चालू घडामोडी : ९ जानेवारी

‘ओल्ड माँक’चे निर्माते कपिल मोहन यांचे निधन

 • ‘ओल्ड माँक’ या रमला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवणारे पद्मश्री ब्रिगेडिअर (निवृत्त) कपिल मोहन यांचे ६ जानेवारी रोजी गाझियाबाद येथे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले.
 • कपिल मोहन हे १९६५च्या आधीपासून ट्रेड लिंक्स प्रा. लि.चे प्रमुख होते. त्यांनी डायर मीकिन ब्रेव्हरेजची धुरा सांभाळल्यानंतर कंपनीचा विविध क्षेत्रात विस्तार केला होता.
 • एडवर्ड डायरने वर्ष १८५५मध्ये कसौली येथे डायर मीकिन ब्रेव्हरेजची स्थापना केली होती. १९६६मध्ये या कंपनीचे मोहन मीकिन ब्रेव्हरीज लि. असे नामांतर करण्यात आले होते.
 • कपिल मोहन यांनी या कंपनीची धुरा सांभाळल्यानंतर ‘ओल्ड माँक’ रम भारतातच नव्हे तर जगात लोकप्रिय झाली झाली होती.
 • १९५४मध्ये ‘ओल्ड माँक’चे उत्पादन सुरू झाले होते. जगात सर्वाधिक विकली जाणारी रम म्हणून ‘ओल्ड माँक’ची ख्याती होती.
 • त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने तीन नवे डिस्टिलरी आणि दोन ब्रेव्हरेज सुरू करण्याशिवाय देशातील विविध भागात फ्रँचायजींचा विस्तारही केला होता.
 • मोहन यांनी नंतर ग्लास, ब्रेकफास्ट फुड, ज्यूस आणि अभियांत्रिकी उद्योगातही पाऊल ठेवले होते.
 • विविध क्षेत्रात सक्रिय असलेल्या मोहन यांच्यामुळे मीकिन लि.ची सध्याची उलाढाल ही ४०० कोटी रूपयांहून अधिक आहे.
 • लष्करातून निवृत्त झाल्यानंतर, उद्योग व्यवसायात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना २०१०मध्ये पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले.

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील सर्व आरोपी निर्दोष

 • ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात इटलीतील मिलान कोर्टाने सर्व आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष ठरविले आहे.
 • ऑगस्टा वेस्टलँड आणि फिनमेकॅनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी, बिचोलिए क्रिश्चियन मिशेल, ऑगस्टा वेस्टलँडचे माजी उच्चाधिकारी गियूसेपे ओरसी आणि ब्रुनो स्पेगनोलिनी यांचा आरोपींमध्ये समावेश होता.
 • या व्यवहारात फिनमेकनिका कंपनीचे माजी प्रमुख गिसेपी ओरसी यांच्यावर लाच दिल्याचा आरोप लावण्यात आला होता.
 • या व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर करारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध व्हावे यासाठी लागणारे ठोस असे पुरावे नाहीत, असे कोर्टाने सांगितले.
 • या व्यवहारामुळे भारताला नुकसान झाल्याचेही इटलीच्या कोर्टाले फेटाळले आहे. मात्र दुसरीकडे, या करारामुळे नुकसान झाल्याचा आरोप भारताकडून करण्यात आला होता.
 • याप्रकरणी भारतातही खटला सुरू  आहे. परंतु मिलान कोर्टाच्या या निर्णयामुळे सीबीआयचा खटला कमकुवत होण्याची शक्यता आहे.
 • या प्रकरणी सीबीआयची माजी वायुसेना प्रमुख एसपी त्यागी यांच्यासहीत अनेक आरोपींविरोधात चौकशी सुरू आहे. 
 • २जी घोटाळानंतर ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर प्रकरणातही कोर्टाने ठोस पुरावे नसल्याचे म्हटले आहे. हे दोन्ही घोटाळे यूपीए सरकारच्या काळात झाले होते.  
 ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा 
 • भारताने इटलीच्या सरकारी मालकीच्या फिनमेकॅनिका या कंपनीची उपकंपनी ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीकडून एडब्ल्यू १०१ जातीची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा ३,५४६ कोटी रुपयांचा करार २०१०साली केला होता.
 • त्यातील ८ हेलिकॉप्टर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी तर ४ अन्य कारणांसाठी वापरली जाणार होती.
 • पूर्वीची रशियन एमआय-८ ही होलिकॉप्टर आता कालबाह्य़ ठरू लागल्याने ती बदलण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
 • १९९९साली प्रथम ही मागणी झाली. २००५साली त्यासाठी निविदा जाहीर करण्यात आल्या.
 • या पहिल्या निविदांमध्ये ६००० मीटर उंचीवर काम करू शकतील अशी हेलिकॉप्टर हवी असल्याची अट घालण्यात आली होती.
 • उंचीची (सर्व्हिस सीलिंग) ही अट संरक्षण मंत्रालयाने २००६साली शिथिल करून ४५०० मीटरवर आणली.
 • निवडीसाठीच्या या अटी बदलल्याने इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीला फायदा झाला आणि अटी बदलण्यात हवाई दलाचे माजी प्रमुख एअर चीफ मार्शल एस पी त्यागी यांचा हात असल्याचा संशय आहे.
 • भारताने १ जानेवारी २०१४ रोजी हा करार रद्द केला. तोपर्यंत करारातील ३ हेलिकॉप्टर भारताला मिळाली होती.
 • सीबीआयच्या तपासात त्यागी ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटल्याचे पुरावे सापडले आहेत.
 • सीबीआयच्या तपासानुसार, त्यागींना टय़ुनिशियात नोंदणी असलेल्या कंपन्यांकडून भारत आणि मॉरिशसमधील बँक खात्यांमधून पैसे पोहोचवण्यात आले.
 • त्यागी यांना त्यांच्या संजीव, संदीप व राजीव या भावांमार्फत लाच मिळाली असा आरोप आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये ईडीने भारतात त्यांची मालमत्ता जप्त केली.

युसूफ पठाण उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी

 • भारतीय क्रिकेट संघातून सध्या बाहेर असलेला अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण बीसीसीआयच्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला आहे.
 • गेल्या वर्षी तब्येत बिघडलेली असताना उपचारासाठी युसूफ पठाणने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार युसूफने काही औषधे घेतली होती.
 • मात्र ही औषधे बीसीसीआयने घालून दिलेल्या नियमांमध्ये बसत नाहीत. अशा औषधांचे सेवन केल्यास ते उत्तेजक द्रव्यांचे सेवन मानले जाते.
 • त्यामुळे बीसीसीआयने युसूफ पठाणला ५ महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावली आहे.
 • आतापर्यंत युसूफ पठाणने भारताचे ७९ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. २०१२ नंतर मात्र युसूफ पठाणला भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. राष्ट्रीय क्रिकेटमद्ये तो बडोद्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करतो.
 • २००७ च्या टी-२० आणि २०११च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा युसूफ पठाण सदस्य होता.

७५वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा २०१८

 • ७ जानेवारी रोजी पार पडलेल्या ७५व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात अझीझ अन्सारी यांच्या रूपाने प्रथमच आशियाई कलाकाराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
 • ‘मास्टर ऑफ नन’ या टीव्ही मालिकेतील अभिनयासाठी अझिझ अन्सारी यास सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • अन्सारी हा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारा यंदाचा एकमेव आशियाई कलाकार ठरला आहे.
 • अन्सारी भारतीय वंशाचा कलाकार आहे. तो मूळचा तामिळनाडूतील आहे. मात्र, त्याचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेत झाले आहे.
 • या पुरस्कार सोहळ्यावर निर्माता हार्वे वाइनस्टीन याने केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणाचे पडसाद उमटले.
 • किमान ७० अभिनेत्रींचा वाइनस्टीनने छळ केल्याचे आजवर उघड झाले आहे. त्याचा निषेध म्हणून या कार्यक्रमात काळ्या रंगाचा पेहराव करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
 • त्यानुसार निषेधाचा हा सूर पेहराव आणि भाषणांतून व्यक्त झाला. या सोहळ्यात विजेत्यांची, लैंगिक छळ आणि मानधनातील स्त्री-पुरुष भेदभाव या मुद्द्यांवरील भाषणे महत्त्वाची ठरली.
 इतर पुरस्कार विजेते 
 • हॉलिवूड फॉरेन प्रेस असोशिएशनच्या वतीने दिला जाणारा सेसिल बी डीमाइल्स हा प्रतिष्ठेचा पुरस्कार या सोहळ्यात विनफ्रे ऑप्रा यांनी स्वीकारला. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच कृष्णवर्णीय ठरल्या आहेत.
 • थ्री बिलबोर्डस आऊटसाइड एबिंग, मिसुरी या चित्रपटातील भूमिकेसाठी फ्रान्सेस मॅकर्डोमंड यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
 • गॅरी ओल्डमन यांना द डार्केस्ट अवरसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर निकोल किडमनला बिग लिटिल लाइज या टीव्हीफिल्मसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
 • अभिनेत्री एलिझाबेथ मॉसला ‘द हँडमेड्स टेल’मधील भूमिकेसाठी दूरचित्रवाणीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा