चालू घडामोडी : १६ डिसेंबर

ममता कालिया यांना व्यास सम्मान

  • आधुनिक हिंदी साहित्यातील प्रख्यात कथालेखिका ममता कालिया यांना त्यांच्या ‘दुक्खम-सुक्खम’ या कादंबरीसाठी प्रतिष्ठेचा व्यास सम्मान जाहीर झाला आहे.
  • ममता कालिया यांचा जन्म २ नोव्हेंबर १९४० रोजी मथुरा येथे झाला. त्यांचे वडील विद्याभूषण अग्रवाल हे हिंदी साहित्यातील एक विद्वान मानले जातात.
  • दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात ममताजींनी एम.ए. केले. नंतर मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य सुरू केले.
  • सुरुवातीला काही नियतकालिकांतून त्यांनी इंग्रजीतून लिखाण केले. नंतर मात्र हिंदी लेखनावरच भर दिला.
  • कथा, कविता, कादंबरी, नाटय़, अनुवाद, पत्रकारिता अशा विविध साहित्य प्रकारांत त्यांनी मुशाफिरी केली.
  • बदलत्या परिस्थितीत बदललेली महिलांची मानसिकता व त्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून वेगळ्या धाटणीच्या कथा त्यांनी लिहिल्या.
  • बेघर, मेला, मुखौटा, बोलने वाली औरत, रोशनी की मार, प्रेम कहानी, दौडक, दुक्खम-सुक्खम या त्यांच्या कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या.
  • यापूर्वी त्यांना उत्तर प्रदेश हिंदी साहित्य संस्थेचा यशपाल कथा सम्मान तसेच साहित्य भूषण सम्मान, राम मनोहर लोहिया पुरस्कार मिळाला आहे.
व्यास सन्मान
  • हिंदी साहित्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भारतीय व्यक्तीला व्यास सन्मान दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
  • के.के. बिर्ला फाऊंडेशनने १९९१मध्ये या पुरस्काराची सुरुवात केली. सन्मानचिन्ह आणि ३.५० लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

केंद्र सरकारकडून एमडीआरमध्ये सवलत

  • डेबिट कार्ड, भिम तसेच यूपीआय अ‍ॅपद्वारे होणारे २००० रुपयापर्यंतच्या विनिमय व्यवहारांवर व्यापारी सवलत दर अर्थात मर्चन्ट डिस्काउन्ट रेट (एमडीआर) न आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • या निर्णयाचा लाभ ग्राहक तसेच व्यापाऱ्यांना होणार असून बँकांना होणारे २५१२ कोटी रुपयांचे नुकसान सरकार भरून देणार आहे.
  • १ जानेवारी २०१८ पासून या निर्णयाची अंमलबजावणी दोन वर्षांसाठी करण्यात येणार आहे.
  • निश्चलनीकरणानंतर थंड पडलेल्या रोकडरहित व्यवहारांना नव्याने चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • ग्राहकांच्या डेबिट कार्डाद्वारे व्यापाऱ्यांना व्यवहार करण्यासाठी बँकांकडून मशीन (पीओएस) दिल्या जातात. त्यासाठी बँकांद्वारा व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या दराला ‘एमडीआर’ म्हणतात.

युथक्वेक : वर्ड ऑफ दी यिअर २०१७

  • ऑक्सफर्ड शब्दकोशाने २०१७मधील ‘वर्ड ऑफ दी यिअर’ म्हणून “युथक्वेक” या शब्दाची निवड केली आहे. गेल्या वर्षी पोस्टट्रथ या शब्दाची निवड करण्यात आली होती.
  • युथक्वेक या शब्दाचा अर्थ तरुण मतदारांमध्ये निर्माण झालेली राजकीय जागरूकता असा आहे.
  • सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक बदल जर तरुणांच्या कृती किंवा प्रभावातून घडून आले, तर त्याला युथक्वेक असे म्हणतात.
  • २०१७मध्ये या शब्दाचा वापर पाचपट वाढला. साधारण या वर्षांच्या दुसऱ्या टप्प्यात वापर वाढल्याचे दिसून आले.
  • जूनमध्ये ब्रिटनमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यात तरुण मतदारांनी मजूर पक्षाला विजय मिळवून दिला, तेव्हा हा शब्द जास्तच प्रचलित होता.
  • त्यानंतर न्यूझीलंडमध्ये सप्टेंबरमध्ये ज्या निवडणुका झाल्या, त्यातही या शब्दाचा वापर करण्यात आला.
  • गेल्या वर्षी ब्रेक्झिट व ट्रम्प यांच्या अमेरिकेतील विजयानंतर वापरला गेलेला पोस्टट्रथ या शब्दाची ऑक्सफर्डने ‘वर्ड ऑफ दी यिअर’ म्हणून निवड केली होती.

योगी सरकारची नववधुंसाठी नवी योजना

  • उत्तर प्रदेश सरकारच्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या योजनेच्या अंतर्गत लग्न करणाऱ्या तरूणींना योगी आदित्यनाथ सरकारकडून ३ हजार रूपयांचा मोबाइल फोन दिला जाणार आहे.
  • तसेच या योजनेअंतर्गत लग्नासाठी पात्र तरूणींना ३५ हजार रूपये दिले जाणार आहेत. सध्या ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत सुरु करण्यात येणार आहे.
  • योगी सरकारच्या या योजनेनुसार नववधूला २० हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाईल. हे पैसे त्या मुलीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
  • तर कपडे, चांदीचे पैंजण, जोडवी आणि सात भांडी असे एकूण १० हजार रुपयांचे सामान या लग्नासाठी योजनेसाठी पात्र असलेल्या वधूंना देण्यात येईल.
  • तसेच लग्नामध्ये अर्जांची मुलाकडील आणि मुलीकडील नातेवाईकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी ५ हजार रुपये खर्च केले जातील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा