चालू घडामोडी : २८ डिसेंबर

तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजूर

  • तिहेरी तलाक पद्धत गुन्ह्याच्या चौकटीत आणणारे ‘मुस्लिम महिला (विवाहोत्तर हक्कांचे संरक्षण) विधेयक’ २८ डिसेंबर रोजी विस्तृत चर्चेनंतर लोकसभेत मंजूर झाले.
  • या विधेयकामधील काही तरतुदींवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसीसह इतरांनी आक्षेप घेत बदल सुचविले होते.
  • मात्र, हे बदल सदस्यांनी मतदानाद्वारे पूर्णपणे नाकारले. त्यामुळे अखेर हे ऐतिहासिक विधेयक लोकसभेत मंजूर झाले.
  • सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत न्यायालयाने केंद्र सरकारला यासंबंधी कायदा बनवण्यास सांगितले होते.
  • कोर्टाच्या सूचनेनुसार केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गटाने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे.
  • या मंत्री गटामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी पी चौधरी यांचा समावेश आहे. 
 कायद्यातील तरतुदी 
  • या विधेयकाचे औपचारिक नाव ‘मुस्लिम महिला (विवाहोत्तर हक्कांचे संरक्षण) विधेयक २०१७’ असे आहे. यामध्ये एकूण आठ कलमे आहेत.
  • मुस्लिम महिलांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण आणि त्यांचे सक्षमीकरण हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे.
  • जम्मू-काश्मीर वगळता संपूर्ण देशभरात हा कायदा लागू होणार आहे.
  • मुस्लिम पतीने आपल्या पत्नीला तोंडी, लेखी, ई-मेल अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिहेरी तलाकद्वारे दिलेला घटस्फोट बेकायदेशीर ठरणार आहे.
  • तिहेरी तलाक देणाऱ्या संबंधीत पतीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होऊन ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
  • घटस्फोटित मुस्लिम महिलेला आणि तिच्यावर अवलंबून असणाऱ्या पाल्याला तसेच संबंधीत जोडप्याच्या अल्पवयीन मुलांच्या संरक्षण हक्कांतर्गत पतीला निर्वाह भत्ता देणे बंधनकारक असणार आहे.
  • मुस्लीम जोडप्याच्या घटस्फोटानंतर त्यांच्या अल्पवयीन मुलांच्या संगोपणासाठी त्यांचा ताबा महिलेकडे असणार आहे.
 पार्श्वभूमी 
  • मार्च २०१६मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोने मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिले. 
  • मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधले होते.
  • त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.
 तिहेरी तलाक म्हणजे काय? 
  • तिहेरी तलाकला तलाक ए मुघलझा असेही म्हटले जाते. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो. 
  • या पद्धतीमध्ये मुस्लीम पुरुष तीनवेळा ‘तलाक’ शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो अथवा घटस्फोट मिळवू शकतो.
  • वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणे अपेक्षीत आहे. मात्र बऱ्याचदा एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटले जाते. 
  • तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो. आधुनिक काळात तलाक देण्यासाठी फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचा वापर केल्याची उदाहरणे आहेत.
  • तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसऱ्या पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते.
  • तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे.
  • भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल लाँ (शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७च्या अंतर्गत येतात. 
  • काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.
 तिहेरी तलाक प्रथा हद्दपार केलेले देश 
  • पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया

भारताच्या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • हवाई संरक्षणासाठी भारताने अत्याधुनिक सुपरसॉनिक इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची ओडिशाच्या बालासोर येथील तळावरून २८ डिसेंबर रोजी यशस्वी चाचणी केली.
  • डीआरडीओने विकसित केलेले हे क्षेपणास्त्र ७.५ मीटर लांबीचे सिंगल स्टेज सॉलिड रॉकेट मिसाईल आहे. जे रिमोटद्वारे नियंत्रित करण्यात आले होते.
  • भारतीय सीमेच्या दिशेने डागलेल्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करण्याची क्षमता या सुपरसॉनिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रामध्ये आहे.
  • यापूर्वी भारताने याच श्रेणीतील दोन क्षपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या अनुक्रमे ११ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी केल्या होत्या.
  • या क्षेपणास्त्रामुळे पृथ्वीच्या हवाई कक्षेत ३० किमी उंचीच्या आतून जाणाऱ्या कोणत्याही क्षेपणास्त्राला नष्ट करत देशाच्या सीमेवर होणारा संभाव्य हल्ला रोखता येणार आहे.
  • या क्षेपणास्त्रात स्वत:ची रडार यंत्रणा आहे. मानवी आदेशांशिवाय हे क्षेपणास्त्र स्वत:च शत्रू क्षेपणास्त्राची दिशा, मार्ग ओळखून ते नष्ट करते.
  • विशेष म्हणजे, या इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आले आहे.
  • जगातील मोजक्या देशांकडे इंटरसेप्टर क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान असून त्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा