चालू घडामोडी : ५ व ६ फेब्रुवारी

बालनाट्य चळवळीच्या प्रणेत्या सुधा करमरकर यांचे निधन

 • बालरंगभूमीचा पाया रचणाऱ्या, बालरंगभूमीला सशक्त दृष्टिकोन देणाऱ्या सुधाताई करमरकर यांचे वृद्धापकाळाने ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले.
 • मराठी रंगभूमीवर ‘लिटल थिएटर’ची रुजवात करणाऱ्या नाट्य निर्मात्या सुधा करमरकर यांना बालनाट्य चळवळीच्या प्रणेत्या म्हणून ओळखले जाते.
 • सुधा करमरकर यांचा जन्म १९३४मध्ये मुंबईत झाला. त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
 • त्यानंतर दामू केंकरे यांनी त्यांना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्‌समध्ये (त्यांच्या नाटकातून काम करण्यासाठी) दाखल करून घेतले.
 • त्यावेळी भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत दामू केंकरे दिग्दर्शित ‘उद्याचा संसार’ हे नाटक सादर केले. त्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक सुधा करमरकरांना मिळाले.
 • अधिकचे नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन 'बालरंगभूमी' या संकल्पनेचा अभ्यास केला.
 • मायदेशी परतल्यानंतर त्यांनी साहित्य संघाच्या सहकार्याने 'बालरंगभूमी-लिट्ल थिएटर’ सुरू केले.
 • सुधाताई यांनी लिटिल थिएटरतर्फे मोठय़ा प्रमाणात बालनाटय़ व प्रौढ नाटय़ प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली. या शिबिरांमधून अनेकांनी त्यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरविले.
 • रंगभूमीवरील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना ‘प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले.
 • त्यांची लोकप्रिय बालनाट्ये
  • अलिबाबा आणि चाळीस चोर
  • अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा
  • कळलाव्या कांद्याची कहाणी
  • चिनी बदाम
  • गणपती बाप्पा मोरया
  • मधुमंजिरी

मालदीवमध्ये आणीबाणी घोषित

 • मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी सुप्रीम कोर्टाचे आदेश पाळण्यास नकार देत देशात १५ दिवसांची आणीबाणी घोषित केली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे मुलभूत अधिकार रद्द करण्यात आले आहेत.
 • आणीबाणीमुळे लष्कराला अमर्याद अधिकार प्राप्त झाले आहेत. आता कोणत्याही संशयित व्यक्तीला लष्कर तत्काळ अटक करू शकते.
 • गेल्या काही दिवसांपासून यामीन यांचे एकाधिकारशाही प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी विरोधकांना तुरुंगात डांबून त्यांनी आपले पारडे जड केले.
 • परंतु काही दिवसांपूर्वी मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने मालदीवचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नाशीद यांच्यासह सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते.
 • या सर्वांवरील खटले चुकीचे आणि राजकीय हेतून प्रेरीत होते असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
 • न्यायालयाच्या या आदेशाचे पालन करण्यास यामीन यांनी नकार दिल्यामुळे मालदीवमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे.          
 • मालदीव सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अली हमीद यांनादेखील पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याशिवाय न्याय प्रशासन विभागाच्या प्रशासकालाही अटक करण्यात आली आहे.
 • मालदीवमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती पूर्ववत होत नाही, तोपर्यंत कुणीही मालदीवला जाऊ नये, असे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.
 • या प्रकरणात पश्चिमी देश आणि भारताचा दबाव निर्माण झाल्यास यामीन एकाकी पडू शकतात.
 • सध्याच्या घडीला यामीन चीनला आपल्या बाजूने उभे करण्यास प्रयत्नशील असतील. मात्र, वैश्विक स्तरावरुन विरोध झाल्यास चीन यामीन यांचे समर्थन करणे कठीण आहे.
 • यामीन यांनी देशात दुसऱ्यांदा आणीबाणी लादली आहे. यापूर्वी आपल्या हत्येचा प्रयत्न झाल्याचा आरोप करीत त्यांनी नाव्हेंबर २०१५मध्ये आणीबाणी लादली होती.

फोर्ब्जची ‘इंडिया ३० अंडर ३०’ यादी जाहीर

 • विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी करणाऱ्या ३० वर्षांपेक्षा लहान ३० तरुणांची ‘इंडिया ३० अंडर ३०’ ही यादी फोर्ब्ज इंडियाने जाहीर केली.
 • यशाचा प्रभाव, दीर्घ काळापर्यंत आपापल्या क्षेत्रात टिकून राहण्याची क्षमता यासारख्या निकषांवर या ३० युवा भारतीयांची निवड या यादीत करण्यात आली आहे.
 • या यादीत सर्वाधिक म्हणजे ४ तरुण (जसप्रीत बुमराह (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), सविता पुनिया (हॉकी) आणि हीना सिद्धू (नेमबाजी)) क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहेत.
 • या वर्षी ९ स्थानांवर एकूण १० महिलांची नावे आहेत. पहिल्या स्थानी जान्हवी जोशी आणि नूपुरा किर्लोस्कर यांचे नाव आहे.
 • मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर, अभिनेत्री भूमी पेडणेकर, ‘मसान’ फेम अभिनेता विकी कौशल हे मनोरंजन विश्वातले तारेही या यादीत आहेत.
 • फोर्ब्जकडून २०११पासून ३० वर्षांखालील तरुणांची यादी जाहीर केली जाते. २०१४पासून फोर्ब्ज इंडियाची यादी घोषित करण्यात येते. या यादीत भारतातीलच ३० तरुणांची निवड केली जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा