चालू घडामोडी : ४ मार्च

एमपीएससीकडून लेखनिकांवर निर्बंध

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये यापुढे एकदा लेखनिक म्हणून काम केल्यास दुसऱ्या उमेदवारासाठी लेखनिक म्हणून काम करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
 • त्याचप्रमाणे परीक्षा देणारे उमेदवार, स्पर्धापरीक्षा देऊन एखाद्या पदावर काम करणारे अधिकारी यांनाही लेखनिक म्हणून यापुढे काम करता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
 • त्याचप्रमाणे ‘व्यावसायिक लेखनिक’ नसणेही बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षेच्या वेळी लेखनिक आणि उमेदवार यांच्याकडून हमीपत्र घेण्यात येईल.
 • लेखनिकांच्या मार्फत परीक्षेत बाजी मारण्याचे गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने लेखनिकांवर काही निर्बंध घातले आहेत.
 • परीक्षेला उमेदवारांकडून आणण्यात येणाऱ्या लेखनिकाचे शिक्षण, वय अशी कोणतीही बंधने आजपर्यंत नाहीत. त्यामुळे एखाद्या विषयातील प्राध्यापक, तज्ज्ञही लेखनिक म्हणून काम करू शकतात.
 • वर्षांनुवर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार आणि त्यांच्या शिकवणी वर्गामध्ये हा लेखनिक पुरवण्याचा उद्योग सर्रास केला जातो.
 • परीक्षेची तयारी करणारा किंवा परीक्षेचे काही टप्पे यशस्वी झालेल्या उमेदवारांचा लेखनिक म्हणून पुरवठा करणाचा उद्योग अनेक संस्था आणि शिकवण्यांमधून केला जातो. त्यासाठी उमेदवारांकडून मोबदलाही घेतला जातो.
 • अशा प्रकारची लेखनिकांबाबतच्या तक्रारी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यापूर्वी वादग्रस्त ठरल्या आहेत.
 • काही शिकवण्यांमध्ये प्रवेश घेतानाच लेखनिक पुरवण्याबाबतची हमी आणि त्याचे शुल्क घेतले जाते, अशी माहितीही उमेदवारांनी दिली आहे.
 • आयोगाने केलेलेनियम हे संदिग्ध असल्याचा आक्षेप उमेदवारांकडून घेण्यात येत आहे.
 • व्यावसायिक लेखनिक आयोग कसा ओळखणार? सामाईक उमेदवार नकोत म्हणजे फक्त त्याच परीक्षेसाठी की सर्व परीक्षांसाठी? असे प्रश्न उमेदवारांकडून व्यक्त करण्यात येत आहेत.

पाकिस्तानमध्ये कृष्णाकुमारी पहिल्या हिंदू महिला सिनेटर

 • मुस्लीम बहुल पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थार येथे राहणाऱ्या कृष्णाकुमारी कोहली या सिनेटर होणाऱ्या पहिला हिंदू-दलित महिला ठरल्या आहेत.
 • कृष्णाकुमारी कोहली बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून (पीपीपी) निवडून आल्या आहेत.
 • कृष्णाची सिनेटर म्हणून निवड झाल्यामुळे पाकिस्तानातल्या अल्पसंख्याकांचे अधिकार आणि महिलांसाठी ती एक मैलाचा दगड ठरणार आहे.
 • कोहली या सिंध प्रांतातील थारमधील नगरपारकर जिल्ह्यात राहणाऱ्या आहेत. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या कृष्णा यांचे वडील शेतकरी होते.
 • १९७९ मध्ये कृष्णा यांचा जन्म झाला. वयाच्या १६ व्या वर्षीच नववीत असताना त्यांचा विवाह झाला.
 • लग्नानंतरही त्यांनी आपले शिक्षण कायम ठेवले आणि २०१३मध्ये त्यांनी सिंध विद्यापीठातून समाजशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
 • कृष्णा या आपल्या भावाबरोबर कार्यकर्ता म्हणून पीपीपीमध्ये सहभागी झाल्या होत्या. थारमधील लोकांसाठी त्यांनी कार्य केले आहे.
 • २००५पासून त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
 • २००७मध्ये इस्लामाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘मेहेरगढ ह्युमन राइट्स युथ लिडरशिप ट्रेनिंग कॅम्प’साठी त्यांनी निवड झाली होती.
 • कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक शोषण, महिलांचे मुलभूत हक्क आणि बंधुआ मजूर यांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांमध्ये हातभार लावण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
 • पाकिस्तानच्या युथ सिव्हिल अॅक्शन प्रोग्राममध्येही त्यांनी आपले योगदान दिले आहे.

भारत आणि व्हीएतनाममध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार

 • व्हीएतनामचे राष्ट्राध्यक्ष त्रान दाय क्वांग तीन दिवासंच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि व्हीएतनाम या दोन्ही देशांमध्ये विविध विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले.
 • क्वांग यांच्या १८ जणांच्या शिष्टमंडळामध्ये उद्योजक आणि कलाकारांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या पक्षाचे काही नेते व मंत्रीही आहेत.
 • पंतप्रधान मोदी व व्हिएतनामचे अध्यक्षांनी अणुसहकार्य, इंम्डो-पॅसिफिक खुली व्यवस्था, संरक्षण, तेल व वायू तसेच कृषी अशा अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करण्याचे ठरवले आहे.
 • दोन्ही देश द्विपक्षीय सागरी सहकार्यावर भर देणार असून खुली, त्यासाठी कार्यक्षम व नियमाधिष्ठित प्रादेशिक व्यवस्था आवश्यक आहे.
 • भारत व व्हिएतनाम यांनी व्यापार व गुंतवणूक संबंध हे तेल व वायू शोधन, शाश्वत ऊर्जा, कृषी व कापड उद्योगात वाढवण्याचे ठरवले आहे.
 • अणुऊर्जा, व्यापार व कृषी या तीन क्षेत्रात यावेळी सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
 • आशिया-पॅसिफिक प्रदेशात चीनचा वाढता प्रभाव आणि दबावाचे राजकारण लक्षात घेता व्हिएतनाम अध्यक्षांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे.
 • नरेंद्र मोदी यांनी व्हीएतनामला २०१६साली भेट दिली होती. या भेटीच्यावेळेस दोन्ही देशांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, अवकाशविज्ञान, दुहेरी करआकारणी अशा विविध विषयांवर १२ करार करण्यात आले होते.
 • २०१७साली या दोन्ही देशांच्या राजनैतिक संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दोन कांस्यपदक

 • भारताचा कुस्तीपटू आणि माजी विजेता बजरंग पुनियाने यंदाच्या कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ६५ किलो फ्रिस्टाईल वजनी गटात कांस्यपदक जिंकले.
 • २०१७साली नवी दिल्लीत झालेल्या आशियाई स्पर्धेत बजरंग पुनियाने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 • विनोद कुमार ओमप्रकाशने ७० किलो फ्रिस्टाईल वजनी गटात भारतासाठी कांस्यपदकाची कमाई केली आहे.
 • या दोन पदकासह भारताने आतापर्यंत या स्पर्धेत ८ पदक कमावली आहेत, ज्यात १ सुवर्ण, १ रौप्य आणि ६ कांस्य पदकांचा समावेश आहे.
 • याच स्पर्धेत भारताच्या नवज्योत कौरने ६५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून इतिहासाची नोंद केली होती.
 • आशियाई स्तरावर सुवर्णपदक पटकावणारी नवज्योत पहिली भारतीय महिला ठरली होती.
 • तर रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने ६२ किलो फ्रिस्टाईल वजनीगटात कांस्यपदक मिळवले आहे.

भारताला आयबीएसएफ सांघिक स्नूकर स्पर्धेचे विश्वविजेतेपद

 • भारताने पहिल्या आयबीएसएफ जागतिक सांघिक स्नूकर स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पिछाडीवरून विजय मिळवत विश्वविजेतेपद पटकावले.
 • पंकज अडवानी आणि मनन चंद्रा यांच्या संघाने हे यश साकार केले. पंकजचे हे कारकिर्दीतील १९वे जागतिक विजेतेपद ठरले.
 • सर्वोत्तम पाच फ्रेमच्या लढतीत भारताने पहिल्या दोन फ्रेम गमावूनही पुनरागमन करत पाकिस्तानचा २-३ने पराभव केला.
 • भारताने उपांत्य फेरीत इराणला ३-२, उपांत्यपूर्व फेरीत आयर्लंडला २-१, तर बाद फेरीत चीनला ३-२ असे हरविले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा