चालू घडामोडी : २ जानेवारी

शिक्षणतज्ञ डॉ. एम व्ही पैली यांचे निधन

 • केरळमध्ये व्यवस्थापन अभ्यासक्रमांची पायाभरणी करणारे द्रष्टे शिक्षण व्यवस्थापक डॉ. एम व्ही पैली यांचे वयाच्या ९८व्या वर्षी ३० डिसेंबर रोजी निधन झाले.
 • त्यांचे पूर्ण नाव मूलमत्तम् वर्के पैली होते. ५ ऑक्टोबर १९१९ रोजी त्यांचा जन्म पुलिकुन्नू या बेटवजा गावात झाला.
 • लखनऊ विद्यापीठातून त्यांनी कलाशाखेतील पदव्युत्तर पदवी घेऊन, हावर्ड विद्यापीठाची एलएलएम ही कायद्यातील उच्च पदवी त्यांनी मिळविली.
 • त्यांनी १९६२मध्ये लिहिलेले ‘इंटरनॅशनल जॉइंट बिझनेस व्हेंचर्स’ हे पुस्तक अमेरिकेतील ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस’ने प्रकाशित केले.
 • राज्यघटनाविषयक अनेक पाठय़पुस्तकांचे तसेच कामगार कायदे आणि मनुष्यबळ विकास या विषयावरील पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.
 • कायदा आणि व्यवस्थापन यांचे जाणकार असलेल्या पैली यांनी लखनऊ, पाटणा, दिल्ली येथे प्राध्यापकी केली.
 • त्यांच्या आग्रहामुळे कोचीनमधील ‘क्युसॅट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञान विद्यापीठात केरळमधील पहिला व्यवस्थापन अभ्यासक्रम सुरू झाला.
 • ‘क्युसॅट’मधून निवृत्तीनंतर ते कोचीमधील ‘आशियाई विकास व उद्योजकता संस्थे’च्या प्रमुखपदी राहिले.
 • देशभरच्या शिक्षण क्षेत्राची नेमकी नस ओळखून, गुणी प्राध्यापकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘क्युसॅट’मार्फत त्यांनी ‘एम व्ही पैली पुरस्कार’ सुरू करविला. रोख १ लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
 • देशभरातील अनेक विद्यापीठांचे तसेच केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित उच्चशिक्षण संस्थांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले.
 • शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने २००६साली ‘पद्मभूषण’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.

भीमा-कोरेगावमध्ये दगडफेक आणि हिंसाचार

 • पुणे-अहमदनगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये १ जानेवारी रोजी किरकोळ वादातून दोन गटांमध्ये वाद झाला.
 • वढू बुद्रुक गावात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर काही तरुणांनी रॅलीचे आयोजन केले होते.
 • ही रॅली सुरु असतानाच पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने कोरेगाव क्रांतीस्तंभाला मानवंदना अर्पण करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी येत होते.
 • यावेळी रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झाले. या दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
 • यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, या घटनेचे पडसाद २ जानेवारी रोजी राज्याच्या अन्य भागांमध्ये उमटले.
 भीमा-कोरेगावचा इतिहास 
 • पुण्यातील भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावामध्ये १ जानेवारी १८१८ रोजी एक लढाई झाली. या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते.
 • हे युद्ध जरी इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाले असले तरी यामध्ये इंग्रजांनी महार समाजातील सैन्याच्या बळावर पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते.
 • महार समाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले ते इंग्रजांचे भारतात साम्राज्य पसरवण्यासाठी नव्हे, तर जाचक पेशवाई नष्ट करण्याचे त्यांचे ध्येय होते असे इतिहासकार म्हणतात.
 • पेशव्यांच्या सैन्याची एकूण संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांनी केवळ हजारांहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते.
 • महार रेजिमेंटने आपल्यापेक्षा संख्येने ४० पट अधिक असणाऱ्या पेशवाईच्या सैन्याचा धुव्वा उडवला आणि अवघ्या १६ तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभव पत्करण्याची वेळ आली.
 • त्यानंतर महार सैनिकांनी अखेर १ जानेवारी १८१८ला सायंकाळी आपला विजय झाल्याची घोषणा करतानाच पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला.
 • भीमा कोरेगावच्या या लढाईत महार रेजिमेंटमने इंग्रजांना विजय मिळवून दिला. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या या सैनिकांनी या लढाईत प्राणांची आहुती दिली.
 • त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि त्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतिस्तंभ उभारला.
 • कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे स्तंभावरील भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आहेत.
 • १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या क्रांती स्तंभाला आपल्या सहकाऱ्यांसह भेट देऊन मानवंदना दिली.
 • आंबेडकरांच्या या मानवंदनेनंतर दरवर्षी १ जानेवारीला मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी कोरेगावातील या विजयस्तंभाला भेट देत आदरांजली अर्पण करतात.
 • परंतु मागील २०० वर्षांमध्ये जो अनुचित प्रकार येथे घडला नव्हता तो १ जानेवारी २०१८ रोजी घडला.

अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत रोखली

 • दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून देण्यात येणारी २५५ दशलक्ष डॉलरची मदत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रोखली आहे.
 • दहशतवादाविरोधात पाकिस्तानच्या सहकार्यावरच आर्थिक मदतीचे भवितव्य अवलंबून आहे, असे अमेरिकेने पाकला ठणकावले आहे.
 • पाकिस्तान व अमेरिकेचे संबंध अत्यंत तणावपूर्ण असून पाकने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात दिरंगाई केल्याने अमेरिका पाकवर नाराज आहे.
 • जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि मुंबईतील ९/११ हल्ल्यांचा सूत्रधार हाफिद सईद याला पाकने नजरकैदेतून मुक्त केले होते.
 • यानंतर सईदने राजकीय पक्ष सुरु करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने पाकिस्तानला हा दणका दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा