चालू घडामोडी : २० जानेवारी

भारताला अंध विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद

 • अंधांच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने शारजा येथे झालेल्या अंतिम सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत विश्वषचकावर आपले नाव कोरले.
 • पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर ३०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे आव्हान २ गडी राखून पार केले. भारताकडून सुनील रमेशने ९३ आणि अजय रेड्डीने ६२ धावांची खेळी केली.
 • भारताने सलग दुसऱ्यांदा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी फक्त पाकिस्तानने सलग दोन वेळा अंध क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे.

अमेरिकेत २०१३नंतर पुन्हा शटडाऊनची नामुष्की

 • सरकारी खर्चांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या विधेयकाला खासदारांची मंजुरी मिळू न शकल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सरकारवर शटडाऊनची नामुष्की आली आहे.
 • शटडाऊन झाल्याने अमेरिकेतील अनेक सरकारी विभाग बंद पडणार आहेत तसेच लाखो कर्मचाऱ्यांची नोकरीही जाणार आहे.
 • निधीतील तूट भरून काढण्यासाठी सरकारतर्फे ‘स्टॉप गॅप बिल’ मांडले जाते. त्याला अमेरिकन सरकारच्या प्रतिनिधी मंडळाची आणि सिनेट सदस्यांची मंजुरी बंधनकारक असते.
 • स्टॉप गॅप बिल हे अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाने मंजूर केले होते. मात्र सिनेट सदस्य याबाबत चर्चा करत असतानाच रात्रीचे १२ वाजले आणि त्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाली नाही.
 • त्यामुळे आता अमेरिकेत अँटी डेफिशियन्सी अॅक्ट लागू झाला असून, त्याचमुळे अमेरिकेवर शटडाऊनची वेळ आली आहे.
 • त्यामुळे सोमवारपासून (२२ जानेवारी) अत्यावश्यक सेवा वगळता अमेरिकन प्रशासनाचे बहुतांशी विभाग बंद ठेवावे लागणार आहेत.
 • शटडाउनचा नागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेवर काहीही परिणाम होणार नाही. ते कर्मचारी काम करतील मात्र निधीची व्यवस्था होईपर्यंत त्यांना पगार दिला जाणार नाही.
 अमेरिकेत याआधीही शटडाऊन 
 • शटडाउनची ही समस्या अमेरिकेत पहिल्यांदा उद्भवलेली नाही. याआधी बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना २०१३मध्येही अशी वेळ होती.
 • २०१३मध्ये दोन आठवडे सरकारी कामकाज पूर्णपणे बंद होते. त्यामुळे ८ लाख कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले.
 • त्याचप्रमाणे १९८१, १९८२, १९९०, १९९५ आणि १९९६ या वर्षांमध्येही अमेरिकेवर शटडाउनची नामुष्की ओढवली होती.

मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल

 • गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • गुजरातचे राज्यपाल ओमप्रकाश कोहली यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे.
 • नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकारी म्हणून २०१४ मध्ये गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या आनंदीबेन या राज्यातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या होत्या.
 • त्याआधी २००२ ते २००७ दरम्यान आनंदीबेन यांनी राज्य मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
 • पाटीदार आरक्षण आंदोलन आणि दलित आंदोलन तीव्र झाल्यानंतर २०१६मध्ये आनंदीबेन यांनी फेसबुकवरून आपला राजीनामा दिला होता.
 • नव्या पीढीला संधी मिळावी, अशी अपेक्षा असून मला जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर भाजपने राज्यात नेतृत्वबदल केला होता.
 • नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही आनंदीबेन लढल्या नाहीत. आपल्याजागी तरुण कार्यकर्त्याला तिकीट देण्यात यावे, असे त्यांनी पक्षाला सांगितले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा