चालू घडामोडी : २९ डिसेंबर

मेघालयमध्ये कॉंग्रेसच्या पाच आमदारांचा राजीनामा

 • मेघालयमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या पाच आमदारांसह इतर तीन आमदारांनी विधानसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.
 • यामध्ये कॉंग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री रॉवेल लिंगडोह यांचाही समावेश आहे. या सर्वांनी आपले राजीनामे विधानसभेचे मुख्य सचिव अॅंड्र्यू सायमन्स यांच्याकडे सुपुर्द केले आहेत.
 • यामुळे एकूण ६० सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये कॉंग्रेसचे आता केवळ २४ आमदार राहिले आहेत.
 • विधानसभेचा कार्यकाळ ६ मार्च रोजी संपणार असून २०१८मध्ये नागालॅंड आणि त्रिपुरा या राज्यांच्या निवडणुकांबरोबर मेघालय विधानसभेसाठीही निवडणूक होणार आहे. 
 • राजीनामा दिलेल्या या सदस्यांनी यापुर्वी मेघालयचे मुख्यमंत्री मुकुल संगमा यांच्याविरोधात बंड केले होते.
 • या पाच आमदारांमध्ये चार आमदार संगमा यांच्या कॅबिनेटमध्ये होते. मात्र त्यांना संगमा यांनी मंत्रिमंडळातून वगळले होते.

आरकॉमचे रिलायन्स जिओकडून अधिग्रहण

 • अनिल अंबानी यांच्याकडील दूरसंचार मनोरे तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय मुकेश अंबानी यांनी खरेदी केला आहे.
 • यामुळे अनिल अंबानी अध्यक्ष असलेल्या रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) ४३००० दूरसंचार मनोरे, ४जी सेवा तसेच ऑप्टिकल फायबर व्यवसाय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओच्या ताब्यात जाणार आहे.
 • सुमारे ४४ हजार कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या आरकॉमला यामुळे मोठा आधार मिळाला आहे.
 • सुरुवातीला इन्फोकॉम नावाने एकत्रित रिलायन्स समूहाकडे असलेला हा दूरसंचार व्यवसाय २०००मध्ये विलग झालेल्या अंबानी बंधूंपैकी अनिल अंबानी यांच्याकडे आला होता.
 • आरकॉमची २जी सेवा नोव्हेंबरअखेरपासून बंद करण्यात आली. तसेच कंपनीने तिचा डीटीएच व्यवसायही नोव्हेंबरमध्ये विकला.
 • आरकॉमवर सध्या ४४,००० कोटी रुपयांचे कर्ज आहे. पैकी २४,००० कोटी रुपये कर्ज हे देशांतर्गत तर २०,००० कोटी रुपयांचे कर्ज हे विदेशातून घेतलेले आहे.
 • थकीत कर्जापोटी चिनी बँकेनेही अंबानी यांच्या या कंपनीविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे धाव घेतली आहे.
 • भारतातील अनेक सार्वजनिक बँकाही कर्जवसुलीकरिता कंपनीविरोधात पावले टाकण्यासाठी सरसावल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा