चालू घडामोडी : २० मे

माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना ३ वर्ष तुरुंगवास

  • भारताच्या माजी राजनयिक अधिकारी माधुरी गुप्ता यांना १९ मे रोजी दिल्लीच्या एका न्यायालयाने ३ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
  • पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला महत्त्वाची आणि गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
  • माधुरी गुप्ता परराष्ट्र सेवेमध्ये असताना पाकिस्तानच्या भारतीय दूतावासामध्ये बसून पाकसाठी काम करीत होत्या, असे उघडकीस आले आहे.
  • माधुरी गुप्ता यांना सरकारी गोपनियता अधिनियम कायद्याच्या कलम ३ आणि ५ अंतर्गत दोषी ठरवले असून, यामध्ये कमाल ३ वर्ष तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते.
  • माधुरी गुप्ता १९८३साली परराष्ट्र सेवेत रुजू झाल्या, तेव्हा त्यांची पहिली नेमणूक क्वालालंपूर येथे झाली होती. त्यानंतर त्या बगदादमध्ये होत्या.
  • २२ एप्रिल २०१० रोजी त्यांना अटक करण्यात आली आणि जुलै २०१०मध्ये त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. २२ मार्च २०१२ पासून हा खटला सुरू होता.
  • पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या एका अधिकाऱ्याच्या प्रेमात अडकलेल्या माधुरी गुप्ता यांनी बरीच गोपनीय माहिती त्याला पुरवली.
  • ही बाब भारतीय गुप्तचर यंत्रणांना लक्षात येताच, गुप्ता यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्यात त्या खरोखरच पाकिस्तानला मदत करीत असल्याचे सिद्ध होताच, त्यांना अटक केली.

तामिळनाडू हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य - सीएमएस इंडिया

  • सीएमएस इंडियाने देशातील १३ मोठय़ा राज्यांमध्ये केलेल्या पाहणीत तामिळनाडू हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचे आढळून आले आहे.
  • संबंधित राज्यातील नागरिकांची सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलची मते, लाच मागण्याचे प्रमाण, भ्रष्टाचारविरोधी चळवळी आदी विविध स्वरूपाचे प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले.
  • त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून सर्वाधिक भ्रष्ट आणि कमीत कमी भ्रष्ट राज्यांची यादी तयार करण्यात आली.
  • त्यामध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर तर तेलंगण दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पंजाब, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त असल्याचेही उघड झाले आहे.
  • तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये भ्रष्टाचारविरोधी चळवळी मोठय़ा प्रमाणावर सक्रिय झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश

  • एएफआर आशिया बँक ग्लोबल वेल्थच्या अहवालानुसार भारत हा जगातील सहाव्या क्रमांकाचा श्रीमंत देश ठरला आहे.
  • यासाठी प्रत्येक देशातील खासगी मालमत्तांचा (बिगर सरकारी) विचार करण्यात आला आहे. यात सरकारी महसुलाचा विचार करण्यात आलेला नाही.
  • या खासगी मालमत्तेमध्ये स्थावरजंगम मालमत्ता, रोकड, शेअर्स, व्यावसायिक उत्पन्न आदीचा समावेश होतो.
  • या सूचीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतील खासगी मालमत्ता ही ६२ हजार ५८४ अब्ज अमेरिकी डॉलर आहे.
  • अमेरिकेनंतर चीनचा क्रमांक असून चीनमध्ये २४ हजार ८०३ अब्ज अमेरिकी डॉलरची खासगी मालमत्ता आहे.
  • तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या जपानमध्ये १९ हजार ५२२ अब्ज अमेरिकी डॉलरची संपदा खासगी मालमत्तेच्या स्वरूपात आहे.
  • यानंतर ब्रिटन (९ हजार ९१९ अब्ज अमेरिकी डॉलर) व जर्मनी (९ हजार ६६० अब्ज अमेरिकी डॉलर) यांचा क्रमांक असून त्यांच्या पाठोपाठ भारताचा क्रमांक लागला आहे.
  • भारताने या सूचीत ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स व इटलीवर आघाडी घेतली आहे. भारतामध्ये ८ हजार २३० अब्ज अमेरिकी डॉलर संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • मोठ्या प्रमाणावरील उद्योगधंदे, उत्तम शिक्षणव्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी, आरोग्यसुविधा, स्थावर मालमत्ता आदींमुळे भारताने हे स्थान पटकावले आहे.

शिवांगी पाठकने केले माउंट एव्हरेस्ट सर

  • १६ वर्षीय शिवांगी पाठक हिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे.
  • एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला. दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे शिवांगीने सांगितले.
  • अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक आहेत.
  • हरिणायाच्या हिसारमध्ये राहणाऱ्या शिवांगीने ‘सेव्हन समिट ट्रेक’मध्ये सहभागी होऊन एव्हरेस्टची चढाई करण्याचा पराक्रम केला आहे.

राफेल नदालला रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

  • स्पेनच्या राफेल नदालने इटालीयन ओपन (रोम मास्टर्स) टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
  • या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेववर ६-१, १-६, ६-३ अशी मात केली.
  • नदालने ही स्पर्धा आठव्यांदा जिंकली. या विजयाने नदालने टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे. नदालहा ३२वा मास्टर्स किताब ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा