चालू घडामोडी : २६ व २७ मे

आयुष्मान भारत योजनेसाठी दरनिश्चितीपत्रक जाहीर

  • अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘आयुष्मान भारत’ या योजनेत किमान १३५० उपचार सुविधांसाठी रु. १५०० ते रु. १.५० लाखांपर्यंतचे दरनिश्चितीपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
  • ओबामा हेल्थकेअरशी तुलना होत असलेली केंद्र सरकारची आयुषमान भारत ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक पाऊल पुढे नेले आहे.
  • या योजनेंतर्गत देशातील गरीब कुटुंबांना यात ५ लाख ते १० कोटी रुपयांचा विमा मिळणार आहे.
  • राष्ट्रीय स्वास्थ्य बिमा योजना आणि केंद्रीय आरोग्य योजना (सीजीएचएस) याअंतर्गत उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन मगच आयुषमान भारतअंतर्गत दर ठरवले गेले आहेत.
  • त्यामुळे पारंपरिक केंद्रीय आरोग्य योजनेपेक्षा या मोहीमेतील उपचार १५ ते २० टक्क्यांनी स्वस्त होतील.
  • यात उपचारांचे दर ठरवण्यात आल्याने, विमा आहे म्हणून रुग्णांची लूटमार होण्याची शक्यता कमी होणार आहे.
  • हृदयरोग, कर्करोग, मेंदूशस्त्रक्रिया, नवजात अर्भक उपचार यासाठी दरनिश्चिती करण्यात आली आहे. उपचार व शस्त्रक्रिया यांचे स्वरूप यावरून दर ठरवण्यात आले आहेत.
  • या निविदा पत्रिकेत उपचारांचे दर निश्चित करण्यात आले असून त्याच्या आधारे राज्ये विमा योजनेत सहभागी होणाऱ्या रुग्णालयांची यादी निश्चित करू शकतील.
  • रुग्णालयांची या योजनेतील पॅनल नोंदणी १५ जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी विमा कंपन्यांकरिता राज्यांनी निविदा व लिलाव प्रक्रिया करायची आहे.
  • दोन आठवडय़ात ही प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्टमध्ये योजना प्रत्यक्ष सुरू केली जाणार आहे.
  • देशातील खासगी रुग्णालयांतून आयुषमान भारत योजना राबवण्यात यावी, यासाठी त्या रुग्णालयांना प्रोत्साहन देण्याचाही केंद्र सरकारचा बेत आहे.
 ‘आयुष्मान भारत’ योजनेबद्दल 
  • या योजनेंतर्गत मिळणारे लाभ
  • प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांची आरोग्य सुरक्षा.
  • १० कोटी गरीब, मागास कुटुंबांना याचा फायदा मिळणार.
  • अस्थिविकार निवारण, ह्रदयविकार निवारण, कर्करोग निवारण, न्युरोसर्जरी यासारख्या २० खर्चिक उपचारांच्या किंमती कमी करण्यात आल्या आहेत.
  • योजनेचे लाभार्थी
  • ग्रामीण भाग : कच्च्या भिंती व छप्पर असलेल्या घरांतील मागास कुटुंबे, कुटुंबात १६ ते ५९ या वयोगटातील कोणीही मोठी व्यक्ती नसलेली कुटुंबे, अनुसूचित जाती-जमातींतील गरीब कुटुंबे, रोजंदारीतून कमाई करणारी भूमिहीन कुटुंबे, भटकी कुटुंबे, आदिवासी.
  • शहरी भाग : कचरा गोळा करणारी कुटुंबे, भिकारी कुटुंबे, घरकाम करणारे, चर्मकार, फेरीवाले, बांधकामावरील मजूर, प्लम्बर, रंगारी, सुरक्षारक्षक.
  • प्रस्तावित दर
  • खुब्याचा (उखळीचा) सांधा व गुढघेबदल शस्त्रक्रिया : ९ हजार रुपये.
  • धमन्यांमध्ये स्टेन्ट बसवण्याचा खर्च : ४० हजार रुपये.
  • कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग शस्त्रक्रिया : १.१० लाख रुपये.
  • सिझेरियन प्रसूती : ९ हजार रुपये.
  • व्हर्टेब्रल अन्जिओप्लास्टी (एका स्टेन्टसह) : ५० हजार रुपये.
  • कर्करोगासाठी हिस्टेरेक्टमी शस्त्रक्रिया : ५० हजार रुपये.

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन

  • दिल्लीला मेरठशी जोडणाऱ्या दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते २७ मे रोजी झाले.
  • १३५ किलोमीटर लांबीचा हा एक्स्प्रेस मार्ग देशातील पहिला स्मार्ट आणि हरित एक्स्प्रेस मार्ग आहे. उद्घाटनानंतर मोदींनी ६ किमी पर्यंत रोड शोही केला.
  • देशातील सर्वाधिक वेगवान मार्ग मानल्या जाणाऱ्या या इस्टर्न पेरिफेरल मार्गासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
  • दिल्ली आणि मेरठ या एक्सप्रेस मार्गाच्या पहिल्या टप्प्याची लांबी ९ किमी असून त्यात १४ मार्गिका आहेत.
  • निजामुद्दिन पुलापासून दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेपर्यंत हा रस्ता असेल. उर्वरित ९६ किमीचा मार्ग टप्प्याटप्प्याने २०१९-२०पर्यंत पूर्ण केला जाईल.
  • या मार्गामुळे गाझियाबाद, फरिदाबाद, ग्रेटर नोएजा, पलवलला सिग्नलमुक्त रस्त्याने जोडले गेले असून त्यामुळे दिल्लीतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.
  • दिल्ली आणि दिल्ली राजधानी क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात रालोआ सरकारने केली होती.

ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

  • पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे २६ मे रोजी मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले.
  • कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.
  • वर्षभरापूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी गीता कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा राजा त्यांना तिथेच सोडून निघून गेला.
  • त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला होता. त्यावेळी निर्माते रमेश तौरानी यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला.
  • गीता यांनी त्यावेळी त्यांचा मुलगा राजा त्यांना कशापद्धतीने त्रास द्यायचा हे प्रसारमाध्यमांसमोर दुःख कथन केले

रियाल माद्रिदची चॅम्पियन्स लीग जेतेपदाची हॅट्ट्रिक

  • अंतिम सामन्यात गॅरेथ बेलने ६४व्या मिनिटाला एक आणि ८४व्या मिनिटाला डागलेल्या दुसऱ्या अप्रतिम गोलच्या जोरावर रियाल माद्रिदने सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदाला गवसणी घातली.
  • युक्रेनची राजधानी किव्ह येथे रंगलेल्या या सामन्यात लिव्हरपूलला ३-१ अशा गुणफरकाने नमवत, या जेतेपदासह रियाल माद्रिदने १३ युरोपियन किताब आपल्या नावावर केले आहेत.
  • बायर्न म्युनिचनंतर (१९७४ ते १९७६) चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरा करणारा रियाल माद्रिद क्लब हा पहिलाच क्लब ठरला आहे.
  • युरोपियन चषक/चॅम्पियन्स लीगचे जेतेपद ३ वेळा उंचावणारे झिनेदिन झिदान हे तिसरे प्रशिक्षक ठरले. यापूर्वी बॉब पैस्ली आणि कार्लो अँसेलोट्टी यांनी ही कामगिरी केली आहे, परंतु त्यांना जेतेपदाची हॅट्ट्रिक पूर्ण करता आली नव्हती.
  • युरोपियन चषक स्पर्धेची ५ जेतेपद नावावर करणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला आहे. २००७-०८मध्ये मँचेस्टर युनायटेडकडून रोनाल्डोने पहिल्यांदा हा चषक उंचावला. त्यानंतर रियाल माद्रिदकडून २०१३-१४, २०१५-१६, २०१६-१७ आणि २०१७-१८मध्ये त्याने ही कामगिरी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा