चालू घडामोडी : १६ जानेवारी

हज यात्रेचे अनुदान बंद

  • हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान यंदापासून बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे.
  • हा निर्णय म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण न करता अल्पसंख्यांकाना सक्षम करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे सरकारकडून सांगण्यात आले.
  • सरकार या निर्णयाच्या माध्यमातून हज यात्रा घडवून आणणाऱ्या कंत्राटदारांची प्रक्रियादेखील पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न करत आहे.
  • सर्वोच्च न्यायालयाने २०२२पर्यंत टप्याटप्याने हज यात्रेचे अनुदान बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारला २०१२साली दिले होते.
  • सरकारने अफजल अमनुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील ४ सदस्यीय समितीने तयार केलेला हज धोरणाचा मसुदा ऑक्टोंबरमध्ये सादर केला होता.
  • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा मसुदा तयार करण्यात आला होता. या समितीनेही हज यात्रेसाठी दिले जाणारे अनुदान बंद करण्याची शिफारस केली होती.
  • जगभरातील मुस्लिमांसाठी हज हे श्रद्धास्थान असून भारतातील हजारो मुस्लीम या यात्रेसाठी जातात. त्यामुळे या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
  • सरकार हज यात्रेवर दरवर्षी ७०० कोटी रुपयांचे अनुदान देते. यावर्षी देशातील १.७५ लाख मुस्लीम हज यात्रेसाठी जाणार आहेत. पण त्यांना सरकारकडून कुठलेही अनुदान मिळणार नाही.
  • हज यात्रेच्या अनुदानाची रक्कम यापुढे अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या शैक्षणिक सक्षमीकरण आणि कल्याणासाठी खर्च करण्यात येणार आहे.
  • यंदा भारतातून सुमारे १३०० महिला मेहरमशिवाय (परिवारातला असा पुरुष ज्याच्याशी लग्न शक्य नाही) हज यात्रा करणार आहेत.
  • सौदी अरेबियाने आपले नियम थोडे वाकवत ४५ वर्षांहून अधिक वयाच्या कमीत कमी ४ महिलांच्या समूहाला कोणा साथीदाराशिवाय हज यात्रा करण्याची परवानगी दिली आहे.
  • तसेच सौदी अरेबियाने भारतीय यात्रेकरूंचा कोटा ५ हजारांनी वाढवला आहे. त्यामुळे आता एकूण १.७५ लाख भारतीय नागरिक हज यात्रा करू शकतात.
  • केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री : मुख्तार अब्बास नक्वी

ऐश्वर्या टिपणीस यांना फ्रेंच सरकारचा सांस्कृतिक सन्मान

  • भारतातील वास्तूंचे वास्तुरचना संधारणशास्त्राच्या माध्यमातून संवर्धन करणाऱ्या ऐश्वर्या टिपणीस यांना फ्रेंच सरकारचा ‘शवालिए द ला ऑर्दे दे आर्त ए लेत्र’ (कला-साहित्य क्षेत्रातील उमराव) हा सांस्कृतिक सन्मान जाहीर झाला.
  • ऐश्वर्या या संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतातील फ्रेंच वास्तूंचे संवर्धन करण्याच्या कामासाठी त्यांना गौरवण्यात आले आहे.
  • जुन्या वास्तूंचे तिचा मूळ पोत कायम ठेवून संवर्धन व जीर्णोद्धार करण्याचे तंत्र त्यांना अवगत आहे.
  • ऐश्वर्या टिपणीस दिल्लीच्या स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर या संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
  • त्यांनी युरोपीय शहर संवर्धन या विषयात स्कॉटलंडच्या डँडी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तसेच ब्रिटनमध्ये वास्तुरचनेचे प्रशिक्षण घेतले.
  • ‘व्हर्नाक्युलर ट्रॅडिशन्स-कंटेम्पररी आर्किटेक्चर’ हे पुस्तक त्यांनी लिहिले असून, अनेक वृत्तपत्रांतून वास्तुकलेवर लेखनही केले आहे.
  • त्यांनी देशातील संवर्धन वास्तुरचनाकार म्हणून पुरातन वास्तूंचा वारसा जपण्यात मोठे काम केले.
  • मध्य प्रदेशातील महिदपूर किल्ल्याचे संवर्धन, डेहराडून येथील डून स्कूलच्या इमारतीचे संवर्धन हे त्यांचे प्रकल्प गाजले. त्यासाठी त्यांना युनेस्कोचा पुरस्कारही मिळाला होता.
  • चंद्रनगर ही कोलकात्यापासून ४० किमी अंतरावर असलेली फ्रेंच वसाहत त्यांनी संवर्धन तंत्राने जपली आहे.
  • त्यांनी पश्चिम बंगालमधील चिनसुरा ही डच वास्तू संवर्धित केली असून जागतिक वारसा असलेल्या दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचा सर्वंकष संवर्धन व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
  • यापूर्वी १९८०च्या दशकात कलासमीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी तसेच वास्तुरचना शास्त्रात राज रेवाल यांनाही फ्रेंच सरकारचा हा मानाचा पुरस्कार मिळाला होता.

आधार प्रमाणीकरणासाठी १ जुलैपासून फेस रेकग्निशन सुविधा

  • युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटीने (UIDAI) आधार प्रमाणीकरणासाठी बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांव्यतिरिक्त आता चेहऱ्याचाही समावेश करण्याला परवानगी दिली आहे.
  • विशषत: ज्यांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांची पडताळणी शक्य नाही अशांसाठी ‘फेस रेकग्निशन’ ही सुविधा देण्यात आली आहे.
  • वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अनेकदा बोटांचे ठसे अस्पष्ट होतात वा बुबुळांच्या साह्याने पडताळणी करणे शक्य होत नाही. अशा लोकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल.
  • या व्यतिरिक्त गरज भासल्यास इतरांनाही या सुविधेचा लाभ घेण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारच्या धोरणानुसार आर्थिक व्यवहार करताना पॅन क्रमांकाच्या बरोबरीने आधार क्रमांक देणेही सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकासाठी आधारची पडताळणी गरजेची ठरते.
  • ही नवी पद्धत १ जुलैपासून लागू होणार असून चेहऱ्याची ओळख पटवणारा हा पर्याय फिंगरप्रिंट, आयरिश किंवा ओटीपीपैकी कोणत्याही एका पर्यायाबरोबरच उपलब्ध असणार आहे.

बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

  • पश्चिम महाराष्ट्रातील गावगुंडांच्या आणि खासगी सावकारीविरोधात ४० वर्षे रक्तरंजित लढा देणाऱ्या बापू बिरू वाटेगावकर यांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले.
  • नव्वदीनंतरही तब्बेत ठणठणीत, वाणी खणखणीत, बुद्धी शाबूत असणाऱ्या बापू बिरू यांच्यावर जुलैमध्ये सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती.
  • दणकट अंगकाठी, झुपकेदार मिशा, डोक्यावर पटका, खांद्यावर घोंगडे आणि हातात तळपती फरशी कुऱ्हाडही त्यांची वैशिष्ट्ये होती.
  • कृष्णा खोऱ्यात गोरगरिबांवर अन्याय करणारे खासगी सावकार, महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांविरोधात बापू बिरु यांनी आवाज उठवला होता.
  • हत्यांची मालिका रचणारे बापू बिरू तीस वर्षे पोलिसांना गुंगारा देत होते. त्यांच्या टोळीपुढे पोलिसांनी हात टेकले होते. गरीबांना न्याय मिळवून देताना बापू बिरूंच्या हातून १२ खून झाले.
  • गावगुंड आणि खासगी सावकारीला चाप लावल्यानंतर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. हत्यांच्या आरोपात त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
  • शिक्षा भोगून गावात परतल्यानंतर त्यांनी अध्यात्म आणि धनगर समाजाच्या कार्यासाठी वाहून घेतले होते. भजन, प्रवचनात ते रमले होते.
  • बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असणाऱ्या बापू बिरूंच्या जीवानावर आधारित ‘बापू बिरू’ नावाने मराठी चित्रपटही प्रदर्शित झाला होता. यामध्ये बापू बिरूंची भूमिका अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी साकारली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा