चालू घडामोडी : १७ फेब्रुवारी

येत्या एप्रिलमध्ये ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण अपेक्षित

 • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) चांद्रयान-२ या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण होईल, अशी माहिती अंतराळ विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली आहे.
 • चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान योग्य कालावधी आहे. एप्रिलमधील प्रक्षेपण यशस्वी झाले नाही तर नोव्हेंबरमध्ये पुन्हा प्रयत्न केला जाईल.
 • यावेळी या यानासोबत चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारे ऑर्बिटर, चंद्रावर उतरणारे लँडर व चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणारे रोव्हरही पाठविण्यात येणार आहे.
 • भारताची ही दुसरी चांद्रमोहीम असून त्याला अंदाजे ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. (इतर देशांच्या तुलनेत अत्यंत कमी)
 • चांद्रयान-१ ने चंद्रावरील पाण्याचा सोध लावला होता. दुसरी मोहीम त्यापुढील संशोधनाच्या उद्देशाने आखली आहे.
 • आजवर फारसे संशोधन न झालेल्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडील प्रदेशात हे यान उतरवण्याचे भारताचे उद्दिष्ट असेल.
 • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणे खूप कठीण काम आहे. त्या भागात लाखो वर्षांपूर्वी तयार झालेले खडक आहेत. त्यांच्या नमुन्यांच्या अभ्यासातून विश्वाच्या उत्पत्तीचे रहस्य उकलण्यास मदत होऊ शकते.
 • इस्रोचे अध्यक्ष : के. सिवन

भारत व इराणदरम्यान ९ करारांवर स्वाक्षऱ्या

 • इराणचे अध्यक्ष हसन रुहानी भारताच्या भेटीवर आले असून दहशतवाद, सुरक्षा, व्यापार व ऊर्जा या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चर्चा  झाली.
 • राष्ट्रपती भवनमध्ये रुहानी यांचे भव्य स्वागत करण्यात आले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही रुहानी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
 • दोन्ही देशांनी प्रादेशिक स्थितीवर व्यापक चर्चा केली असून शांततामय, संपन्न व स्थिर अफगाणिस्तानच्या आवश्यकतेवर भर दिला आहे.
 • दोन्ही देशांनी एकूण ९ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यात चाबहार बंदराच्या पहिल्या टप्प्यातील शाहीद बेहेसटी बंदराचे संचालन काम भारत १८ महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर चालवण्यास घेण्याच्या कराराचा समावेश आहे.
 • इराण पोर्ट अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन व भारताच्या पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड यांच्यात करार झाला आहे.
 • दुहेरी करआकारणी टाळणे, राजनैतिक पासपोर्ट असल्यास व्हिसामध्ये सूट, पारंपरिक औषध पद्धती, व्यापार समस्या तज्ञ गटाची स्थापना या करारांचाही यात समावेश आहे.

अरुण सन्याल आणि पार्थिक नायडू यांना नामांकित विज्ञान पुरस्कार

 • अरुण जे सन्याल आणि पार्थिक नायडू या भारतीय वंशाच्या दोन अमेरिकन संशोधकांची व्हर्जिनियातील नामांकित विज्ञान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 • जागतिक स्तरावर मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जाणणाऱ्या एकूण सहाजणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
 • व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्थम यांनी २०१८च्या आऊटस्टॅंडिग स्टेम (STEM) पुरस्कारांसाठी ही नावे निवडली आहेत.
 • स्टेम (STEM) म्हणजेच, विज्ञान (Science), तंत्रज्ञान (Technology), अभियांत्रिकी (Engineering) आणि गणित (Mathematics).
 • पुरस्कारासाठी निवड झालेल्या सन्याल यांनी यकृत रोग निदान आणि उपचार प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केले आहेत.
 • सन्याल हे ‘फॅटी लिव्हर डिजिसेस’ (NASH)मधील तंत्र आणि त्याचे परिणाम यावर आणि मेटॅबोलिक सिंड्रोमची वाढती व्याप्ती आणि जागतिक परिणामांची ओळख करण्याचे निरीक्षण करत आहेत.
 • या निरीक्षणाबद्दल यापूर्वी त्यांची व्हर्जिनियातील ‘आऊटस्टँडिंग साइंटिस्ट’ या पुरस्कासाठीही निवड करण्यात आली आहे.
 • स्टँडफर्ड विद्यापीठात शिकणाऱ्या १८ वर्षीय पार्थिक नायडूने कर्करोगाच्या ३-डी इंटरॅक्शनचा अभ्यास करणारे सॉफ्टवेअर तयार केले आहे.
 • हे सॉफ्टवेअर सध्या वापरात असलेल्या उपकरणांपेक्षा कर्करोगजन्य डीएनएच्या जैव पध्दतींचे वेगवान, कमी खर्चिक आणि अचूक विश्लेषण करते.
 • या संशोधनाबद्दल त्याची स्टेम आऊटस्टँडिंग पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पार्थिक सध्या कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा