चालू घडामोडी : २९ जानेवारी

आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर

 • केंद्र सरकारकडून २९ जानेवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत मांडला.
 • या अहवालानुसार आगामी आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ७ ते ७.५ टक्क्यांच्या आसपास राहील, असे अनुमान वर्तवण्यात आले आहे.
 • केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर ६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
 • अर्थमंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या नेतृत्वाखाली हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.
 • तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.
 • १ फेब्रुवारीला अरुण जेटली संसदेत अर्थसंकल्प मांडतील. या पार्श्वभूमीवर आर्थिक सर्वेक्षण अहवालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.
 आर्थिक सर्वेक्षण अहवालातील महत्त्वपूर्ण बाबी पुढीलप्रमाणे: 
 • हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे शेतीच्या उत्तन्नावर परिणाम झाला.
 • प्राथमिक विश्लेषणानुसार जीएसटीमुळे अप्रत्यक्ष करदात्यांची संख्या ५० टक्क्यांनी वाढली. प्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येमध्येही मोठी वाढ झाली आहे.
 • महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांमधून जीएसटीसाठी सर्वाधिक उद्योगांनी नोंदणी केली.
 • देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या पाच राज्यांनी देशाच्या एकूण निर्यातीच्या ७० टक्के निर्यात केली.
 • जीएसटीच्या माध्यमातून देशांतर्गत उद्योगात झालेल्या उलाढालीचे प्रमाण एकूण जीडीपीच्या ६० टक्के इतके आहे.
 • २०१७-१८ या वर्षात देशातील महागाई नियंत्रणात राहिली. ग्राहक किंमत निर्देशांकानुसार यंदाच्या आर्थिक वर्षातील महागाईचे प्रमाण सरासरी ३.३ टक्के इतके राहिले. महागाईच्या दराचा हा गेल्या सहा वर्षातील नीच्चांक आहे.
 • खासगी गुंतवणूकीत सुधारणा होईल तसेच निर्यातीलाही चालना मिळेल.
 • आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय व्यापारावर राज्यांची समृद्धता अवलंबून आहे.
 • चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर २.१ टक्के राहण्याचा अंदाज.
 • चालू आर्थिक वर्षासाठी वित्तीय तूट ३.२ टक्के राहण्याचा अंदाज.
 • १२ टक्क्यांपर्यंत कच्चा तेलाच्या किंमती वाढू शकतात. त्यामुळे महागाई भडकण्याचा धोका.

सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत भारताची तिसऱ्या स्थानी

 • सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत गेल्यावर्षी पहिल्या स्थानी असलेल्या भारताची यावर्षी तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
 • भारताचा विचार केला तर प्रसारमाध्यमे, उद्योग व अशासकीय संस्था यावरील लोकांचा विश्वास २०१७च्या तुलनेत घटला आहे.
 • अर्थात, विश्वास घटला असला तरी अद्याप विश्वसनीय गटातून बाहेर फेकले जाण्याएवढी घट नसल्याने भारत तिसऱ्या स्थानी राहू शकला आहे.
 • जीएसटी आणि नोटाबंदीसारख्या कठोर आर्थिक सुधारणांनंतरही केंद्र सरकारवरील लोकांचा विश्वास ढळलेला नसल्याचे हा निर्देशांक सांगत आहे.
 • एडलमन या संपर्कक्षेत्रातल्या कंपनीकडून गेदरवर्षी दावोस येथून ग्लोबल ट्रस्ट इंडेक्स जाहीर करण्यात येतो. त्यामध्ये हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
 • उद्योग व्यवसायस अशासकीय संस्था व प्रसारमाध्यमे यांच्याकडे जनता कुठल्या नजरेने बघते या निकषावरही भारत विश्वसनीय या कसोटीस उतरला आहे.
 • या निर्देशांकानुसार सरकारवरील विश्वसनीयतेच्या बाबतीत पहिल्या दोन स्थानांवर चीन व इंडोनेशिया हे देश आहेत.
 • चीन २०१७ मध्ये ६७ गुणांसह तिसऱ्या स्थानी होता. यावर्षी चीनने ७ गुणांची कमाई करत ७४ गुणांसह पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
 • भारत गेल्या वर्षी ७२ गुणांसह पहिल्या स्थानी होता. मात्र, यावर्षी चार गुणांनी घट झाली असून ६८ गुणांसह भारताची तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
 • ग्लोबल ट्रस्ट इंडेक्समध्ये अमेरिकेला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले असून, अमेरिकेच्या रँकिंगमध्ये नऊ गुणांची घट झाली आहे.

कृषीशास्त्रज्ञ गुरचरण सिंग कालकट यांचे निधन

 • देशाच्या कृषी क्षेत्रातील प्रगतीत त्यांचा सिंहाचा वाटा असलेले कृषीशास्त्रज्ञ गुरचरण सिंग कालकट यांचे २७ जानेवारी रोजी निधन झाले.
 • कृषी क्षेत्रातील सर्व प्रश्नांची त्यांना बारकाईने माहिती होती. त्यावर त्यांनी उपायही सुचवले होते.
 • पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे त्यांचा जन्म झाला. सध्या पाकिस्तानात असलेल्या लायलपूर येथील पंजाब कृषी विद्यापीठातून त्यांनी बीएस्सी पदवी घेतली.
 • त्यानंतर कृषी क्षेत्रात स्नातकोत्तर पदवी घेऊन ते रॉकफेलर फेलोशिपवर अमेरिकेत गेले. तेथे ओहिओ स्टेट विद्यापीठातून त्यांनी कृषीशास्त्रात पीएचडी केली.
 • मेक्सिकन गव्हाच्या प्रजातीचे बियाणे भारतात आणून १९६०च्या मध्यावधीत हरितक्रांती घडवण्यात आली त्यात त्यांचाही सहभाग होता.
 • नोबेल विजेते नॉर्मन बोरलॉग व डॉ. एम एस स्वामिनाथन यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. पंजाबमधील कृषी संशोधनास वेगळी दिशा देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
 • पंजाब राज्य शेतकरी आयोगाचे माजी अध्यक्ष, पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त ही पदे त्यांनी भूषवली होती.
 • इंदिरा गांधी यांच्या काळात ते देशाचे कृषी आयुक्त होते. जागतिक बँकेत त्यांनी दहा वर्षे कृषितज्ज्ञ म्हणून काम केले होते.
 • जागतिक बँकेच्या श्रीलंका, नेपाळ व इंडोनेशिया देशांसाठीच्या कार्यक्रमांची अंमलबजावणी त्यांनी केली.
 • त्यांच्या कृषी क्षेत्रातील कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांच्या पद्मश्री व पद्मभूषण या नागरी सन्मानांनी त्यांचा गौरव केला.

परराष्ट्र सचिवपदी विजय गोखले

 • डोकलाम प्रश्न सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी विजय गोखले यांनी परराष्ट्र सचिवपदाचा कार्यभार २९ जानेवारी रोजी स्वीकारला.
 • एस जयशंकर यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. पुढील २ वर्षांसाठी गोखले हा पदभार सांभाळतील.
 • विजय गोखले हे १९८१च्या तुकडीतील भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इतिहास विषयात एमए केले आहे.
 • यापूर्वी त्यांनी परराष्ट्र खात्यात उपसचिव (अर्थ), संचालक (चीन व पूर्व आशिया, सहसचिव (पूर्व आशिया) आदी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
 • जानेवारी २०१० ते ऑक्टोबर २०१३ या कालावधीत त्यांनी मलेशियात भारताचे उच्चायुक्त म्हणून काम केले आहे.
 • तर ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१६ या कालावधीत ते जर्मनीत भारताचे राजदूत होते. तसेच त्यांनी हाँगकाँग, बीजिंग आणि न्यूयॉर्कमध्ये काम केले आहे.
 • जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०१७ या काळात ते चीनमध्ये भारताचे राजदूत होते. चिनी भाषा व तेथील राजनैतिक व्यवहारांची त्यांना माहिती आहे.
 • पाकिस्तान आणि चीन या शेजारी राष्ट्रांसोबत भारताचे असलेले तणावपूर्ण संबंध हे त्यांच्यासमोरील आव्हान असेल.
 • याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पॅलेस्टाईन, यूएई आणि ओमान हा दौरा देखील गोखले यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
 • गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. त्यांच्या आधी १९७९ ते १९८२ या कालावधीत पुण्याचे राम साठे यांनी देशाचे परराष्ट्र सचिवपद सांभाळले आहे.

इन्डोनेशियन मास्टर्स स्पर्धेत सायना नेहवालला उपविजेतेपद

 • इन्डोनेशियन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालला जागतिक बॅडमिंटन रँकिंगमध्ये अव्वल असलेल्या ताय झ्यू यिंगने पराभूत केले.
 • जेतेपदाच्या लढतीत ताय झ्यू हिने सायना नेहवालचा अवघ्या २७ मिनिटांत २१-९, २१-१३ अशी मात केली.
 • पायाच्या दुखापतीतून सावरलेली सायना जवळपास वर्षभरानंतर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळत होती.
 • १२व्या क्रमांकावर असलेल्या सायनाला ताय झ्यू यिंग हिने गेल्या १० लढतींमध्ये ९ वेळा नमविले आहे.
 • २०११मध्ये सायनाने तैवानच्या या खेळाडूला पराभूत केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये सायनाने तायविरुद्ध स्वीस ओपनमध्ये विजय नोंदविला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा