चालू घडामोडी : ९ मे

इराणसोबतच्या अणुकरारातून अमेरिकेची माघार

 • इराणशी २०१५मध्ये झालेल्या अणुकरारातून अमेरिका माघार घेत असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ८ मे रोजी केली.
 • डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते इराणशी करार केल्याने अमेरिकेचे मोठे नुकसान झाले. मध्य आशियातील अशांततेमागे इराणच कारणीभूत असून त्यामुळे इराणशी करार करुन काहीही साध्य झाले नाही, असा ट्रम्प यांचा दावा आहे.
 • तसेच अणुकराराद्वारे इराणने अण्वस्त्र कार्यक्रम थांबवल्याचा दिखावा केला असला तरी त्यांचा क्षेपणास्त्र विकासाचा कार्यक्रम सुरुच असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
 • इराण दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. या घडामोडीचे पडसाद आंततराष्ट्रीय स्तरावर उमटण्याची चिन्हे आहेत.
 • बराक ओबामा यांच्या काळात इराणशी झालेल्या अणुकराराला डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोध दर्शवला होता. या करारातून अमेरिका माघार घेईल, असे संकेतही त्यांनी दिले होते.
 • बराक ओबामा यांच्या काळात म्हणजेच २०१५मध्ये इराणचा अमेरिका व अन्य ५ देशांशी करार झाला होता. या करारामुळे इराणवर असलेले आर्थिक निर्बंध संपुष्टात आले होते.
 • त्यामुळे अनेक देशांचा इराणबरोबर व्यापार करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भारतानेही तेहरानबरोबर व्यापारी संबंध विकसित करण्यावर भर दिला होता.
 • त्याबदल्यात इराणने आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना अणुकेंद्रांच्या तपासणीची अनुमती दिली आणि अण्वस्त्रनिर्मिती न करण्याचे व सर्व आंतरराष्ट्रीय नियमनांचे पालन करण्याचे आश्वासनही दिले होते.
 • अमेरिकेच्या बरोबरीने ५ अन्य बड्या देशांची (ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि जर्मनी) ३ वर्षांपूर्वी झालेल्या या करारास मान्यता होती.
 • पण आता अमेरिकेने करार मोडल्यामुळे इराणवर पुन्हा निर्बंध लागू होणार असून, त्यामुळे भारतासमोरील अडचणी वाढू शकतात.
 • या निर्बंधांमुळे तेलाच्या किंमती उसळी घेऊ शकतात. ज्याचा परिणाम भारतावर होईल.

फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा वॉलमार्टने खरेदी केला

 • भारतातली ई-कॉमर्समधली सगळ्यात मोठी कंपनी फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा अमेरिकी कंपनी वॉलमार्ट १६ अब्ज डॉलर्सना (सुमारे एक लाख कोटी रुपये) खरेदी केलाआहे.
 • वॉलमार्ट ही जगातील रिटेल क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर फ्लिपकार्ट ही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.
 • फ्लिपकार्टसोबतच्या या व्यवहारासाठी वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन भारतात आले होते.
 • याखेरीज वॉलमार्ट आणखी २ अब्ज डॉलर्सची (१३ हजार कोटी रुपये) गुंतवणूक फ्लिपकार्टमध्ये करणार आहे.
 • फ्लिपकार्ट विकत घेण्यासाठी वॉलमार्टची प्रतिस्पर्धी कंपनी असलेली अॅमेझॉनही स्पर्धेत होती. परंतु फ्लिपकार्टने वॉलमार्टला पसंती दिली.
 • भारतातला ई-कॉमर्सची उलाढाल गेल्या वर्षी २१ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. इंटरनेटचा वापर जसा वाढेल तशी ही उलाढालही वाढणार आहे.
 • अॅमेझॉनमध्ये काम करताना सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांना फ्लिपकार्टची कल्पना सुचली. यातूनच पुढे फ्लिपकार्टचा जन्म आणि विस्तार झाला.
 • यानंतर पुढे अॅमेझॉननंदेखील भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात पाऊल ठेवले. फ्लिपकार्टने अॅमेझॉनला चांगली टक्कर दिली. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये फ्लिपकार्टचं महसुली उत्पन्न घटले होते.

भारताला ७.२ टक्के विकास दर शक्य : संयुक्त राष्ट्रे

 • संयुक्त राष्ट्राच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात २०१८मध्ये भारताचा विकास दर ७.२ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
 • या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या वर्षांत बसलेल्या फटक्याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.
 • गेल्या वर्षांत लागू झालेली वस्तू व सेवा करप्रणाली तसेच कंपनी, उद्योगांची कमकुवत अवस्था, बँकांचा ताळेबंद यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 • २०१६मधील भारताचा विकास दर ७.१ टक्क्यांवरून २०१७मध्ये ६.६ टक्के असा उतरल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
 • २०१८मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत सुधार येऊन वस्तू व सेवा कराच्या स्थिरतेमुळे उद्योगातील हालचाली वाढतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
 • त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील गुंतवणूकही वाढेल आणि पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक वाढेल, असेही नमूद करण्यात आले आहे.
 • सरकारच्या सहकार्याने बँकांचा ताळेबंद सुधारेल, असा विश्वासही या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

शक्तीशाली नेत्यांच्या यादीमध्ये पंतप्रधान मोदींना नववे स्थान

 • जगभरातील सर्वात शक्तीशाली नेत्यांच्या ‘फोर्ब्स’ या मासिकाने जारी केलेल्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना नववे स्थान देण्यात आले आहे. या यादीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग पहिल्या क्रमांकावर आहेत.
 • ज्या लोकांनी देशासह जगाला बदलण्याचा प्रयत्न केला आणि विशेष कामगिरी केली, अशा लोकांना या यादीत स्थान दिले जाते.
 • फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (१३वे), ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे (१४व्या) आणि अॅपलचे सीइओ टीम कूक (२४वा) यांना मोदींनी मागे टाकले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा