ, मिझोरम, सिक्कीम, मणीपूर या राज्यांचा क्रमांक लागतो.
  • प्लान इंडियाकडून तयार करण्यात आलेला हा अहवाल महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
  • या अहवालात महिला सुरक्षेसह शिक्षण, आरोग्य, गरिबी हे मुद्देही विचारात घेण्यात आले आहेत.
  • महिला सुरक्षेच्या बाबतीत देशातील राज्यांना शून्य ते एक असे गुण देण्यात आले. यामध्ये गोव्याला ०.६५६ गुण मिळाले आहेत. तर बिहारला सर्वात कमी म्हणजे ०.४१० गुण मिळाले आहेत.
  • देशभरातील राज्यांच्या कामगिरीची सरासरी काढल्यास ती ०.५३१ इतकी होते. त्या तुलनेत महाराष्ट्राची (०.५८०) कामगिरी चांगली आहे.
  • महिला सुरक्षेच्या बाबतीत महाराष्ट्र नवव्या क्रमांकावर आहे. या बाबतीत महाराष्ट्राचा शेजारी असलेला गुजरात १६व्या स्थानी आहे.
  • गोवा शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत पाचव्या, तर गरिबीच्या बाबतीत आठव्या स्थानी आहे.
  • केरळमधील आरोग्य व्यवस्था सर्वात चांगली आहे. त्यामुळे आरोग्य सुविधेच्या बाबतीत केरळ ०.६३४ गुणांसह देशात अव्वल आहे.
  • महिला सुरक्षेसोबतच आरोग्य सुविधांच्या बाबतीतही बिहार ०.४१० गुणांसह तळाला आहे. याशिवाय गरिबीतही बिहारची स्थिती अत्यंत वाईट आहे.

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारताचे वर्चस्व

  • ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी २ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकासह ८ पदकांची कमाई केली.
  • १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या शाहजार रिझवी, ओंकार सिंह आणि जितू राय यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली.
  • तर महिलांच्या १० मी. एअर रायफल प्रकारात पुण्याच्या पुजा घाटकरने सुवर्ण, तर भारताच्याच अंजुम मुदगलने रौप्यपदक मिळवले.
  • ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या गगन नारंगने ५० मी. रायफल प्रोन प्रकारात रौप्यपदक जिंकले.
  • तर महाराष्ट्राच्या स्वप्नील सुरेश कुसळे यानेही ५० मी. रायफल प्रोन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
  • महिलांच्या २५ मी. पिस्तुल प्रकारात भारताच्या अन्नूराज सिंहला कांस्यपदक मिळाले.
  • याआधी पहिल्या दिवशी भारताच्या हिना सिद्धूने १० मी. एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. तर दिपक कुमारने १० मी एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती.

कुपोषणाच्या बाबतीत भारत प्रथम स्थानी

  • कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असलेल्या देशांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर असल्याची आकडेवारी असोचेम आणि ईवाय यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून समोर आली आहे.
  • भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होत असला, तरी त्याचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचे असोचेम आणि ईवाय यांच्या सर्वेक्षणातून अधोरेखित झाले आहे.
  • कुपोषणाच्या विळख्यात सापडलेल्या जगातील एकूण बालकांपैकी ५० टक्के बालके भारतातील आहेत.
  • २०१५मध्ये देशातील ४०टक्के बालके कुपोषणाचा सामना करत होती, असेही आकडेवारीतून समोर आले आहे.
  • त्यामुळे सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी धोरणांची आखणी करणे आवश्यक असल्याचे असोचेम आणि ईवायने अहवालात नमूद केले आहे.
  • देशातील ३७ टक्के बालकांचे वजन अतिशय कमी आहे. तर ३९ टक्के मुलांचे वजन त्यांच्या वयाच्या तुलनेत कमी आहे. याशिवाय उंचीच्या तुलनेत वजन कमी असणाऱ्या बालकांचे प्रमाण २१ टक्के आहे.
  • एकीकडे देशात कुपोषणाची समस्या तीव्र असताना लठ्ठपणाची समस्यादेखील वाढताना दिसत आहे. या यादीत भारताचा क्रमांक जगात तिसरा आहे.
  • याशिवाय मधुमेहाचे सर्वाधिक रुग्णदेखील भारतात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो.
  • अमेरिकेत लठ्ठपणाची समस्या अतिशय बिकट असून त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो.

बाल्फर डिक्लरेशनला १०० वर्षे पूर्ण

  • ब्रिटिश नेते आर्थर बाल्फर यांनी २ नोव्हेंबर १९१७ रोजी स्वाक्षरी केलेल्या प्रसिद्ध बाल्फर डिक्लरेशनला आज १०० वर्षे पूर्ण झाली आहेत.
  • ६७ शब्दांच्या या जाहीरनाम्याने मध्य-पुर्वेतल्या भूगोल तसेच इतिहासावर मोठ्या प्रमाणात परिणाम केला.
  • पॅलेस्टाईनच्या भूमीमध्ये ज्यू धर्मियांना राहण्यासाठी राष्ट्रीय घरकूल (नॅशनल होम) तयार करण्याची घोषणा यामधून करण्यात आली होती.
  • तुर्कस्तानातील ऑटोमन साम्राज्याचा भाग असणाऱ्या पॅलेस्टाइनचा ताबा ब्रिटनने मिळवला आणि १९४८पर्यंत तेथे ब्रिटिश साम्राज्य संपवून, स्वतंत्र नव्या इस्रायल राष्ट्राची निर्मिती करण्यात आली.
  • बाल्फर डिक्लरेशननंतर या प्रदेशात प्रचंड राजकीय, लष्करी कारवाया आणि युद्धही झाली. बाल्फर घोषणापत्र या सर्व प्रक्रियेचा आद्य बिंदू मानला जातो.
  • आर्थर बाल्फर यांचा जन्म २५ जुलै १८४८ साली स्कॉटलंडमध्ये झाला. १९०२ ते १९०५ या कालावधीत ते इंग्लंडचे पंतप्रधानही होते. जाहीरनामा प्रसिद्ध करताना बाल्फर परराष्ट्रमंत्री पदावरती होते.
  • हा जाहीरनामा म्हणजे ज्यू धर्मियांचे तेव्हाचे नेते लिओनेल वॉल्टर रॉटशिल्ड यांना लिहिलेले एक आश्वासनपत्रच होते.
  • या पत्रातील शब्दांची रचना तत्कालीन कॅबिनेट सेक्रेटरी आणि कॉन्झर्वेटिव पक्षाचे खासदार लिओ अॅम्रे यांनी केली होती.
  • मात्र ब्रिटिशांनी ब्रिटनच्या बाहेरील भूमिबाबत केलेल्या या जाहीरनाम्याला पॅलेस्टाईनचे नागरिक कदापिही मंजूरी देणे शक्य नव्हते.
  • तसेच स्थानिक पॅलेस्टाइनी नागरिक बहुसंख्येने असणाऱ्या प्रदेशावर असा निर्णय लादणेही त्यांना आवडले नाही.
  • १९४८साली ७.५० लाख पॅलेस्टाईन नागरिकांना आपली भूमी सोडून जावे लागले. याला ‘नाकबा’ असे म्हटले जाते. त्यासाठीही या घोषणापत्राला दोषी धरले जाते.
  • इस्रायलने बाल्फर यांच्या नावाने रस्त्यांना नावे किंवा शाळेला नाव दिले असले तरी पॅलेस्टाइनने मात्र आजही त्यांना माफ केलेले नाही. बाल्फर यांच्याबाबत आजही पॅलेस्टाइन नागरिकांच्या मनात प्रतिकूल मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा