चालू घडामोडी : १४ व १५ एप्रिल

राष्ट्रकुल स्पर्धा : पदकतालिकेत भारत तिसऱ्या स्थानी कायम

 • बॉक्सिंग
 • मेरी कोमने ४५-४८ किलो वजनीगटात सुवर्णपदकाची कमाई करुन दिली. मेरीचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे पहिले सुवर्णपदक ठरले.
 • ५२ किलो वजनी गटात भारताच्या गौरव सोळंकीने सुवर्णपदकाची कमाई केली.
 • ६० किलो वजनी गटात मनीष कुमारला तर ४९ किलो वजनी गटात अमित फोंगलला रौप्यपदक.
 • महम्मद हुसामुद्दिन ५६ किलो गटात, मनोजला ६९ किलो गटात, नमन तन्वरला ९१ किलो गटात कांस्यपदक.
 • याबरोबरच सतीश कुमार व विकास कृष्णन यांनी बॉक्सिंगच्या अंतिम फेरीकडे वाटचाल करीत किमान रौप्यपदक निश्चित केले आहेत.
 • कुस्ती
 • कुस्तीपटू सुमित मलिकने १२५ किलो फ्रिस्टाईल कुस्तीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
 • विनेश फोगाटने ५० किलो फ्रिस्टाईल कुस्तीत कॅनडाची खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन जेसिका मॅक्डोनाल्डवर मात करत सुवर्णपदक पटकावले.
 • साक्षी मलिकने ६२ किलो फ्रिस्टाईल कुस्तीत न्यूझीलंडच्या टायला फोर्डला पराभूत करत कांस्यपदक मिळवले.
 • सोमवीरने ८६ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले.
 • नेमबाजी
 • ५० मीटर रायफल थ्री पोजिशन प्रकारात ४५४.५ गुणांची कमाई करत संजीव राजपूतने सुवर्णपदकाची कमाई केली. २०१४साली ग्लास्गो राष्ट्रकुल खेळांमध्ये संजीव राजपूतला कांस्यपदक मिळाले होते.
 • टेबल टेनिस
 • भारताची टेबल टेनिसपटू मनिका बत्राने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये ऐतिहासीक सुवर्णपदक जिंकले.
 • टेबल टेनिसच्या एकेरी प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई करणारी मनिका बत्रा पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.
 • या राष्ट्रकुल स्पर्धेतील मनिकाचे हे तिसरे पदक ठरले आहे. यापूर्वी सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला संघात मनिकाने भारताच्या विजयात मोठा हातभार लावला होता.
 • यानंतर महिला दुहेरी सामन्यात मौमा दासच्या साथीने खेळताना मनिका बत्राने रौप्य पदकावर नाव कोरले होते.
 • अॅथलेटिक्स
 • भालाफेकपटू नीरज चोप्राने ८६.४७ मीटर लांब भाला फेकत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
 • स्क्वॉश
 • दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल जोडीने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच स्क्वॉश मिश्र दुहेरीमध्ये रौप्यपदक पटकावले.

विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी विष्णू कोकजे

 • हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल निवृत्त न्या. विष्णू सदाशिव कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
 • केवळ विद्यमान अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांची उचलबांगडी करण्याच्या उद्देशाने ५२ वर्षांनंतर पहिल्यांदाच विहिंपच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक घेण्यात आली होती, असे म्हटले जात आहे.
 • केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा तोगडिया यांच्यावर नाराज होते.
 • या निवडणुकीमध्ये विष्णु सदाशिव कोकजे यांना १९२ पैकी १३१ मते मिळाली. तर प्रवीण तोगडिया यांचे समर्थक राघव रेड्डी यांना ६० मते मिळाली. एक मत अवैध ठरवण्यात आले.
 • आता विश्व हिंदू परिषदेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नव्या कार्यकारिणीत तोगडिया गटातील एकाही व्यक्तीचा समावेश करण्यात आलेला नाही.
 • विंहिपच्या कार्याध्यक्षपदी आलोककुमार, कार्याध्यक्ष (विदेश विभाग) अशोकराव चौगुले, महामंत्रीपदी मिलिंद पांडे, संघटन महामंत्रीपदी विनायकराव देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
 • डिसेंबर २०१७मध्ये तोगडिया यांच्या पदाचा कार्यकाळ संपला होता. त्यानंतर नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी २९ डिसेंबर २०१७ला भुवनेश्वरमध्ये बैठकदेखील झाली होती. मात्र तोगडिया आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालत कोकजे यांच्या नावाला विरोध केला होता.

बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द

 • गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या उग्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीनायांनी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण पद्धत जवळपास रद्द करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
 • या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि बेरोजगारांचा समावेश असलेले १०,००० आंदोलक ढाका शहरात ठाण मांडून बसले होते.
 • अखेर या आंदोलनापुढे नमते घेत पंतप्रधान शेख हसीना यांनी आरक्षण रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
 • बांगलादेशातील प्रचलित व्यवस्थेनुसार सरकारी नोकऱ्यांमध्ये विविध घटकांना सुमारे ५६ टक्के आरक्षण आहे.
 • यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांची मुले, महिला, पारंपरिक अल्पसंख्याक, दिव्यांग आणि काही मागास प्रदेशातील लोकांचा समावेश होता.
 • मात्र, नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर आता सरकारी नोकऱ्यांमध्ये केवळ १० टक्के आरक्षण असेल.
 • या आंदोलनाच्यानिमित्ताने बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे ढाका शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
 • बांगलादेशच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ २ टक्के असलेल्या लोकांना ५६ टक्के आरक्षण दिले जाते. उर्वरित ९८ टक्के लोकांसाठी फक्त ४४ टक्के संधी उपलब्ध असण्यावर आंदोलकांचा आक्षेप होता.
 • या आरक्षणामुळे अनेक लोकांवर अन्याय होत असून सगळ्यांसाठी समान न्याय असावा, अशी मागणी या आंदोलकांनी लावून धरली होती.
 • या आंदोलनामुळे देशातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर अखेर पंतप्रधान शेख हसीना यांनी संसदेत आरक्षण पद्धती रद्द करत असल्याची ऐतिहासिक घोषणा केली.

सीरियावर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनचा हवाई हल्ला

 • सीरियातील डुमा शहरात ७ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या रासायनिक हल्ल्यासाठी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद हेच जबाबदार आहेत, असा ठपका ठेवत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियावर हवाई हल्ला करण्याचे आदेश दिले. त्याला फ्रान्स आणि ब्रिटननेही पाठिंबा दिला.
 • अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी सीरियावर केलेल्या तुफान हल्ल्याने संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 • रशियाने या परिस्थितीत उघड उघड सीरियाची कड घेतल्याने पुन्हा एकदा शीतयुद्धाचे अस्थिर पर्व सुरू होणार का, अशी शंका भेडसावू लागली आहे.
 • सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्या विरोधात लढणाऱ्या बंडखोरांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या डुमा येथे ७ एप्रिल रोजी रासायनिक हल्ला करण्यात आला. त्यात लहान मुलांसह एकूण ७४ जणांनी जीव गमावला.
 • क्रौर्य व अमानुषता यावर अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स यांनी हा हल्लाबोल केला आहे. रासायनिक अस्त्रांची निर्मिती, फैलाव व वापर यांना अटकाव करण्यासाठी हे कठोर पाऊल टाकल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
 • या हल्ल्यात तिन्ही देशांना बी-१ बॉम्बर्स, टोरनॅडो जेट्ससारख्या काही अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला गेला.
 • अमेरिकेकडून आरलीग ब्रूक क्लास आणि टिकोनडर्गो क्लास क्रूझर्ससोबतच अनेक टॉमहॉक क्रूझ मिसाइलचा वापर करण्यात आला.
 • सीरियाची राजधानी दमास्कस, तसेच होम्स या शहरानजीकची दोन ठिकाणे या हल्ल्याचे मुख्य लक्ष्यहोती.
 • सीरियातील यादवी, अनन्वित हिंसाचार, रशियाचा त्या देशातील हस्तक्षेप, अध्यक्ष असद यांच्याविषयी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना असलेले ममत्व, असद यांना अमेरिकेचा असलेला विरोध अशा अनेक बाबींमुळे सीरियातील स्थिती अतिशय गुंतागुंतीची झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा