चालू घडामोडी : २८ फेब्रुवारी

कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे निधन

  • शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने २८ फेब्रुवारी रोजी वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले.
  • जयेंद्र सरस्वती यांचा जन्म १८ जुलै १९३५ रोजी तामिळनाडूमधील इरुलनीकी गावामध्ये झाला. दक्षिण भारतात त्यांचे मोठ्या प्रमाणात अनुयायी होते.
  • मठाचे ६८वे शंकराचार्य चंद्रशेखरेंन्द्र सरस्वती यांनी १९५४साली जयेंद्र सरस्वती यांना कांची मठाच्या पीठाधीपती पदावर नियुक्त केले.
  • जयेंद्र सरस्वतींचे मूळ नाव सुब्रमण्यन महादेव अय्यर होते. चंद्रशेखरेंन्द्र यांनीच सुब्रमण्यन यांना जयेंद्र सरस्वती हे नाव दिले.
  • चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांच्या निधनानंतर १९९४पासून जयेंद्र सरस्वती यांनी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्यपद सांभाळले. ते या पीठाचे ६९वे शंकराचार्य होते.
  • जयेंद्र सरस्वती यांच्या निधनामुळे आता विजयेंद्र सरस्वती हे पद सांभाळतील. १९८३साली जयेंद्र सरस्वती यांनी विजयेंद्र सरस्वती यांना मठाचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते.
  • देशात अयोध्येच्या प्रश्नासह हिंदू धर्मावर परिणाम करणाऱ्या विषयांवर त्यांच्या भूमिकेला मोठे महत्व प्राप्त झाले होते.
  • कांचीपुरम वरदराजन पेरूमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररामन खून प्रकरणी सरस्वती यांना २००४मध्ये अटक झाली होती. ५ जानेवारी २००५पर्यंत ते तुरुंगात होते.
  • नंतर त्यांना जामीन मिळाल्यावर २०१३मध्ये पुडुचेरीच्या विशेष न्यायालयाने त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त केले.
  • सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी आदी शंकराचार्य यांनी कांची कामकोटी पीठाची स्थापना केल्याचे मानले जाते. या पीठाकडून शाळा, रुग्णालये चालविली जातात.

आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटक

  • माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.
  • या प्रकरणी सीबीआयने मे २०१७मध्ये गुन्हेगारी स्वरुपाची फसवणूक करणे, बेकायदा पद्धतीने लाभ घेणे, सरकार अधिकाऱ्यांवरील प्रभावाचा गैरफायदा घेणे या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता सीबीआयने गुन्हा दाखल केला होता.
  • पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री असताना आयएनएक्स मीडिया या कंपनीला कार्ती यांनी मदत केली आणि त्या मोबदल्यात स्वतःच्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतल्याचा आरोप होता.
  • आयएनएक्स मीडिया ही कंपनी, शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मालकीची आहे.
  • नियमबाह्य परकीय गुंतवणूक प्रकरणी या कंपनीला नोटीस बजावविण्यात आली होती. मात्र, त्यावेळी कार्ती चिदंबरम यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा गैरवापर करत कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली, असे सांगितले जाते.
  • सीबीआयने या प्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्या घरावर छापा देखील टाकला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच कार्ती यांच्या सीएलाही सीबीआयने अटक केली होती.
  • अंमलबाजवणी संचालनालयाकडूनही कार्ती चिदंबरम यांची चौकशी होण्याची शक्यता असून जानेवारीमध्ये ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरांवर छापे टाकले होते.
  • सध्या पी. चिंदबरम, त्यांची पत्नी नलिनी व मुलगा कार्ती चिंदबरम हे तिघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
  • नलिनी यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यात कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप आहे.
  • तर कार्ती यांच्यावर राजस्थान रुग्णवाहिका गैरव्यवहारप्रकरणी आरोप झाले होते. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणातही चिदंबरम पिता-पुत्रांवर आरोप झाले होते.

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारताची घसरण

  • ‘द क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०१८’मध्ये प्रतिष्ठित भारतीय तंत्रज्ञान संस्थेची (आयआयटी) गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक विषयांमध्ये घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
  • इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) आणि आयआयटी खरगपूर या ‘अभियांत्रिकी-खनिज व खाणकाम’ या विषयात पहिल्या ५० क्रमांकातील स्थान राखण्यात यशस्वी झाल्या असल्या, तरी त्यांची क्रमवारी घसरली आहे.
  • या यादीत आयआयटी (आयएसएम) २९व्या, तर आयआयटी खरगपूर ४०व्या क्रमांकावर आहे.
  • गेल्या ४ वर्षांशी तुलना करता, विषयनिहाय श्रेणीच्या यादीत पहिल्या ५०मध्ये स्थान मिळवण्यात केवळ ३ भारतीय संस्था यशस्वी ठरल्या आहेत. त्याचप्रमाणे यंदा केवळ २० भारतीय संस्था सर्वोच्च १००च्या यादीत आहेत.
  • ‘इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी’ या विषयाने सर्वोत्तम कामगिरी केली असून, टॉप १०० मधील ३ विद्यापीठांसह १० विद्यापीठांनी या यादीत स्थान मिळवले आहे.
  • ४८ विषयांतील आयआयटीच्या ८० विभागांनी क्यूएस रँकिंगमधे जागा मिळवली असली, तरी २५ प्रकरणांत त्यांचे स्थान घसरले आहे.

२०१८मध्ये भारताची अर्थव्यवस्था ७.६ टक्के दराने वाढेल : मूडीज

  • भारताची अर्थव्यवस्था २०१८मध्ये ७.६ टक्के दराने वाढेल असा अंदाज मूडीज या आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्थेने व्यक्त केला आहे.
  • नोटाबंदी आणि जीएसटी प्रणाली यांच्या धक्क्यातून भारतीय अर्थव्यवस्था सावरली असल्याचे व स्थिती सुधारत असल्याचे मूडीजने म्हटले आहे.
  • भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विदेशी गुतंवणूकदार गुंतवणूक करताना आंतरराष्ट्रीय पतनिर्धारण संस्थांच्या रेटिंग्जना व अंदाजाला महत्त्व देत असल्यामुळे या अहवालाला महत्त्व आहे.
  • नोटाबंदीमुळे विशेषत: ग्रामीण अर्थव्यवस्थेला झळ बसली होती. मात्र, बजटेमध्ये ग्रामीण भारतासाठी चांगल्या तरतुदी असून त्याचा अपेक्षित परिणाम दिसेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्था रुळावर येईल असे मूडीजने ग्लोबल ग्रोथ फोरकास्टमध्ये नमूद केले आहे.
  • मूडीजच्या अंदाजानुसार २०१८मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी तर २०१९मध्ये ७.५ टक्क्यांनी वाढेल.
  • यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्थेत व यंत्रणांमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगत १३ वर्षांमध्ये प्रथमच नोव्हेंबर २०१७मध्ये मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये वाढ केली होती.

जितनराम मांझी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर

  • बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून बाहेर पडत, राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस यांच्या महाआघाडीत सामील झाले आहेत.
  • तीन वर्षांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत जद(यू) आणि राजद आघाडीला शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी भाजपाशी हातमिळवणी केली होती.
  • त्यानंतर संयुक्त जनता दलातून हकालपट्टी झाल्यावर जितनराम मांझी यांनी ‘हिंदुस्थानी अवाम मोर्चा’ या पक्षाची स्थापना केली.
  • नितीशकुमार भाजपामध्ये आल्यापासून मांझींकडे भाजपाचे दुर्लक्षहोत असल्याचा आरोप मांझी समर्थकांकडून केला जात होता.
  • २०१५मध्ये विधानसभा निवडणुकीतही लालूप्रसाद यादव यांनी जितनराम मांझी यांना भाजपाविरोधी लढ्यात सामील होण्याचे आमंत्रण दिले होते.
  • मांझींना महाआघाडीत घेण्यासाठी लालूंचे प्रयत्न सुरु होते. मात्र, नितीशकुमार व समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव यांनी मांझींना विरोध दर्शवला होता.
  • एनडीएतून बाहेर पडणारा मांझी यांचा दुसरा पक्ष आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे जाहीर करत शिवसेनेने यापूर्वी भाजपला धक्का दिला होता.
  • तर आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पक्षाचे सर्वेसर्वा व मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देखील भाजपावर नाराज आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा