चालू घडामोडी : २४ मार्च

अमेरिका व चीनमध्ये व्यापार युध्द

  • अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर ६० अब्ज डॉलरचे शुल्क लावण्याचे निर्देश व्यापार मंत्रालयाला ट्रम्प यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे दोन्ही देशांत व्यापार युद्ध भडकण्याची चिन्हे आहेत.
  • चीनने बेकायदेशीर मार्गांनी अमेरिकी बौद्धिक संपदा हस्तगत केल्याचा आरोप करून ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर हे शुल्क लावले आहे.
  • चीनसोबतच्या व्यापारी तुटीमुळे अमेरिकेला २ दशलक्ष रोजगार गमवावे लागले आहेत, अशी माहिती देत व्हाइट हाऊसने या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.
  • अमेरिकेने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून चीनही अमेरिकी वस्तूंवर वाढीव आयात शुल्क लावणार आहे.
  • या व्यापार युद्धामुळे बाजारातील आर्थिक तरलता धोक्यात येत आहे. यामुळेच विदेशी गुंतवणूकदार भारतीय भांडवली बाजारातून पैसा काढून घेण्याची शक्यता आहे.
  • आयात शुल्क वाढीच्या कारवाईतून अमेरिकेने युरोपीय देश, बिटन, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, दक्षिण कोरिया अशा काही देशांना वगळले आहे.
  • याआधी अमेरिकेने कॅनडा आणि मेक्सिको या शेजारी देशांनाही शुल्कवाढीतून दिलासा दिला होता.
  • अमेरिकेने आयातीवर लावलेल्या करांचा भारतीय बाजारावर थेट परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे.

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना १४ वर्षांची शिक्षा

  • चारा घोटाळ्याच्या चौथ्या प्रकरणात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने १४ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर त्यांना ६० लाख रूपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे.
  • त्यांना दोन वेगवेगळ्या कलमांखाली प्रत्येकी सात वर्षे याप्रमाणे एकूण १४ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या दोन्ही शिक्षा त्यांना वेगवेगळ्या भोगाव्या लागणार आहेत.
  • त्याचबरोबर त्यांना ३०-३० लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. दंड न दिल्यास एक वर्षांची शिक्षा वाढेल.
  • दुमका कोषागारमधून ३.१३ कोटी रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी लालूंना विशेष न्यायालयाने दोषी ठरवले. याच खटल्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांना निर्दोष ठरवण्यात आले आहे.
  • आतापर्यंत चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांत मिळून लालू प्रसाद यादव यांना एकूण २७ वर्षे व ६ महिने कारावासाची शिक्षा झाली आहे.
  • लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्याच्या पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या प्रकरणात अनुक्रमे ५ वर्षे, साडेतीन वर्षे व पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
  • लालू यादव सध्या बिरसा मुंडा कारागृहात आधीच्या घोटाळाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत.

कर्नाटक सरकारकडून लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा

  • लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, अशी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा निर्णय घेणाऱ्या कर्नाटक सरकारने लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा बहाल केला आहे.
  • लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी सिद्धरामय्या सरकारने मान्य केली आहे. याबाबत राज्य सरकार केंद्राकडे शिफारस करणार आहे.
  • या निर्णयाला भाजप तसेच अखिल भारतीय वीरशैव महासभेनेही तीव्र विरोध केला आहे.
  • आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचा वीरशैव महासभेचा आरोप आहे.

राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ : भारतीय पथकाचे नेतृत्व पी व्ही सिंधूकडे

  • ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूकडे देण्यात आले आहे.
  • राष्ट्रकुलच्या उद्घाटन सोहळ्यात होणाऱ्या पथसंचलनात सिंधू भारतीय पथकाची ध्वजवाहक असेल.
  • जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूकडून राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे. ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने महिला एकेरीत कांस्यपदक जिंकले होते.
  • २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत पिस्तूल नेमबाज विजय कुमार तर २०१०च्या नवी दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचा ध्वजवाहक होता.
  • वर्षभरातील सिंधूची विश्व बॅडमिंटनमधील कामगिरी पाहता ऑलिम्पिक संघटनेने सायना नेहवाल आणि मेरी कोम या सिनियर खेळाडूंना वगळून सिंधूला हा बहुमान दिला.
  • सायना नेहवाल आणि मेरी कोम यांची ही दुसरी राष्ट्रकुल स्पर्धा असणार आहे. मात्र या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याचा मान मिळालेला नाही.

विद्यादेवी भंडारी दुसऱ्यांदा नेपाळच्या राष्ट्रपतीपदी

  • नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची या पदावर फेरनिवड झाली आहे.
  • भंडारी यांनी नेपाळी काँग्रेसचे उमेदवार कुमार लक्ष्मी राय यांना पराभूत केले. भंडारी यांना दोन-तृतीयांश पेक्षा जास्त मते मिळाली.
  • विद्या देवी भंडारी यांना सत्तारूढ़ सीपीएन-यूएमएल आणि सीपीएन (माओवादी) यांच्याव्यतिरिक्त वाम आघाडी, संघीय समाजवादी फोरम-नेपाल तसेच अन्य छोट्या पक्षांकडून समर्थन मिळाले.
  • विद्यादेवी २०१५मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. तसेच १९९४ व १९९९च्या संसदीय निवडणुकीतही त्या निवडून आल्या होत्या.
  • संसद सदस्य झाल्यानंतर ३ वर्षांनंतर विद्यादेवी यांना पर्यावरण मंत्रिपद देण्यात आले. मात्र, केवळ महिला मंत्री असल्याने त्यांना इतरांकडून सहकार्य मिळत नव्हते.
  • विद्यादेवी या दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदावर विराजमान होणे भारतासाठी अधिक समाधानकारक आहे. कारण त्यांच्या काळातच भारत-नेपाळ द्विपक्षीय संबंधांना गती मिळाली आहे.

अण्णा हजारेंचे दिल्लीत उपोषण सुरू

  • शेतकऱ्यांचे प्रश्न, लोकपाल नियुक्ती व निष्पक्ष निवडणुका या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून ‘करेंगे या मरेंगे’ या निर्धाराने सत्याग्रह सुरू केला.
  • राजघाटवर महात्मा गांधीजींच्या, तसेच शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अण्णांनी रामलीला मैदानावर उपोषणाला सुरुवात केली.
  • आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून येणाऱ्या शेतकरी संघटनांचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे त्यांनी स्वागत केले.
  • अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पहिल्याच दिवशी देशभरात विविध ठिकाणी आंदोलनेही झाली. अनेक संघटनांनी अण्णांचा फोटो सोबत घेऊन आंदोलन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा