चालू घडामोडी : ३० एप्रिल

भारत आणि पाकिस्तानचा प्रथमच एकत्रित लष्करी सराव

 • भारत आणि पाकिस्तानचे संबंध दहशतवादाच्या मुद्द्यावरून कमालीचे ताणलेले असतानाच या दोन्ही देशांचे सैन्य प्रथमच दहशतवादविरोधी कारवाईच्या बहुराष्ट्रीय सरावात एकत्रितपणे सहभागी होणार आहे.
 • स्वातंत्र्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये तीन युद्धे झाली असली तरी दोन्ही देशांच्या सैन्यदलांनी एकत्रित लष्करी सराव करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
 • यापूर्वी संयुक्त राष्ट्र संघाच्या शांतता सेनेच्या कामात भारत व पाकिस्तानच्या सैन्याने एकत्रित सहभाग घेतलेला आहे.
 • चीनच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) वतीने या सरावाचे आयोजन करण्यात आले असून त्यात या संघटनेचे चीनसह सर्व ८ही सदस्य देश सहभागी होतील.
 • ‘पीस इनिशिएटिव्ह’ नावाचा हा दहशतवादविरोधी सराव येत्या सप्टेंबरमध्ये रशियाच्या उराल पर्वतराजींमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.
 • जगभरात शांतता नांदावी यासाठी घेण्यात येणाऱ्या या युद्ध सरावाचा मुख्य उद्देश एससीओच्या ८ सदस्य देशांमध्ये दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी सहकार्य वाढवणे हे आहे.
 • २००१साली स्थापन झालेल्या ‘एससीओ’मध्ये सन २००५मध्ये भारत व पाकिस्तानला प्रथम निरीक्षक म्हणून व गेल्या वर्षी पूर्ण सदस्य म्हणून दाखल करून घेण्यात आले.
 • भारताला सदस्य करून घेण्यासाठी रशियाने आग्रही भूमिका घेतली तर चीनने पाकिस्तानच्या सदस्यत्वासाठी पुढाकार घेतला होता.
 • पाश्चात्य देशांच्या ‘नाटो’ या लष्करी संघटनेस शह देण्यासाठी स्थापन केलेल्या या संघटनेचे रशिया, चीन, किर्गीज गणराज्य, कजाकिस्तान, ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान,भारत व पाकिस्तान हे देश सदस्य आहेत.

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताला ३ सुवर्णपदके

 • सुमित सांगवान (९१ किलो), निखट झरीन (५१ किलो) आणि हिमांशू शर्मा (४९ किलो) यांनी ५६व्या बेलग्रेड आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
 • सर्बिया येथे झालेल्या या स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि पाच कांस्यपदके पटकावली.
 • दुखापतीतून सावरणाऱ्या सुमितने इक्वेडोरच्या कॅस्टीलो टोरेसचा ५-० असा सहज पराभव केला.
 • कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील माजी विजेत्या निखटनेही खांद्याच्या दुखापतीवर मात करताना अंतिम लढतीत ग्रीसच्या कौत्सोइऑर्गोपौलोयू एकाटेरीनीवर सहज पराभव केला.
 • महिला गटात जमुना बोरो (५४ किलो) आणि राल्टे लाल्फाकमावीई (८१ किलोवरील) यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

1 टिप्पणी: