चालू घडामोडी : १५ जानेवारी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौऱ्यावर

  • इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात दाखल झाले. दिल्ली विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेतन्याहू यांचे स्वागत केले.
  • भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू भारताच्या दौऱ्यावर आले आहेत.
  • भारतातील आपल्या सहा दिवसांच्या दौऱ्यादरम्यान नेतन्याहू दिल्ली, आग्रा, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांना भेटी देणार आहेत.
  • या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृषी, पाणी संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच अंतराळ सुरक्षेसह अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा होणार आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात इस्रायलच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.
  • यापूर्वी २००३मध्ये एनडीए सरकारच्या काळात इस्रायचे तत्कालिन पंतप्रधान एरियल शेरॉन भारत भेटीवर आले होते.
 भारत आणि इस्रायलदरम्यान ९ सामंजस्य करार 
  • बेंजामिन नेतन्याहू यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली.
  • त्यानंतर मोदी आणि नेतान्याहू यांनी भारत आणि इस्रायलदरम्यान ९ सामंजस्य करारांवर सहमती झाल्याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
  • सायबर सुरक्षेशिवाय चित्रपट निर्मिती, पेट्रोलियम, इन्व्हेस्ट इंडिया इन्व्हेस्ट इस्रायल यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले आहेत. सौर ऊर्जेच्या क्षेत्रातही दोन्ही देश मिळून काम करणार आहेत.
  • भारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे, अशी भावना यावेळी बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली.
 तीन मूर्ती चौकाचे नामकरण 
  • मोदींनी नेतान्याहू यांनाखास भेट म्हणून दिल्लीतील तीन मूर्ती चौकाचे नामकरण केले आहे. आता हा चौक 'तीन मूर्ती हायफा मार्ग' म्हणून ओळखला जाणार आहे.
  • पहिल्या जागतिक युद्धात (१९१४-१९१८) दरम्यान भारतीय जवानांनी आपले शौर्य दाखवित इस्रायलचे हायफा शहर स्वतंत्र केले होते.
  • जोधपूर, हैदराबाद, म्हैसूर येथील जवान युद्धासाठी इस्रायलला गेले होते. या युद्धात ४४ भारतीय जवानांना आपला प्राण गमवावा लागला होता.
  • युद्धानंतर या जवानांच्या नावाने दिल्लीत ‘तीन मूर्ती चौक’ असे नामकरण करण्यात आले होते. परंतु आता त्याचे नाव बदलून मोदींनी ‘तीन मूर्ती हाइफा मार्ग’ असे केले आहे.
  • बेंजामीन नेतान्याहू, त्यांची पत्नी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन मूर्ती हायफा चौक येथे जाऊन या शहिदांना आदरांजली वाहिली.
 बेंजामिन नेतन्याहू यांच्याबद्दल 
  • बेंजामिन नेतन्याहू यांचा जन्म तेल अविवमध्ये २१ ऑक्टोबर १९४९ रोजी झाला. तर त्यांचे बालपण जेरुसलेममध्ये गेले. त्यांना ‘बीबी’ या टोपणनावाने ओळखले जाते.
  • मॅसेच्युसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलिजी येथून नेतन्याहू यांनी पदवीचे शिक्षण तसेच उद्योग व्यवस्थापन क्षेत्रात पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
  • अमेरिकेत शिक्षण झाल्यामुळे नेतन्याहू स्पष्ट इंग्रजी बोलणारे आणि समजणारे इस्रायलमधील एकमेव नेते म्हणून ओळखले जातात.
  • नेतन्याहू १९६७साली लष्करामध्ये भरती झाले. त्यांनी कॉमांडो युनिटमध्ये काम केले. ते अनेक गुप्त मोहिमेंमध्ये सहभागी झाले.
  • १९७३साली नेतन्याहू यांनी इस्रायलकडून प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतला. या युद्धातील कामगिरीसाठी त्यांना कॅप्टन ही पदवी प्रदान करण्यात आली.
  • लष्करातील सेवेचा काळ संपल्याने ते लष्करातून बाहेर पडले. (इस्त्रायलमध्ये प्रत्येक इस्त्रायली नागरिकाला ठराविक काळासाठी लष्कारी सेवा सक्तीची असते.)
  • १९८४साली त्यांची अमेरिकेतील इस्त्रायलचे राजदूत म्हणून नेमणूक करण्यात आली.
  • १९८८साली नेतन्याहू यांनी उजव्या विचारसरणीसाठी इस्त्रायलमधील लोकप्रिय लिकूड पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश मिळवला.
  • शांततेसाठी इस्त्रायलने वादग्रस्त भूभागावरील ताबा सोडण्याला नेतन्याहू यांचा कायमच विरोध राहिला.
  • तरी १९९६साली पंतप्रधान झाल्यानंतर पॅलेस्टाइनबरोबर झालेल्या शांतता करारानुसार त्यांनी हिबोर्न या शहरातून इस्त्रायली सैन्य मागे घेतले.
  • अमेरिकेने हस्तक्षेप केल्यामुळे १९९९मध्ये मुदतपूर्व निवडणूका झाल्याने नेतन्याहू यांचे पंतप्रधान पद गेले आणि पॅलेस्टाइनबरोबरचा शांतता करार संपला.
  • २००३साली अर्थमंत्री म्हणून काम करताना नेतन्याहू यांनी अनेक मोठे बदल घडून आणले. अर्थव्यवस्थेची वाढ होण्याचे दृष्टीने हे बदल महत्वपूर्ण ठरले.
  • २००५मध्ये इस्त्रायलने गाझा पट्ट्यातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्यांनी मंत्रीपद सोडले.
  • २००६मध्ये नेतन्याहू लिकूड पक्षाचे अध्यक्ष झाले. त्याचबरोबर ते संसदेतीमधील विरोधीपक्ष नेतेही झाले.
  • २००९मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लिकूड पक्ष देशातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. इतर पक्षांबरोबर युती करुन नेतन्याहू यांच्या पक्षाने सरकार बनवले.
  • २०१३साली झालेल्या निवडणुकीनंतर ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यानंतर पुन्हा २०१५च्या निवडणुकीनंतरही तेच पंतप्रधान पदावर कायम राहिले.
  • ४ वेळा इस्त्रायलचे पंतप्रधान पद भूषणवणारे ते केवळ दुसरे नेते ठरले. यापूर्वी इस्त्रायलची स्थापना करणारे डेव्हीन बेन गुरियान हे ४ वेळा पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
  • सलग ३ वेळा निवडून आलेले नेतन्याहू हे इस्त्रायलचे एकमेव पंतप्रधान आहेत. तर सर्वाधिक काळासाठी पंतप्रधानपदी राहणारे ते इस्त्रायलचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत.

जागतिक उत्पादन निर्देशांकात भारताला ३०वे स्थान

  • जागतिक उत्पादन निर्देशांकात जागतिक आर्थिक मंचाने (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) १०० देशांच्या यादीत भारताला ३०वे स्थान दिले आहे.
  • जागतिक आर्थिक मंचाने प्रथमच उत्पादन सज्जता अहवाल (रेडिनेस फॉर द फ्यूचर ऑफ प्रॉडक्शन रिपोर्ट) जाहीर केला असून त्यात जपानचा पहिला क्रमांक आहे.
  • त्यानंतर दक्षिण कोरिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, चीन, झेक प्रजासत्ताक, अमेरिका, स्वीडन, ऑस्ट्रिया, आर्यलड हे देश अनुक्रमे पहिल्या १० स्थानी आहेत.
  • ब्रिक्स देशांमध्ये चीन ५, रशिया ३५, ब्राझील ४१, दक्षिण आफ्रिका ४५व्या क्रमांकावर आहे. भारताचा ३०वा क्रमांक लागला आहे.
  • या अहवालातील स्थान ठरवताना औद्योगिक धोरण, सामूहिक कृती हे निकष लावण्यात आले आहेत.
  • या शंभर देशांचे ४ गटात वर्गीकरण केले आहे. त्यात अग्रमानांकित, उच्च क्षमताधारी, वारसा आणि नव क्षमताधारी यांचा समावेश आहे.
  • यामध्ये भारत हंगेरी, मेक्सिको, फिलीपीन्स, रशिया, थायलंड, तुर्की यांच्यासमवेत वारसा गटात आहे.
  • तर चीन हा अग्रमानांकित देशात असून ब्राझील व दक्षिण आफ्रिका हे नवोदित देशात समाविष्ट आहेत. अग्रमानांकित पंचवीस देशांची उत्पादन क्षेत्रातील स्थिती भक्कम आहे.
  • भारत हा जगातील ५वा मोठा उत्पादनक्षम देश असून त्याचे उत्पादन मूल्य २०१६मध्ये ४२० अब्ज डॉलर्स होते.
  • भारताचे उत्पादन क्षेत्र तीन दशकात ७ टक्क्यांनी वाढले असून त्यामुळे देशांतर्गत उत्पन्नात १६ ते २० टक्के भर पडली आहे. मानवी भांडवल व शाश्वत साधने ही भारतासाठी दोन महत्त्वाती क्षेत्रे आहेत.
  • बाजारपेठ आकारात भारत ३रा असून महिला सहभाग, व्यापार कर, नियामक क्षमता, शाश्वत साधने यात ९०वा आहे.
  • उत्पादनाच्या प्रमाणात भारत ९वा तर गुंतागुंतीत ४८वा आहे. भारताचे स्थान श्रीलंका (६६), पाकिस्तान (७४), बांगलादेश (८०) यांच्यापेक्षा चांगले आहे.
  • चौथ्या औद्योगिक क्रांतीस अनुकूलतेत अमेरिका, सिंगापूर, स्वित्झर्लंड, ब्रिटन, नेदरलँड हे पहिल्या ५ व चीन २५वा तर भारत ४४वा आहे.

१५ जानेवारी : भारतीय सैन्य दिन

  • १५ जानेवारी रोजी भारतीय सैन्य दिनानिमित्त देशाच्या तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी नवी दिल्लीतील अमर जवान ज्योति येथे शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
  • भारतीय लष्कराचे प्रमुख बिपिन रावत, नौदलाचे प्रमुख सुनील लांबा आणि हवाई दलाचे प्रमुख बीएस धनोआ यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
  • १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती.
  • भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्र हाती घेतली होती.
  • या ऐतिहासिक क्षणानिमित्त भारतीय सेनेकडून दरवर्षी १५ जानेवारीला भारतीय सैन्य दिन साजरा करण्यात येतो. यादिवशी दिल्लीत आर्मी डे परेडचे आयोजन केले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा